टाटा सफारीतून अंमलीपदार्थ जप्त; गाडी महामंडलेश्वराशी संबंधित? तपास सुरु

0
नाशिक | एका टाटा सफारीतून आज पहाटे घातक समजल्या जाणाऱ्या एमडी ड्रग हे अमली पदार्थ पोलिसांनी आज पहाटे जप्त केले. मात्र ही गाडी जिल्ह्यातील एका महामंडलेश्वर साधूशी संबंधित तर नाही ना? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून त्यावर लवकरच प्रकाश पडायची शक्यता आहे. दरम्यान, मठाला नवीन गाडी दान म्हणून दिल्यानंतर जुनी गाडी संबंधित भाविक प्रसाद म्हणून घेतात, असेही तर्कवितर्क लावले जात आहेत.
एमडी नामक घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा संशयितांना नाशिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २६५ ग्रॅम अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास ५ लाख, ३० हजारांपेक्षा जास्त आहे. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. तिघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबतची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई परिसरातून काही जण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी नाशकात येणार असल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेवून होते.
आज (दि़. १६) पहाटे पाथर्डी रोडवर सापळा रचून रणजित गोविंदराव मोरे (३२, रा़ .२०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून २६५ ग्रॅम एमडी नावाचा अंमली पदार्थाचे तीन पाकीट ताब्यात घेण्यात आले. या अंमली पदार्थाची किंमत जवळपास ५ लाख ३० हजार रुपये आहे. तसेच ४६ हजारांचे मोबाईल फोन व टाटा सफारी वाहन किंमत १० लाख रुपये असा एकूण १५ लाख ७६ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या अंमली पदार्थांवर २०१५ पासून बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, तिघा संशयिताना न्यायालयात हजर केले असता १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याकाळात पोलीस अधिक तपास करणार असून शहरात अंमली पदार्थांबाबत अधिक माहिती त्यांच्याक्डून मिळण्याची शक्यता आहे.

या पत्रकार परिषदेत डॉ. सिंगल यांना नाशिकमध्ये वाढलेल्या तरुणाईच्या आत्महत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सिंगल म्हणाले की, आम्ही कॉलेजमध्ये थेट विद्यार्थ्यांची बोलतो आहोत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो आहोत. त्यांना काही तरुणांशी बोलतो आहोत, शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन जनजागृती करतो आहोत. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ञांशी वेळोवेळी बोलून विद्यार्थांना येणाऱ्या नैराश्यातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत असे डॉ. सिंगल म्हणाले. 

दरम्यान, गंगापूर रोड परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. तेथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी बर्थडे परतीच्या नावाखाली हुक्का पार्लर, मद्यसेवन करून धिंगाणा घालतात यावर नाशिक पोलीस कारवाई करणार का? या विषयावर बोलतात डॉ. सिंगल म्हणाले की, शहर पोलीस नियमित गस्त घालत असतात. असे काही हॉटेल्सची माहिती मिळाल्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे डॉ. सिंगल म्हणाले.

LEAVE A REPLY

*