अहमदनगर | सचिन दसपुते | ahmednagar - करोना संकटकाळात जिल्ह्यातील करोना रूग्णावर उपचार करण्यासाठी दि साल्वेशन आर्मीचे बुथ हॉस्पिटल धावून आले.

बुथ हॉस्पिटल हे जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर ठरले. गेल्या 10 महिन्यामध्ये सुमारे तीन हजार 500 पेक्षा जास्त रूग्णावर विनामोबदला यशस्वी उपचार करत त्यांना बरे करून घरी पाठविण्याचे काम बुथ हॉस्पिटलमधील डॉक्टर व त्यांच्या सहकार केले. जिल्ह्यात करोनामुळे मृत झालेल्या रूग्णांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला. मात्र बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एकही रूग्ण दगवला नाही हे विशेष. या रूग्णालयाने समाजाला धीर देत यावर्षी अनेकांच्या जीवनात ‘आशादायी’ रंग भरले.

करोनाने जनजीवन भयभित केलेले असताना रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या बुथ हॉस्पिटलने रुग्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. हॉस्पिटलने या काळात केलेल्या रुग्णसेवेची दखल समाजानेही घेतली. भारतामध्ये मार्च महिन्यात रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली होती. यावेळी नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुथ हॉस्पिटलला भेट देऊन करोना सेंटर सुरू करण्याचे सांगितले. 14 मार्च रोजी बुथ हॉस्पिटलमध्ये करोनाचा पहिला रूग्ण दाखल झाला. त्या रूग्णावर यशस्वी उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील तीन हजार 500 रूग्णांवर बुथ हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार झाले.

सात एकरचा परिसर असलेल्या बुथ हॉस्पिटलमध्ये करोना काळात डॉक्टर, नर्स असे 70 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. मधल्या काळात जिल्ह्यात रूग्णांचे प्रमाण वाढत असताना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी येथे येऊन सेवा दिली. करोना काळात 100 बेड याठिकाणी उभारण्यात आले होते. मात्र ऑगस्ट नंतर जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढू लागली. त्यावेळी बुथ हॉस्पिटलमध्येही रूग्णांचे प्रमाण वाढले. या काळात तेथे 165 पेक्षा जास्त बेड उपलब्ध करून रूग्णांवर उपचार केले गेले.

बुथ हॉस्पिटलमध्ये बरे होऊन घरी गेलेले रूग्ण, समाजातील काही दानशूर व्यक्तींनी हॉस्पिटलला औषधे, पीपी किट असे साहित्य दिले. जिल्हा रूग्णालयाने हॉस्पिटलला आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे काम केले. रूग्णावर उपचार करण्यासाठी दि साल्वेशन आर्मी संस्थेने करोना काळात मदत केली. करोनावर उपचार करण्यासाठी संस्थेने मार्गदर्शन केले. संस्थेच्या मार्गदर्शनामुळे रूग्णांवर यशस्वी उपचार झाले. करोना रूग्णांवर उपचार करत असताना हॉस्पिटलमध्ये काम करणार्या एकाही कर्मचार्याला करोनाची लागण झाली नाही. इतर कोविड सेंटर बंद झालेले असतानाही हॉस्पिटलकडून आजही मोफत उपचार सुरू आहेत. सरते 2020 हे वर्ष सर्वच बाबतीत निराशाजनक ठरत असताना बुथ हास्पीटलसारख्या रूग्णालये, डॉक्टर व परिचारीकांच्या रूग्णसेवेमुळे आशादायी ठरले.

दि साल्वेशन आर्मी ही संस्था नेहमी समाज सेवा करत आली आहे. करोनाचे संकट आल्यावर सर्व घाबरून गेले होते. अशा परिस्थतीतमध्ये बुथ हॉस्पिटलने करोना काळात पहिले कोविड सेंटर सुरू करून उपचार सुरू केले. आजपर्यंत तीन हजार 500 पेक्षा जास्त करोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत याचा खूप आनंद आहे. सरकारची मदत नसताना दि साल्वेशन आर्मी संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींनी हॉस्पिटलला मदत केली. यामुळे आम्हाला करोना रूग्णांवर उपचार करण्यास पाठबळ मिळाले. करोना संकटकाळात डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. समाजासाठी योगदान दिल्याचा आनंद आहे.

- मेजर देवदान कळकुंबे (प्रशासक, बुथ हॉस्पिटल, नगर)