Type to search

Featured सार्वमत

पुरामुळे नाऊरच्या पुलानजीक मोठे भगदाड

Share

नाऊर (वार्ताहर)- श्रीरामपूर वैजापूरला जोडणारा प्रमुख जवळचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा महामार्ग क्र. 51 ला गोदावरी नदीला आलेल्या महापुराने पुलालगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे श्रीरामपूर-वैजापूर कडील होणारी मोठी वाहतूक बंद पडली आहे.
श्रीरामपूर-वैजापूर या दोन प्रमुख तालुक्यांना जवळून जोडणारा महामार्ग क्रमांक 51 (नगर-शिवुर) असून यासाठी नाऊर येथील गोदावरी नदीवर कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आलेला आहे. गोदावरीला आलेल्या महापुराच्या पाण्याने पुलालगत मोठे भगदाड पडले आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

भगदाड पडलेल्या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यांतील एस.टी. बसेससह, शेतकर्‍यांच्या शेतमालाची दैनंदिन वाहतूक सुरू असते. भगदाड पडलेल्या ठिकाणाहून अनेक नागरिक ये-जा करत असून पोलीस प्रशासनाने देखील लक्ष घालण्याची गरज आहे. वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्पर दखल घेऊन हे भगदाड पूर्णतः बुजून पुलाच्या दोन्ही बाजूने सिमेंट वॉल बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांकडून होत आहे.

या पुलाला मागील 2 ते 3 वर्षापूर्वी पाण्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने असेच भगदाड पडले होते. यावेळी कार्यकारी अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांनी तत्पर दखल घेत स्वतः थांबून मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्रीसह पुलाचे भगदाड बुजविण्यात आले होते. पाणी आल्यानंतर दरवेळी असेच भगदाड पडत असल्याने शासनाचा मोठा खर्च वाया जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने सिमेंटच्या भिंती करणे गरजेचे असल्याची मागणी देखील तत्कालिन अधीक्षक अभियंता यांच्याकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी केली होती. मात्र साईड वॉलकडे त्यावेळी दुर्लक्ष केल्याने सातत्याने अशा घटना घडत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!