नाशिक | दिनेश सोनवणे

करोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. अनेकांचे लग्न ठरून तारखा धरलेल्या होत तर अनेकांना लग्नाचे वेध लागलेले होते. या काळात मोठे लग्नसोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, अनेक सोहळे आभासी माध्यमं म्हणजेत सोशल मीडियामध्ये सार्वजनिक करून पार पडले.

असाच एक लग्नसोहळा नाशिकमधील अशोका मार्ग येथील एका सोसायटीत पार पडला होता. विशेष म्हणजे नवरा मुलगा हा थेट गुजरात राज्यातून रीतसर परवानगी काढून लग्नसोहळयाला उपस्थित राहिला होता.

देशभरात लॉक डाऊन असल्यामुळे विवाह समारंभ, धार्मिक विधी तसेच इतरही कार्यक्रम बंद आहेत. अवघ्या १२ जणांच्या उपस्थितीत पार पडलेल्या लग्नसोहळयात थेट नाशिक पोलिसांनी हजेरी लावत अनोख्या शुभेच्छा दिल्या. बिल्डींगमधील नागरिकांनी गॅलरीमध्ये येत नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.

गुजरात येथील निकुंज आणि नाशिक येथील हरिणी जोशी यांचा विवाह पूर्व नियोजित ठरलेला होता. परंतु लॉक डाऊन असल्याने विवाहास लांबणीवर होता. यासाठी निकुंज याने गुजरात सरकारची परवानगी घेत एकटाच वधूच्या निवासस्थानी नाशिकमधील अशोक मार्ग परिसरात आला.

विवाहाची तयारी झाली असल्याने या विवाह प्रसंगी हरीणीच्या घरचे सदस्य सहभागी होते तर निकुंजच्या घरचे सदस्य व्हिडिओ कॉल वरून सहभागी झाले होते. या अनोख्या विवाहाची माहिती नाशिक पोलिसांना मिळताच त्यांनी वधूचे विवाहस्थळ गाठले.

पोलिसांनी जोशी कुटुंबीयांच्या निवासस्थानी सोशल सोशल डिस्टसिंग राखून वधूवरांना इमारतीच्या खालूनच शुभेच्छा देत दिल्या. यावेळी त्यांच्या भावी आयुष्यासाठी 'हा मैने भी प्यार किया है' या चित्रपटातील ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी’ हे गाणे वाजून टाळ्यांच्या गजरात त्यांचा विवाहाची रंगत वाढविली होती.

गेली अनेक दिवस त्यांचा हा विवाह सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर अनेक लग्नसोहळे फेसबुक लाईव्ह, झूम, गुगल मिटच्या माध्यमातून पार पडले. अनेकांनी लग्नाचा वायफळ खर्च टाळून सामाजिक कामात सहभाग नोंदवला.

धूमधडाक्यात लग्नसोहळे म्हणजे प्रतिष्ठेचा विषय असतो. परंतु, अनेक लग्नसोहळे घरगुती पद्धतीने पार पडले. करोनाला वर्ष झाले तरीदेखील लग्नसोहळे थांबले नाहीत; आजही अगदी तेवढ्याच उत्साहात, तेवढ्याच धामधूममध्ये लग्नसोहळे होऊ लागले आहेत. यात बंधने मात्र गर्दीचे आहेत.

अनेकांनी या गर्दीचे पालन करत विवाहसोहळे सुरु ठेवले आहेत. त्यामुळे करोनाच्या निमित्ताने अन्नाची नासाडी, मानपान, वारेमाप खर्चाला लगाम लागला आहे. घरगुती लग्नसोहळे सुरु झाल्यामुळे नवा पायंडा यानिमित्ताने रुजला असल्याचे या वर्षात दिसून आले.