गांजा प्रकरण : तोफखान्याचे पाच पोलिस निलंबीत

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलिसांनी गांजा प्रकरणात मोठी ‘अर्थ’पुर्ण तडजोड केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पाच जणांवर कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले आहे.

यात पोलीस कॉन्स्टेबल सनी वाघेला, रामकिसन मुकरे, दिलीप गायकवाड, योगेश भिंगारदिवे व पोलीस नाईक अब्दुल कादर इनामदार अशी पाच कर्मचार्‍यांची नावे आहेत. तर यापुर्वी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबीत करण्यात आले आहे.

नगर-औरंगाबाद रोडवर 21 जुलैला तोफखाना पोलीस गस्त घालत होते. या दरम्यान, दोन वाहने त्यांच्यासमोरुन वेगाने गेली. त्यामुळे या वाहनांमध्ये अवैध काहीतरी असल्याचा संशय आल्याने या वाहनांचा पाटलाग करुन पोलिसांनी दोन्ही वाहने शहरातील आशा चित्रपटगृहाजवळ पकडली होती.

त्यावेळी तब्बल 1 कोटी 14 लाखांचा गांजा त्यात मिळून आला होता. यात संदीप दिलीप अनभुले (वय 46, रा. घुमरी, तालुका कर्जत) व सीमा राजू पंचारिया (वय 46, रा. कासार दुमाला, तालुका संगमनेर) तर जीपमध्ये चालक सागर भिमाजी कदम (वय 18, आश्वी, तालुका संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (वय 36, जोर्वे, तालुका संगमनेर) व शोभा कृष्णा कोकाटे (28, नालेगाव, नगर) अशा पाच जणांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना अणखीन 9 जणांची नावे निष्पन्न झाल्यानंतर 14 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, तपास करीत असताना पोलिसांनी जवळजवळ कोट्यावधीची माया जमा केल्याची चर्चा सुरू होती. याप्रकरणी दैनिक ‘सार्वमत’च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर या घटनेला वाचा फुटत गेली. दरम्यान, या घटनेतील आरोपींनी पोलिसांच्या कारवाईचे वाभाडे काढले. नको त्या व्यक्तींची नावे या प्रकरणात गोवण्याच प्रयत्न केला जात असून त्यांच्याकडून मोठी माया जमा करण्यात आल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला.

त्याचे भक्कम पुरावे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तात्काळ चौकशी करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असता त्यात पोलिस निरीक्षक मानगावकर हेही दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते.

मानगावकर यांच्या कारवाईनंतर तक्रारदारांनी समाधान मानले नाही. तर त्यांच्यासह मोठी ‘अर्थ’पुर्ण तडजोड करण्यासाठी मदत करणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. माध्यमांच्या दबावामुळे महानिरीक्षक चौबे यांनी पोलीस अधीक्षकांना पुढील चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे दिली.

गेली अडीच महिने या प्रकरणाची चौकशी सुरू होती. सखोल चौकशीनंतर पोलीस अधीक्षक शर्मा यांना अहवाल सादर करण्यात आला. त्यांनी गुरूवारी पाच जणांना निलंबित केले आहे. गेल्या अडिच माहिन्यांच्या कालावधीनंतर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गांजा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
…………
चोर सोडून संन्याशाला फाशी ! – 
तोफखाना गांजा प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे सर्वज्ञात आहे. ज्यांनी प्रथम कारवाई केली. त्यावेळी मोठी अर्थपुर्ण तडजोड करण्यात आली होती. मात्र त्यांच्यातील मोजक्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर या कटात सहभाग असणार्‍यांवर कारवाईचा बगडा उचलण्यात आला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी चोर सोडून सन्यांना फाशी दिल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
……….
आणखीन काही कर्मचारी रडारवर –
या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. फिर्यादी तसेच तक्रारदार, साक्षीदार हे चौकशीसाठी वेळोवेळी बोलावून देखील हजर राहिले नाही. त्यामुळे चौकशीला उशीर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेत अणखी काही कर्मचारी रडावर असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*