Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सराफ बाजाराला पुराचा तडाखा; दुकानदार संतप्त; नालेसफाईत बॉम्बे हात; स्वखर्चाने स्वच्छता

Share

नाशिक ।  प्रतिनिधी

सुवर्ण अलंकाराची पेशवेकालीन बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सराफ बाजाराला गोदेच्या महापुराचा तडाखा बसला. पुराचे पाणी थेट बाजारातील दुकानात शिरले. त्यामुळे दुकानांतील सोने-चांदीचे अलंकार, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. सराफ बाजाराला 50 कोटींचा फटका सहन करावा लागला. दरवर्षी पुराचे पाणी दुकानात शिरते, हा पिक्चर आता नवा नाही. लोकप्रतिनिधींनी आपत्तीनंतर पूर पाहणी दौरे करण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी दुकानदारांकडून केली जात आहे.

मागील दोन आठवड्यांपासून पावसाची तडाखेबंद बॅटिंग सुरू असल्याने गोदामाईने रौद्ररुप धारण केले. पुराचे पाणी थेट आजूबाजूच्या परिसरात शिरले. तेथून हातभर अंतरावर असलेल्या सराफ बाजारालादेखील पुराचा तडाखा बसला. सर्व दुकाने पाण्याखाली होती. महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईवर बॉम्बे हात मारला जातो, त्यामुळे ही समस्या उद्भवते, असा आरोप येथील दुकानदारांनी केला आहे. तसेच, पाणी ओसरले तरी महापालिकेचे सेवक स्वच्छतेसाठी फिरकलेदेखील नाही. दुकानदार स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

रविवारी (दि. 4) महापुराच्या पाण्यामुळे येथील दुकाने पूर्णपणे पाण्याखाली होती. पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी झालेले नुकसानीचे चित्र समोर येत आहे. पुरामुळे दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर खराब झाले आहे. दुकानांमध्ये चिखलाचा थर साचला आहे. अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये पाणी साचले आहे.

सोने व चांदीचे अलंकार तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल भिजला आहे. प्रत्येक दुकानांमध्ये हेच दृश्य पहायला मिळत आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सरस्वती नाल्याची सफाई योग्य पद्धतीने केली नाही. तसेच या ठिकाणी असलेल्या दोन नाल्याचे चेंबर तुंबल्याने येथे पाण्याचा निचरा झाला नाही.

त्यामुळे पुराचे पाणी थेट दुकानात शिरले. महापालिका प्रशासनाने नीट कर्तव्य बजावले असते तर ही वेळ आली नसती, असा आरोप येथील दुकानदारांनी केला आहे. तसेच, येथे फुलबाजारामुळेदेखील नाले तुंबतात. फुलांचा कचरा थेट नाल्यात टाकला जातो. त्यामुळे देखील पुराच्या पाण्याचा झटपट निचरा होत नाही. त्यामुळे ही समस्या दरवर्षी उद्भवते, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. सराफ बाजारात रोज किमान 50 कोटींची उलाढाल होते. पुरामुळे सर्व सोने -चांदी खरेदी विक्रीची सर्व उलाढाल ठप्प आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!