Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘सिडी’ अन् ‘ईडी’ चे राजकारण

‘सिडी’ अन् ‘ईडी’ चे राजकारण

डॉ.गोपी सोरडे

जळगाव – Jalgaon

- Advertisement -

सरत्या वर्षात आठवणींना उजाळा देत असताना राजकीय आणि विकासात्मकदृष्ट्या जळगाव जिल्ह्याने काय कमावले? आणि काय गमावले? असा साहजिकच प्रश्‍न उपस्थित होतो.

जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींमुळे राजकीय धुराळा अधिक गडद झाला. जिल्ह्याचे मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला जयश्रीराम करत हाताला घड्याळ बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यासह राज्यात राजकीय भूकंप झाला.

प्रवेशाच्यावेळी खडसेंनी ‘तूम्ही ईडी लावा, मी सिडी लावतो’ असे विधान करुन त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले आणि त्यानंतर जिल्ह्यात रंगू लागलेय ‘सिडी’ अन् ‘ईडी’ चे राजकारण..!

केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे जिल्हावासियांनी भाजपला कौल दिलेला आहेे. अनेक वर्षापासून जळगाव मनपात असलेली सत्ता माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात खेचून आणली. भाजपचा निर्विवादपणे मनपा, जिल्हा परिषद आणि काही नगरपालिकांमध्येही वरचष्मा आहे.

गेल्या चाळीस वर्षापासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बांधणीसाठी आणि पक्षाच्या बळकटीकरणासाठी मेहनत घेतली.मात्र पक्षात त्यांची कोंडी केली जात असल्याने ते अस्वस्थ झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करुन त्यांच्या कन्येला तिकिट दिले. परंतु भाजपच्याच काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कन्येच्या पराभवासाठी रणनिती आखल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.खुद्द नाथाभाऊच याबाबत अनेकदा जाहीरपणे सांगत असतात.

अखेर एकनाथरावराव खडसे आणि त्यांची कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह समर्थकांनी पक्षांतर करण्याचा निर्धार केला.आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समिकरण देखील बदलणार आहे.

राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाने मोट बांधून भाजपला धक्का देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारची वर्षापूर्ती झाली असली तरी कोरोना संक्रमणाच्या नियंत्रणासाठी दहा महिने गेले.त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात विकासात्मक फारसा प्रभाव दिसला नाही हेही तितकेच खरे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासावर नवीन वर्षात लक्ष्य केंद्रीत करावे, अशी अपेक्षा आहे.

माजी मंत्री खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची दिलजमाई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले याबाबत अनेकांनी आश्‍चर्य देखील व्यक्त केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार हरीभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने ही बाब जिल्हावासियांना चटका लावून गेली आहे. त्यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

प्रत्येक राजकीय पक्षात गटबाजी आहेच.मात्र भाजपमध्ये ती अधिक उघडपणे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनपाने वॉटरग्रेसला दिलेल्या सफाईच्या ठेक्यावरुन राजकीय धुराळा उडू लागला आहे. त्याच बरोबर बीएचआर घोटाळा, मविप्र प्रकरण आणि आता पून्हा ‘सिडी’ आणि ‘ईडी’ प्रकरणाचे लोण पसरु लागल्याने जिल्ह्यातील राजकारण अधिक तापू लागले आहे….

– मो.नं. ९८३४१६६०७२

- Advertisment -

ताज्या बातम्या