Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविरोधकांना शह, भाजपची सरसी

विरोधकांना शह, भाजपची सरसी

अनिल चव्हाण

धुळे – Dhule

- Advertisement -

मागील 2020 हे वर्ष अनेक अर्थाने स्मरणात राहण्यापेक्षा कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा कालावधी पुढील शंभर वर्ष लक्षात राहील. इतिहासात याची नोंद घेतली गेली आहे. कारण यापूर्वी शंभर शंभर वर्षाच्या कालावधीनंतर आलेल्या मोठ्या साथीच्या आजारांमध्ये कोरोनाचा समावेश झाला आहे. आख्खे जगच या साथीने व्यापून टाकले आहे.

जिल्हा परिषद आणि मनपावर एकहाती सत्ता सांभाळणार्‍या भाजपने कोरोनाचा सामना करतांना देखील आपल्या विरोधकांना चांगलाच शह दिला. भाजपचे आ.जयकुमार रावल यांनी भाजपचेचे माजी आ.अनिल गोटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करेपर्यंत राजकारण शिजले, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अटोक्यात असली तरी परस्परांवर कुरघोडी करणार्‍या विषाणूने मात्र आपले हात-पाय पसरविले. यामुळेच शिविगाळ करण्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली असली तरी भाजपचे जि.प. सभापती बापू खलाणे यांनी हे प्रकरण रेटून नेले.

धुळ्याच्या आमदारांना मोकळे रान राज्याच सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्याने अर्थातच त्यांचा भाजप हाच राजकीय शत्रु आहे. स्थानिक पातळीवर देखील हेच चित्र असल्याने आणि ते एकमेकांशी लढत असल्याने धुळ्यातील एमआयएम चे आ.डॉ.फारुक शाह यांना पूर्णतः मोकळे रान मिळाले आहे. ना त्यांना विरोधक आहेत ना त्यांचा कुणाशी संघर्ष आहे. त्यामुळे वनसाईड बॅटींग करण्याची संधी ते सोडत नसल्याचेच दिसते आहे.

धुळे जिल्ह्यापुरता विचार करायचा झाल्यास मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेली कोरोनाची बाधा अजूनही आपला पिच्छा सोडत नाही. अर्थात परिस्थिती अटोक्यात असली तरी या कालावधीत लॉकडाऊनसह निर्माण झालेल्या अनेक धोक्यांमुळे हे वर्ष तसे संकटातच गेले. सगळ्याच क्षेत्रांवर याचा परिणाम झाला असला तरी राजकीय क्षेत्रात मात्र अनेकांनी ‘वर्क फॉर्म होम’ करीत परस्परांवर कुरघोडी केली. अर्थात राजकारणाला कोणताही हंगाम नसतो किंवा ते रस्त्यावर उतरुनच केले पाहिजे असेही नसते. तर घरात बसूनही करता येते हेच कोरोना काळात अनेकांनी दाखवून दिले.

भाजप सगळ्याच आघाड्यांवर पुढे

कोरोनाच्या संकटाने अनेकांचा रोजगार गेला, कामधंदे बुडाले, घरातून बाहेर निघणे मुश्किल झाले, गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली. अशावेळी भाजपाचे पदाधिकारी सगळ्यात आधी धावून आले. शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने दररोज सकाळ-संध्याकाळ अन्नखाद्याचे 20 हजार पॅकेट वाटले जावू लागले. अत्यंत नियोजनबध्द स्वरुपात तयार जेवण गरजुंच्या घरापर्यंत पोहचविले गेले. याशिवाय कोरोना योध्यांसाठी पीपीई किट असो की सॅनिटाझर, माक्सचे वाटप असो यात भाजप आघाडीवर राहीली. खा.डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल यांनी जिल्हा रुग्णालय आणि मनपाच्या माध्यमातून संबंधितांना आवश्यक त्या सुविधांसह निधिही उपलब्ध करुन दिला.

जिल्हा परिषदेत विरोधी पक्षेनेते पोपटराव सोनवणे यांनी केलेल्या आरोपांना समर्पक उत्तरे देवून अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी पत्रपरिषदेत पुरावेच सादर केलेत. धुळे शहरात भुयारी गटार, पाणी योजनेसह एकाचवेळी तीन योजनांचे काम सुरु असल्याने रस्ते खोदून नागरिकांचा प्रचंड रोष निर्माण झाल्याचे बघून भाजपा पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी संयुक्तीक बैठका घेवून संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांना कारवाईचे इशारे दिलेत. यामुळे या विषयांना धरुन आंदोलन करणार्‍या विरोधकांची हवा काढून घेण्याचा भाजपने वेळोवेळी प्रयत्न केला.

माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरुन आ.जयकुमार रावल विरुध्द गोटे असा राजकीय संघर्ष सुरु झाला. यात श्री. गोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेला पक्षीय स्वरुप येते भाजपने रावलांची साथ दिली. तर राष्ट्रवादीने अनिल गोटे यांना एकटे पाडल्याचे चित्र दिसले.

शिवसेना धुळ्यात जोमात, इतरत्र कोमात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या माध्यमातून कोरोना कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्याप्रमाणावर वाटप झाले. श्री.माळी यांनी यासाठी घेतलेला पुढाकार, अनेक दिवस केलेले वाटप हे खरोखरच कौतुकास्पद आहे. इतरही नागरी प्रश्नांवर त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून निवेदने, आंदोलने केलीत. मात्र शिवसेनेचे साक्री, शिरपूरमध्ये अस्तित्व आहे की, नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशीच परिस्थिती आहे. मात्र निवडणुकीनंतर आ.मंजुळा गावीत यांनी शिवसेनेला उघड समर्थन दिल्याने थोडीफार का होईना या तालुक्यात सेनेची शान राखली गेली.

शिंदेखडा तालुक्यात हेमंत साळुंखे यांनी निवेदने देवून शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविण्या पलिकडे मोठे आंदोलन किंवा लक्षवेधी काही केल्याचे गेल्यावर्षभरात काही केले नाही. मात्र जि.प.च्या सभेनिमित्त झालेल्या बोकडबळीचा विषय उचलून धरत शानाभाऊ सोनवणे यांनी सपत्नीक जिल्हापरिषदेत सत्यनारायण पूजा घालून सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.

काँग्रेसचा ग्रामीणमध्ये जोर

काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी कोरोना काळात आपल्या मतदारांना दिलेला दिलासा, केलेले सहकार्य आणि स्वतः रस्त्यावर उतरुन रेशन मालासह इतर वस्तू मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणन्याजोगे आहेत. गावा-गावात फवारणी, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, लाखोंच्या संख्येने आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे नियोजनबध्द वाटप केले. यामुळे संकटात धावून येणारा कार्यक्षम आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आणखी उजळली. जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी वेळोवेळी शासन दरबारी केलेले पत्रव्यवहार, निवेदने प्रसंगी रास्तारोको करुन न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस देखील शिरपूर आणि साक्री तालुक्यात पूर्णपणे ‘विक’ पडली.

राष्ट्रवादीत आला जीवंतपणा पण..

यापुर्वी जिल्ह्यातील राजकीय समीकरण खूप वेगळे होते. माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांचे जिल्हाभर राजकीय अधिपत्य असल्याने आणि माजी आ.राजवर्धन कदमबांडे हे त्यांचा शब्द ओलांडून जावू शकत नसल्याने राष्ट्रवादी पक्ष वाढीला चहूबाजूने मर्यादा होत्या. शिरपूरात अमरिशभाई तर साक्रीत शिवाजीराव दहिते, यांच्यामुळे तिकडे प्रभावी असे काही करता येत नसतांना स्थानिक पातळीवर शेजारच्या धुळे ग्रामीण मधून आ.कुणाल पाटलांची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे राष्ट्रवादी शहरापुरतीच सिमीत राहिल्याचे चित्र होते. आता मात्र समिकरणे बदललीत. भाजपातून अनिल गोटे राष्ट्रवादीत गेलेत अन् थेट प्रदेशउपाध्यक्ष झालेत. पक्षवाढीसाठी त्यांनी प्रवेशाचा सपाटा लावला. त्यामुळे साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडासह राष्ट्रवादीचे अस्तित्व जाणवू लागले. परंतु राष्ट्रवादीत जुन्या-नव्यांचा वाद सुरु झाला. अनेकवर्ष पदे सांभाळून बसणार्‍यांचा ‘इगो हर्ट’ झाला. यामुळेच रावल विरुध्द गोटे संघर्षात सगळी भाजपा रावलांच्या बाजूने असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ‘आम्हाला बोलवले नाही सांगत’ नामानिराळे राहिलेत.

अर्थात जेव्हा ठिणगी पडेल तेव्हा लगेच राजकारणाचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे गेल्या वर्षभरातील घटनाही अशाच धगधगत राहिल्या.

– मो.नं. 98222 95194

- Advertisment -

ताज्या बातम्या