नंदुरबार महेश पाटील

कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी मार्चमध्ये देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. या पाच महिन्याच्या काळात जनजीवन विस्कळीत होवून अर्थ व्यवस्था कोलमडली. २२ वर्षापासून रिक्षाच्या व्यवसायात जम बसल्यानंतर एकाएकी लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकीरीचे झाले. यातून मार्ग काढत नंदुरबार येथील मोहन मराठे यांनी चहा नास्त्याचे दुकान टाकत जिद्द व चिकाटीने उभारी घेतली आहे. यात कुटूंबाचाही महत्वपूर्ण वाटा आहे.

यंदाचा वर्षात आलेल्या परिस्थितीने प्रत्येकाला जगणे शिकवून दिले. नंदुरबार शहरातील महादेवनगर येथे राहणारे ४८ वर्षीय मोहन भिकाजी मराठे यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी १० वीपासूनच रिक्षा व्यवसायात पदार्पण केले. शहरातील बसस्थानकाजवळ ते रिक्षा लावत. २२ वर्षापासून ते व्यवसायात असतांना घरची आर्थिक परिस्थिती सुधारली. चांगले दिवस आले असतांनाच भारतामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आले. या पाच महिन्याच्या कालावधीत त्यांच्या हाताला कुठलेही काम मिळाले नाही. जमा केलेली पुंजीही या कालावधीत संपली. त्यांच्यापुढे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न पडला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. कठोर परिश्रमाने कुठलीही गोष्ट साध्य करता येते. हे त्यांनी सत्यात आणत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांना त्यांची पत्नी पुष्पाबाई मराठे यांची भक्कम साथ मिळाली. सुरूवातीला त्यांनी गावाबाहेरील गोकुळधाम कॉम्प्लेक्स बाहेर चहाचा स्टॉल टाकला. त्यामध्ये आर्थिक उत्पन्न सुरू झाल्याने त्यांच्या नातलगाने त्यांना दुकान उपलब्ध करून दिली. त्याठिकाणी त्यांनी समर्थ चहा नास्ता सेंटर सुरू केला. त्याठिकाणी त्यांची पत्नी व ते स्वतः दिवसभर मेहनत करत आहेत. याचेच फळ म्हणून त्यांचा व्यवसाय स्थिर झाला.

यंदाच्या वर्षात लॉकडाऊनमुळे अनेकाचे व्यवसाय ठप्प झाले. जनजीवन विस्कळीत झाले. त्यात अनेकांना नैराश्याने ग्रासले. मात्र मोहन भिका मराठे यांनी खडतर परिस्थितीला सामोरे जात स्वप्न पाहत ध्येय ठरवत मेहनत जिद्द, चिकाटी, एकाग्रतेच्या जोरावर नैराश्यातून मार्ग काढत व्यवसायात उभारी घेतली आहे.

मो.९४०४७४७४५८