Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

पूरग्रस्त शेतकर्‍यांचं पीककर्ज माफ

Share

ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम

मुंबई- पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत पीकासाठी बँक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते ते पीक कर्जमाफी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केला. ज्या शेतकर्‍यांनी कर्ज घेतले नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यासोबतच पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधी सोबतच राज्य शासनाकडून अतिरिक्त एक लाख रुपये तसेच घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम, बाधीत कुटुंबांना तीन महिने प्रत्येकी 10 किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा तसेच कृषी पंपांच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज वर्षा निवासस्थानी झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक यासह अन्य भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. याभागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. शहरी भागातील पाणी पुरवठा पुर्ववत झाल्या आहेत. स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पायाभूत सुविधांची कामे मिशन मोडवर सुरू असून त्याबाबत दर आठवड्याला ही समिती आढावा घेणार आहे.

छोटे व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई
जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या संदर्भात तलाठी, सरपंच, दूधसंघाचे पदाधिकारी यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील. दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाई रकमेत देखील वाढ करून ती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. छोटे व्यावसायिक, मूर्तिकार, हस्तकलाकार यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित
कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचे या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पुरग्रस्तांना नुकसानभरपाई देताना स्वतंत्र कुटुंब म्हणून मदत देण्यासाठी शिधापत्रिके सोबतच दोन स्वतंत्र वीजबिल, दोन स्वतंत्र गॅस जोडणी, दोन स्वतंत्र घरे हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल व त्यांना मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • बाधीत कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप
  • तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण,शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये
  • घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत
  • कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित
  • जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य
  • छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई
  • पूर परिस्थिती तसेच उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जतमधील 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गोदावरी आणि भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराच्या पाण्यामुळे नगर जिल्ह्यातील नदी काठावरील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा आणि कर्जत या सहा तालुक्यांत प्राथमिक अंदाजानुसार 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 427 घरांचे नुकसान झालेले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अकोले तालुक्यातही नुकसान झालेले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!