इगतपुरीच्या ‘भगीरथा’ने मिळवले ५ महिन्यात ५ लाखांचे उत्पन्न

0
इगतपुरी (वाल्मिक गवांदे) | शेतीव्यवसायात निरंतर असणाऱ्या बेभरवश्यामुळे विविध भागांत कमालीचे नैराश्य पसरले असतांनाच याच व्यवसायातून समृद्ध उन्नती साधलेले शेतकरी कुटुंब सर्वांना आदर्श ठरत आहे.

सततची नापिकी, अस्मानी, सुलतानी संकट, अर्थसहाय्याचा अभाव अशा विविध कारणांनी मेटाकुटीस आलेल्या इगतपुरी तालुक्यातील भगीरथ भगत यांच्या शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील अनेकांनी भेटी दिल्या आहेत.

त्यांनी २७ गुंठ्याच्या अत्यल्प असणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रातून अवघ्या ५ महिन्यातच ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न घेवून समृद्धी साधली आहे. एवढ्या कमी क्षेत्रात त्यांनी लावलेल्या ४ विविध जातींच्या मिरची लागवडीतून त्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे.

पाण्याच्या सूक्ष्म नियोजनातून केलेली काटकसर पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरली. पाच महिन्यात १ हजार ६०० पेक्षा अधिक जाळ्या मिरच्यांचे त्यांनी विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. विशेष म्हणजे शेतमालाला मंदीचा सामना करावा लागणाऱ्या बिकट काळात त्यांनी कमी कालावधीत घेतलेले लक्षावधी रुपयांचे उत्पन्न निष्ठेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दीपस्तंभ ठरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बलायदुरी ता. इगतपुरी येथील भगीरथ दत्तू भगत हा युवा शेतकरी नेहमीच तालुकाभरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा शेतकरी म्हणून कृषी क्षेत्रात ओळखला जातो. दरवर्षी पारंपारिक पिक असणाऱ्या भात लागवडीतून कुटुंबाला समृद्धता मिळत नसल्याचे शल्य त्याच्या मनाला बोचत होते.

त्यातच अनेकांना शेतीव्यवसायात आलेले अपयश पाहून कुटुंबाचे खच्चीकरण होत होते. शेतीव्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नाचा कोणताही भरवसा नसल्याने आणि २७ गुंठे इतके कमी क्षेत्र असल्याने कोणी अर्थसहाय्य देत नव्हते. भगीरथ भगत यांच्या आई गीताबाई, वडील दत्तू भगत यांनी दिलेल्या पाठबळानुसार उमेद न हारता त्यांनी कमी क्षेत्रात कमी काळात सर्वांना चकित करण्याचे ठरवून विक्रमी उत्पन्न घेण्याचा निश्चय केला.

मोठे बंधू निवृत्ती, भावजय सुंदराबाई आणि पत्नी माधुरी यांच्यासह सर्वांनी अविश्रांत परिश्रम घेवून जानेवारी महिन्यात ४ विविध जातींच्या मिरच्यांची लागवड केली. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीतून मेहनत घेत नवनवे प्रयोग करून पाहिले. शेतीव्यवसायात असणारी प्रचंड मंदी अनेकांना जीवनातून उठवणारी ठरते मात्र असे असतांनाही विविध जातीच्या मिरच्यांचे योग्य कौशल्यदायी नियोजन केल्याने भरमसाठ उत्पन्न मिळाले. मिरच्यांचा दर्जा आयात निर्यात होणाऱ्या दर्जाचा असल्याने व्यापारी थेट शेतातच येवून बऱ्याचदा माल घेऊन गेले.

संपूर्ण भगत परिवाराच्या मेहनतीतून अवघ्या ५ महिन्यांच्या काळात १ हजार ६०० पेक्षा जास्त मिरच्यांच्या जाळ्यांचे उत्पादन घेतले. अनेक मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम कधीचाच संपला असला तरी आजही भगत कुटुंबाच्या शेतात मिरच्यांच्या भरमसाठ जाळ्या उत्पन्न सुरूच आहे. पाच महिन्याच्या अत्यल्प कालावधीत ४ ते ५ लाखांचे उत्पन्न अवघ्या २७ गुंठ्यात घेवून भगत कुटुंबाने उत्तर महाराष्ट्रात नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे.

जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरच्यांचे विक्रमी उत्पादन आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी भेटी दिल्या. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देवून भगीरथ भगत यांचे विशेष कौतुक केले आहे. इगतपुरीचे कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे, प्रदीप नवले  यांनी मित्र ह्या नात्याने वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन मिळाल्याने यशस्वी होता आले असे भगत यांनी सांगितले.

आपल्या लक्षवेधी कामगिरीतून नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना भगत कुटुंबाची यशोगाथा ऐकून नवचेतना मिळाली आहे. योग्य नियोजन, श्रमाची तयारी, सूक्ष्म जलसिंचन आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर यश गगनाला गवसणी घालू शकते असा दिव्य संदेश देणाऱ्या भगीरथ भगत यांच्या परिवाराचे जिल्हाभरात कौतुक सुरु आहे.

गेल्या वर्षीही भगीरथ भगत यांनी ह्याच काळात उत्तर महाराष्ट्रात मिरच्यांचे उत्पन्न घेण्याचा वेगळा विक्रम करून ६ लाखांचे उत्पन्न घेतले होते. भगीरथ भगत हे इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक असून त्यांनी शेती करतांना आपल्या पदाला दूर ठेवले होते. यासह फावल्या वेळात ते इगतपुरी तालुक्यात गावोगावी जाऊन नियमित जलजागृती करतात.
आईवडिलांनी दिलेला आत्मविश्वासाच्या बळावर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नवीन तंत्रज्ञानाला जवळ करून सूक्ष्म जलसिंचनाच्या मदतीने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले. शेतकरी बांधवांनी आत्महत्येचा कटू मार्ग न पत्करता आपल्या कुटुंबाला विश्वासात घेवून मेहनत घेतल्यास निश्चित यश मिळते.
– भगीरथ भगत, यशस्वी शेतकरी बलायदुरी

 

 

LEAVE A REPLY

*