नेवासा : करोनाबरोबरच अवकाळी पाऊस व अतिवृष्टीच्या संकटांवर मात

चांगल्या-वाईट घटनांबरोबरच आशेचा किरण दाखवणारे वर्ष
नेवासा : करोनाबरोबरच अवकाळी पाऊस व अतिवृष्टीच्या संकटांवर मात

नेवासा (का. प्रतिनिधी) -

मावळते वर्ष करोनाचे होते. तरीही या वर्षात मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस, शेतमालाचे पडलेले भाव, लांबलेला पावसाळा व अतिवृष्टी ही संकटे शेतकर्‍यांवर आली.

अनेक चांगल्या वाईट घटना नेवासा तालुक्यात घडल्या. या घटनांनी आशेचा किरणही दाखवला.

यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या संकटांचा तालुक्यातील शेतकर्‍यांना सामना करावा लागला. मुळासह सर्व धरणे भरली. त्याचबरोबर जमिनीतील पाणीपातळी वाढल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जून या काळात मार्केट बंद राहिले. शेतमाल मातीमोल भावात विकावा लागला. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला. हातावरची पोटं असलेल्यांचा रोजगार बुडाला. मात्र मदतीसाठी धावून आलेल्या हातांनी एकोप्याचे बंध दृढ केले. पावसाळा लांबल्याने कारखान्यांचे गाळप हंगाम थोडे विलंबाने सुरू झाले. मात्र पूर्ण क्षमता वापरून हे कारखाने सुरू आहेत.

तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना. शंकरराव गडाख यांनी सत्ताधारी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करून हाती शिवबंधन बांधले. नेवासा तालुक्यात 20 हजार 600 हून अधिक हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाल्याने कापूस उत्पादक तालुक्यांत नेवाशाचा समावेश झाला. त्याचबरोबर मुळा सहकारी सूतगिरणी सुरू करण्यास मंजुरी मिळाली व उभारणीची प्रक्रियाही सुरू झाली. रोजगार वाढीत प्रकल्पामुळे वाढ होईल. वारंवार खंडित राहणार्‍या सोनईसह 16 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या 78 कोटी रुपये खर्चाच्या सुधारीत आराखड्यास मान्यता मिळाली. मुळा उजव्या कालव्यावरील चार उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी 59 लाख रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी मिळाली.

तालुक्यात शेतकरीविरोधी कायद्यांना दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. शॉर्टसर्किटमुळे तालुक्यातील गणेशवाडी येथील सुमारे 40 एकर तर अन्य ठिकाणीही ऊस जळाल्याच्या घटना घडल्या.

करोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुका वर्षाच्या शेवटी जाहीर होऊन प्रक्रिया सुरू झाल्याने वर्षअखेरीस वातावरण निवडणूकमय बनले. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली म्हणून नेवासा बुद्रुकच्या एका ग्रामपंचायत सदस्याचे पद रद्द झाले.

तालुक्यातील दहावी व बारावीच्या निकाल टक्केवारीत यंदा मोठी वाढ झाली. छोट्याशा चिंचबनची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणून निवडली गेली. वर्षाच्या शेवटी 9 वी ते 12 चे वर्ग सुरू झाले.

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त मंडळ सदस्यांची सहायक धर्मदाय आयुक्तांनी निवड केली. जुनी घटना परंपरा कायम ठेवत स्थानिक ग्रामस्थांच्या मुलाखती घेऊनच ही निवड केली.

श्रीक्षेत्र देवगड, शनीशिंगापूर, नेवासा आदी धार्मिकस्थळी मंदिरे खुली झाली तरी गर्दी टाळण्यासाठी यात्रोत्सव सोहळे भाविकांविनाच साजरे करून सामाजिक जबाबदारीचे भान दाखवून दिले.

बिबट्याच्या भितीचे सावट वर्षभर राहिले. 3 जुलै रोजी तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे मामा-मामीने भाच्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. एप्रिलमध्ये पुनतगाव ग्रामस्थांनी वाळूचा डंपर पकडून तहसीलदारांच्या ताब्यात दिला. झापवाडी शिवारात सोनई पोलिसांनी चांद्याच्या दोघांकडून 115 किलो चंदन जप्त केले. चांदा येथे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 11 गायी सोनई पोलिसांनी मुक्त केल्या. वडाळा बहिरोबा येथे पिता-पुत्रावर सशस्त्र हल्ला करत अडीच लाखांची चोरी केल्याची घटना घडली. यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.

नेवासा ते श्रीरामपूर रोडवर पुनतगाव फाटा येथे मारहाण व रस्तालुटीच्या घटना घडल्या. एका घटनेत आरोपीला पकडताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचा हात मोडला. लॉकडाऊन काळात एप्रिल-मे महिन्यात तालुक्याचा क्राईम रेट घसरला. अपघात शुन्यावर आले होते. सोनईत मुख्य बाजारपेठेतील दुकान, घर व गोदामाला लागलेल्या आगीत एक ते दीड कोटीचे नुकसान झाले.

ऑक्टोबरच्या शेवटी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची बदली झाली. एक पोलीस अधिकारी व नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या व्हायरल झालेल्या संभाषणाने पोलीस खात्यातील हप्तेखोरी उघड केली. जमिनीवरून चौघा भावांमध्ये झालेल्या वादातून एकाची हत्या केल्याची घटना भानसहिवरे येथे घडली.

घोडेगावच्या घोडेश्‍वरी मंदिरातून 17 किलो वजनाचा नक्षीकाम केलेला चांदीचा पत्रा चोरीस गेला. नेवासाफाटा येथून पतंजलीच्या 66 लाख रुपयांच्या गायीच्या तुपाच्या ट्रकची विल्हेवाट लावल्याची घटना घडली. यातील आरोपींना अटक झाली. घोडेगाव येथे पतंजलीच्या दूध पावडरची चोरी झाली. माळीचिंचोरा येथे व्यापार्‍याच्या गोदामातून दोन लाखांची तूर चोरीस गेली.

गोगलगाव येथील 7 शेतकर्‍यांनी मागासवर्गीय स्मशानभूमीसाठी 21 गुंठे जमीन दान देऊन सलोख्याचे उदाहरण घालून दिले.

तालुक्यात मार्च ते मे या काळात करोना संक्रमणाचा वेग मंद होता मात्र भीती अधिक होती. त्यानंतर त्याने मोठा वेग घेतला होता. सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठला. दसर्‍यानंतर वेग मंदावला व दिवाळीनंतर आठवडाभर पुन्हा वाढला. त्यानंतर सुरू असलेली नवे रुग्ण वाढीतील घसरण कायम राहिली. वर्षाच्या शेवटी आठवडाभरात केवळ 20 ते 25 बाधित आढळत आहेत. करोनाने तालुक्यातील 54 बळी घेतले. मात्र वर्षाला निरोप देताना तो तालुक्यातून माघार घेऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. जानेवारीत लसीकरणाच्या चर्चेमुळे उरलासुरला करोनाही हद्दपार होईल यात शंका नाही.

संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची अनेक उदाहरणे, घटना पाहण्यात आल्या. सामाजिक एकतेचा नवा किरण त्यातून दिसला. एकंदर नेवासा तालुक्यात 2020 वर्ष चांगल्या-वाईट घटनांचे असले तरी आशादायी राहिले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com