प्रा. ज्ञानेश गवले

श्रीरामपूर तालुका -

काही कडु तर काही गोड आठवणी सोबत घेवून श्रीरामपूरकर सरत्या 2020 वर्षाला निरोप देवून नवीन 2021 च्या स्वागताला

सज्ज झाला आहे. या आठवणींना थोडक्यात उजाळा.

अयोध्येतील श्रीरामपूर मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष म्हणून बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंद देव गिरी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली. भूमिपूजन कार्यक्रम त्यांचाच अधिपत्याखाली संपन्न झाला. त्यामुळे तालुक्याचा देशात सन्मान झाला. पं. स. सभापती निवडणूक डॉ. सौ. वंदना मुरकुटे आणि सौ. संगीता शिंदे यांच्यामध्ये चांगलीच रंगली. वैध-अवैधतेचा वाद थेट जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात सुनावणी पर्यंत पोहोचला. त्यात अखेर सौ.संगीता शिंदे यांनी बाजी मारुन त्या सभापती झाल्या.

नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी काही ना काही कारणाने राजकारण करुन पुन्हा पुन्हा आजतागायत लांबणीवर टाकल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विद्यानिकेतन विद्यालयातील 38 विद्यार्थ्यांना चालक भाऊसाहेब जपे यांनी सुरक्षित शाळेत पोहोचविल्यानंतर रोखून धरलेला श्वास सोडला. गाडी चालवताना त्यांना एका पाठोपाठ एक हृदय विकाराचे झटके आले होते परंतु मुलांचे नुकसान नको म्हणुन त्यांनी रस्त्यात न थांबता त्यांनी कर्तव्यभाव दर्शविल्याने मोठा अनर्थ टळला.

लोकनेते स्व. गोविंदराव आदिक यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा निवृत्त जवान मेजर अर्जुन विरबहाददूर प्रधान यांनी जिंकली. एकता महिला मंचकडून सर्वधर्मीय घरकाम करणार्या महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने अभिनव असा सन्मान करण्यात आला.

ना. बाळासाहेब थोरात यांना महसूल खाते मिळाल्याने शिर्डी-श्रीरामपूर-संगमनेर असे जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव चर्चेत पुढे आला खरा परंतु तो नेहमीप्रमाणे फुसका बार ठरला. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव 36 वर्षांपासून आजतागायतशासकीय बासनात धुळखात पडुन आहे. त्यासाठी असणारी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि श्रेयवाद आजही कायम अडसर ठरत आहेत.

हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नगरला बेमुदत उपोषण करण्यात आले.

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचे थैमान यामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. पिकांची मोठी हानी झाल्याने आर्थिक स्थिती ढासाळली. खरीप हातून गेला. रब्बीच्या हंगामात थोड्याफार आशेवर शेतकरी तग धरुन आहेत.

करोनाच्या आगमनामुळे जे कधी घडले नव्हते असे काही घडुन नवा इतिहास घडत आहे. लॉकडाऊन काळात कधीच भरुन न निघणारे आर्थिक, शैक्षणिक नुकसान झाले.

इतरवेळी जनतेच्या हाकेला ओ देत धावून येणारे लोकप्रतिनिधी अल्पसा अपवाद वगळता कोरोनाच्या संकटात गायब होते. त्यांची उणीव जाणवली. त्याची खुमासदार चर्चाही झाली. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेला ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांचा नियोजित असा महंत रामगिरी यांच्या अधिपत्याखालील शिरसगाव येथील सप्ताह सारी पूर्वतयारी होऊनही इतिहासात पहिल्यांदा रद्द झाला. तालुक्यातील सुमारे 2560 लोकांना करोनाची लागण झाली होती. परंतु उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ वसंत जमधडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या अधिपत्याखालील आरोग्य पथकाने चोख कामगिरी बजावली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात राहिली. तरीही दुर्दैवाने कोरोनाने तालुक्यातील 76 लोकांचा बळी घेतला.

23 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत जवळपास सर्वच शाळा-महाविद्यालयांचे कामकाज अत्यल्प अपवाद वगळता ठप्प आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करोनाच्या कारणाने हे वर्ष अविस्मरणीय ठरले आहे. वर्षाअखेरीस मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असल्याने राजकीय धुराळा सुरु होऊन भाऊगर्दी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण राजकारण ढवळुन निघत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस-महसूल-आरोग्य प्रशासनाने अतिशय दक्षतेने परिस्थिती हाताळली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली.या सर्व कडु गोड आठवणी सोबत घेत आपण 2020 ला निरोप देऊन 2021 च्या स्वागतासाठी पुन्हा आत्मविश्वासाने सज्ज आहोत.