आमदार वैभव पिचड यांच्या पाच पुरवणी मागण्यांना मंजूरी

0

12 कोटींचा निधी उपलब्ध होणार
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील विविध समस्यांबाबत कपात सूचना मांडणार्‍या आ.वैभवराव पिचड यांच्या पाच कपात सूचनांची अर्थविभागाने दखल घेतली आहे. त्यातील पुरवणी मागण्यांना सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

आ.वैभवराव पिचड यांनी आंबित गावातील भूस्खलनाला प्राधान्य दिले होते. आंबित गावाचे रस्ते व जमीनीचे होणारे नुकसान, डोंगरकडे कोसळण्याने आपत्कालीन निर्माण होणारी स्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथकाची प्रतिक्षा करावी लागते याकडे शासनाचे लक्ष वेधले होते.

त्यासाठी आपत्कालीन निवारण प्रशिक्षण केंद्र मंजूर केले जावे. व त्यासाठी यंत्र सामुग्री खरेदीसाठी निधी मिळावा असा पुरवणी मागणीत आग्रह धरला होता. त्यानुसार शासनाने ही मागणी मान्य केली आहे. यासाठी 22 लाख 70 हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. अकोले तालुक्यात अम्रुतसागर दूध प्रक्रिया व व्यावसायिक संघ आहे.त्याच्या मार्फत दूध संकलन केले जाते.

आदिवासी दुर्गम व डोंगराळ भागात या संस्थेच्या माध्यमातून चांगली पशु संवर्धन सेवा जनतेला मिळत आहे. याकडे लक्ष वेधून संस्थेच्या माध्यमातून उकृष्ट दूध संकलन केले जात आहे. त्याच्या विस्तारीकरणासाठी व दुग्धशाळा विकासासाठी केंद्र शासन योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी मिळावा असा आग्रह पिचड यांनी धरला होता. ती मागणी शासनाने मंजूर केली आहे व यासाठी 1 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे.

अकोले हा तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात तालुक्यातील 191 गावांपैकी आदिवासी बहुल वस्तीची खेडी जवळपास 151 आहेत. त्यातील शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या जास्त आहे. तेव्हा तालुका मुख्यालयी एक हजार मुलींच्या निवासासाठी एक वस्तीगृह बांधले जावे अशी पुरवणी मागणी त्यांनी मांडली होती. त्यासाठी शासनाने 10 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तर आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण हे राजूर व अकोले येथे मोठ्या प्रमाणावर होत आहे. या मुलांसाठी तालुका मुख्यालयी व राजूर या महत्वाच्या ठिकाणी बस स्थानक उभे रहावे. त्यामुळे त्यांची सोयी सुविधांअभावी होणारी त्यांची कुचंबणा थांबेल असा आग्रह धरला होता.

शिवाय राजूर येथे संरक्षक भिंत उभारून राजूर येथे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे बस स्थानक व्हावे असाही आग्रह धरतांना यासाठी निधीची मागणी केली आहे. तर अकोले तालुक्याचे पौराणिक व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असणार्‍या अगस्ती देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यातून या देवस्थानासाठी पर्वणी काळात भाविकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी निधीची मागणी केली होती.या सर्व कपात सूचनांना शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यावर आ.पिचड यांनी तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी कपात सूचना मांडल्या होत्या. त्यात आंबितचा भूस्खलन प्रश्न, आदिवासी भागातील मुलींसाठी तालुक्याच्या ठिकाणी वस्तीगृह, दुग्धविकास योजनेचा लाभ, मुलींचे वस्तीगृह, राजूर येथे बसस्थानक इमारत व अगस्ती देवस्थान परिसर विकास याबाबत शासनाला त्यांनी कपात सूचनेद्वारे निधी उपलब्ध व्हावा असे कळवले होते.

LEAVE A REPLY

*