विनोद ठाकरे

म्हसावद, ता.शहादा-

लॉकडाऊनमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या आयटी इंजिनियरसह कंपन्यांतून मजुरीचे, अंग मेहनतीचे काम करणाऱ्यापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. परंतु शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील तरूणाने लॉकडाऊनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला अन् त्यात यश मिळवले. या तरुणाने महाराजा, राजवाडी खाट स्वतः गुंफून रोजगार निर्मिती करून दिली.

लक्कडकोट येथील राकेश सखाराम रावताळे याने एम.ए. केले. त्यानंतर शेतकी डिप्लोमाही केला. सुरूवातीस अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्जफाटे केले. मुलाखती दिल्या. त्यानंतर कोरोना संकट आले. त्यात अजून मार्ग सापडत नव्हता. मग आत्मनिर्भर कसे होता येईल? हा विचार सुरु केला.

असा सुरु केला व्यवसाय

राकेशने खाट गुंफण्याचे व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. आधी साधी खाट गुंफून सुरुवात केली. त्यानंतर व्यवसायात नवीन्य आणण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घेतला. यामुळे महाराजा, राजवाडी खाट गुंफण्याचे काम सुरू केले. परिसरात आदिवासी बांधवात मोठ्या प्रमाणात ही खाट गुंफून घेत आहेत.

दिवाणखाण्याची शोभा

महाराजा, राजवाडी खाट दिवाणखाण्यात चमकू लागले. या खाटी लग्नात, धार्मिक कामासाठी वापरली जाते. खाट गुंफण्यासाठी घरी बोलावले तर दोन हजार रूपये आणि खाट व दोरी त्याच्या घरी आणून दिली तर पंधराशे रूपये मजूरी आहे. एकट्याला खाट गुंफण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात, तर जोडीदार राहीला तर दोन दिवस लागतात. खाटेला पंधरा ते अठरा किलो दोरी लागते. वजनदार असलेली खाट उचलण्यासाठी दोन व्यक्ती लागतात.

खाटेमध्ये नक्षीकाम

खाटेमध्ये तो विविध आकर्षक नक्षीसह नाव, फोन नंबर, मोर, १५० प्रकारची नक्षी गुंफतो. खाटेला दहा हजार रूपयापर्यंत खर्च येतो. मानेकडे २०२ तर हाताकडे ३३६ दोरीचे कडे लागतात.खाटेचे वैशिष्ट्य असे की या खाटेवर ४० ते ४५ महिला किंवा पुरूष बसू शकतात. पण खाट मोडत नाही. राकेशने आतापर्यंत २० खाटा गुंफल्या असून नोकरी करण्यापेक्षा समाधानी असल्याचे सांगीतले. त्याचे वडील सखाराम शंकर रावताळे लक्कडकोटचे पोलीस पाटील आहेत. त्यांनीही राकेशच्या कामाला प्रोत्साहन दिले आहे.