Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुसीबतों का’ सालाने अनेक गोष्टी शिकविल्या!

मुसीबतों का’ सालाने अनेक गोष्टी शिकविल्या!

नानासाहेब शेळके

कोपरगाव

- Advertisement -

सरते वर्ष 2020 कोपरगावकरांच्या डोळ्यात आश्रु साठवून गेले. अनेकांचे रोजगार गेले. काहींचे व्यवसाय बंद पडले. हातावरची पोटं

अन्नपाण्यावाचून तळमळली. मदतीचे हात पुढे आल्याने या संकटावरही कोपरगावकरांनी मात केली. 2020 हे वर्ष कोपरगावकरांसाठी वेदनादायी ठरले. मात्र आत्मनिर्भयतेच्या अनेक गोष्टीही त्यातून शिकायला मिळाल्या. अनेक व्यवसाईक स्वावलंबी बनले. संकटकाळात एकमेकांना बरोबर घेऊन चालण्याचा मूलमंत्र कोपरगावकरांना करोना शिकवून गेला.

करोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावात लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीचे तीन महिने संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात प्रशासन यशस्वी झाले. नागरिकांनी प्रशासनाला 100 टक्के सहकार्य केले. मात्र लॉकडाऊन वाढत चालल्याने हातावरची पोटं उपाशी राहू लागली. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. अशा नागरिकांसाठी शहरातील सामाजिक संघटना पुढे आल्या. तीन महिने दररोज जेवणाचे डबे पुरविण्याचे काम या संस्थांनी केले.

करोनाचे संकट सुरू असतानाच तालुक्यावर अतिवृष्टीचे संकट कोसळले. कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी तालुक्यात कोसळला. नदी नाले एक झाले. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी नागरिकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी शिरले. तालुक्याला वरदान ठरलेली दारणा, गंगापूर धरणे ओव्हरफ्लो झाली. गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला. खरिपाची पिके अनेक ठिकाणी पाण्याखाली गेली. सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

आ.आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली. नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली.

तालुक्याच्या पश्‍चिम भागाला वरदान ठरलेला मंजूर बंधारा पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने या परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आ. काळे यांच्या प्रयत्नाने या बंधार्‍याचे काम सुरू झाले मात्र सतत होण्यार्‍या पावसामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बंधार्‍याकाठच्या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

भाजप सरकाच्या काळात मंत्रालयात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक यावेळी कोपरगावात झाली. बैठकीत रब्बीचे एक व उन्हाळी दोन अशी तीन आवर्तने देण्याचा निर्णय झाल्याने शेतकर्‍यांना पीक नियोजन करणे सोपे झाले. मात्र आवर्तनाच्या तारखा निश्‍चित न केल्याने पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र 1 जानेवारीपासून आवर्तन सुटणार असल्याचे जाहीर झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

साईभक्तांसाठी निर्मिती झालेल्या काकडी विमानतळासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे विमानतळासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. शहरातील पाच नंबर साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येऊन जिल्ह्याधिकार्‍यांकडून तलावाच्या कामाच्या खर्चास मान्यता मिळविली. सुधारीत पाणीपुरवठा योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 103 कोटी रुपये मंजूर करून घेतले.

करोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुका वर्षाच्या शेवटी जाहीर होऊन प्रक्रिया सुरू झाल्याने वर्षअखेरीस वातावरण निवडणूकमय बनले. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने गावागावांत यामुळे नाराजी पसरली.

तालुक्यातील जनार्दन स्वामी मंदिर, जंगली महाराज आश्रम, मंजुर येथील शिवानंदगिरी महाराज आश्रम, बेट भागातील दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर, संवत्सर, धामोरी, पोहेगाव येथील धार्मीक स्थळे मंदिरेे खुली झाली तरी गर्दी टाळण्यासाठी यात्रोत्सव सोहळे भाविकांविनाच साजरे करून सामाजिक जबाबदारीचे भान दाखवून दिले.

तालुक्यात मार्च ते जून या काळात करोना संक्रमणाचा वेग मंद होता मात्र भीती अधिक होती. त्यानंतर त्याने मोठा वेग घेतला होता. सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठला. दसर्‍यानंतर वेग मंदावला व दिवाळीनंतर आठवडाभर पुन्हा वाढला. त्यानंतर सुरू असलेली नवे रुग्ण वाढीतील घसरण कायम राहिली. वर्षाच्या शेवटी आठवडाभरात केवळ 70 ते 80 बाधित आढळत आहेत. करोनाने तालुक्यातील 43 बळी घेतले.

एकंदरित तालुक्यासाठी 2020 हे मुसीबतों का साल ठरले. मात्र त्यातून कोपरगावकर अनेक गोष्टी शिकले. संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची अनेक उदाहरणे, घटना पहायला मिळाल्या. एकमेकांना केलेली मदत एक नवसंजीवनी देऊन गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या