Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपोलीस दलाने यंदा केला करोना ‘लॉक’

पोलीस दलाने यंदा केला करोना ‘लॉक’

अहमदनगर | Ahmednagar –

करोना काळात पोलिसांनी करोना वारियर्स म्हणून उल्लेखनिय कार्य केले. जूननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक गुन्हेगारांनी डोके वर काढले.

- Advertisement -

रोजगार गेल्याने गुन्हेगारीत वाढ झाली. यातून खून, हाणामार्‍या, दरोडा, घरफोड्या, चारी, लुटमार अशा घटनांत वाढ झाली. या घटनाबरोबरच पोलीस दलातील हप्तेखोरी, भ्रष्टाचार, पोलिसांच्या बदल्यांबाबत वेगवान घडामोडी घडल्या. वर्षाच्या शेवटी रेखा जरे हत्याकांड, शहर सहकारी बँक अपहार, अर्बन बँक फसवणूक प्रकरण आदी घडामोडी घडल्या. मात्र, यंदा पोलिसांनी करोनाकाळात जीव धोक्यात घालून बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने करोना ‘लॉक’ केला, त्याची आठवण कायम राहील.

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले. जनता घरात आणि पोलीस दल रस्त्यावर होते. गुन्हेगारीलाही ब्रेक होता. लोकांचा करोनापासून बचाव व्हावा यासाठी पोलिसांनी आहोरात्र मेहनत घेतली. याकाळात शहर पोलीस दलाने गोरगरिबांसाठी केलेली मदत उल्लेखनीय ठरली. मे, जून नंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, तसे गुन्हेगारीने डोके वर काढले.

‘ते’ ऑडिओ प्रकरण

पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी जिल्ह्यात करोना काळात चांगली कामगिरी केली. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याला मनोज पाटील पोलीस अधीक्षक म्हणून लाभले. त्याच्यासोबत अपर अधीक्षक म्हणून डॉ. दत्ताराम राठोड आले.

डॉ.राठोड यांनी विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात छापेमारी सुरू केली. यातून त्यांचे बनावट डिझेल छापा प्रकरण चर्चेत आले. त्यात एक अधिकारी व सात पोलीस कर्मचार्‍यांचेे निलंबन झाले. याच दरम्यान डॉ. राठोड व नेवासा पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी गर्जे यांच्या अर्थपूर्ण संभाषणाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप बाहेर आली. यातून अपर अधीक्षक डॉ. राठोड यांची तडकाफडकी बदली झाली.

पोलीस दलातील अकोले, संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले यातून पोलीस दलातील भ्रष्टचार समोर आला.

जरे हत्याकांड

30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. यात बाळ बोठे याचे नाव समोर आल्याने व या हत्याकांडाला अनुसरून अनेक घडामोडी घडत असल्याने सरत्या वर्षात हा चर्चेचा मुद्दा झाला. शहर सहकारी बँक अपहार घोटाळ्यात अडीच वर्षांपासून फरार असलेला डॉ. शेळके याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. याच दरम्यान, अर्बन बँकेत तीन कोटींचा अपहार केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. एकंदरीत सुरूवातीला व करोना लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी शांत असली तरी शेवटच्या टप्प्यात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

सोन्याच्या आमिषाने चौघांची हत्या

श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने चौघांची हत्या करण्यात आली. एकाचवेळी चौघांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. खून, खुनाचा प्रयत्न, रस्तालूट करणे, गोळीबार अशा घटनांमध्ये वाढ झाली. करोनामुळे अनेकांचे रोजगार गेले यामुळे तरूणाई गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली. यातून छोट्या- मोठ्या घटना घडत गेल्या. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या काळात खुनाच्या अनेक घटना घडल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार याच्या टिमने अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड केले.

अधिकार्‍यांची अदलाबदली

करोना लॉकडाऊनच्या आधी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे शिक्षणासाठी परदेशात गेले. यानंतर जवळपास पाच महिने जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडे होता. करोना काळात मुंबई येथून अखिलेश कुमार सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्यात आले. त्यांचा काळ पाच महिन्यांचा राहिला. त्यांची मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्याजागी सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक मनोज पाटील यांची नियुक्ती झाली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी 1 ऑक्टोबरला पदभार हाती घेतला. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी डॉ. दत्ताराम राठोड यांची नियुक्ती झाली. महिन्याच्या आत वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे राठोड यांची बदली झाली. त्यांच्याजागी सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली. याच दरम्यान शहरासह जिल्ह्यातील शेवगाव, श्रीरामपूर, शिर्डी, कर्जत, संगमनेर उपविभाग उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या.

बदलीचा प्रहार

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाली. श्रीरामपूर गुटखा प्रकरण, नेवासा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांचे वादग्रस्त संभाषण, पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना लाच घेताना पकडणे यामुळे अनेक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक पाटील यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या