Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसरत्या वर्षात संगमनेर ठरले लक्षवेधी!

सरत्या वर्षात संगमनेर ठरले लक्षवेधी!

गणेश भोर

संगमनेर –

- Advertisement -

जागतिक महामारीचे वर्ष 2020 हे कायम लक्षात राहणार असून या संकटात तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘एक तालुका एक परिवार’ या संकल्पनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन करोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी सह सामाजिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक विभागात केलेल्या कामांमुळे संगमनेर तालुका सरत्या वर्षात लक्षवेधी ठरला.

वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना राज्याच्या राजकारणात मोठे स्थान मिळाल्याने तालुका आनंदमयी राहिला. 1 जानेवारी ते 17 जानेवारी या काळात सहकारमहर्षी टि 20 क्रिकेट स्पर्धेने क्रिडाप्रेमींना मोठी मेजवानी दिली. तर अमृतवाहिनीतील मेधा महोत्सव हा राज्यातील सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. मेधा महोत्सवातील ‘संवाद तरुणाईशी’ मध्ये नामदार आदित्य ठाकरे, नामदार आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, आ. झिशांत सिद्दीकी, आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुणांशी मनमोकळा संवाद साधला. हा राज्यभर चर्चेचा विषय ठरला तर सांस्कृतिक कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, संस्कृती बानगुडे, अवधुत गुप्ते यांनी धमाल उडवून दिली. जयंती महोत्सव यशोधन मैदानावर अवधूत गुप्तेने गायलेले ‘ये बंदा लई जोरात, बाळासाहेब थोरात’ या गितावर आमदार डॉ. तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजितभाऊ थोरात यांसह हजारो उपस्थितांनी धरला ठेका.

या काळात रणजितसिंह देशमुख यांची महानंदाच्या अध्यक्षपदी निवड होऊन संगमनेरच्या सहकाराचा आणखी गौरव झाला.

मार्चनंतर आलेल्या करोना संकटात जगाबरोबर संगमनेरही थांबले. गर्दीने फुललेले रस्ते शांत झाले. पायी चालणार्‍या मजुरांसाठी अमृत उद्योग समूह, युवक काँग्रेस, एनएसयूआय यासह विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी अन्नछत्र सुरू केले. यामध्ये विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या. करोनाची मोठी जनजागृती झाली.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दररोज ऑनलाईन आढावा बैठक घेऊन संगमनेर तालुक्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. तालुक्यात सर्वात जास्त तपासण्या झाल्या. ‘ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट’ या त्रिसूत्रीचा फॉर्म्युला वापरत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबविले. तसेच घुलेवाडी येथील रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जासाठी मंजुरी दिली. तसेच स्वतंत्र महिला हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावला.

करोना पाठोपाठ आलेले चक्रीवादळ, अतिवृष्टीत मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांच्या समवेत नामदार थोरात यांनी राज्याचा दौरा केला.

यावर्षी पाऊस चांगला झाला. भंडारदरा, निळवंडे, आढळा धरण भरले. नद्या, ओढे, बंधारे वाहू लागले. तळेगाव भागातही चांगला पाऊस झाला. अगदी टोकाचे देवकौठे येथील सर्व बंधारे तुडूंब भरले व शेतकरी सुखी झाला.

दिवाळीत अमृत उद्योग समूहाने बाजारात सुमारे 100 कोटी आणल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन बाजारपेठा पुन्हा फुलल्या. करोनामुळे सर्व शाळा, कॉलेज बंद असूनही अमृतवाहिनी कॉलेजने ऑनलाईनचा आदर्श पॅटर्न राबवून गुणवत्तेबरोबर लौकिकही जपला.

अमृतवाहिनीच्या 416 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली. तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा सन 2020-2021 या गळित हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी. एम. संदिप, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत झाला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे झालेल्या ऑनलाईन शेतकरी बचाव या महाव्हर्च्युअल रॅलीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के.पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी. एम. संदीप, श्रीमती सोनल पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे यांनी संबोधले.

नगरपालिकेने स्वच्छतेत पुन्हा देशपातळीवर बक्षिस मिळविले. हायटेक बसस्थानक सर्वांसाठी लक्षवेधी ठरले तर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना जीवन गौरव पुरस्कारही मिळाला.

करोना संकटातही निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी नामदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अकोले तालुक्यात वेगाने कामे सुरू आहेत.

संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जिजाबाई भारती व सहकारातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ वर्पे व संदीप खताळ यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली.

गत वर्षाच्या तुलनेत संगमनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारीची वाढ झाली आहे. सध्या तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून वातावरण तापले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचेच वर्चस्व राहील असा विश्‍वास ना. थोरात यांनी व्यक्त केला आहे. तर शिवसेनेने महाआघाडीचा धर्म पाळत जिथं शक्य तिथं आघाडी जिथं शक्य नाही तिथं स्वबळावर निवडणुका लढविण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले आहे. विविध क्षेत्रांत संकटात लढणारा संगमनेर तालुका हा सरत्या वर्षात लक्षवेधी ठरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या