येवल्यात पाच तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवकाला करोना

येवल्यात पाच तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवकाला करोना

नाशिक l प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि.२६) सहा नवे करोना बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी पाच रुग्ण एकटया येवला तालुक्यातील आहे.

तर आदिवासी तालुका असलेल्या सुरगाण्यातही करोनाने शिरकाव केला आहे. या ठिकाणी अतिदुर्गम तलपाडा गावातील २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.

हा तरुण नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवक असल्याचे समजते. हा रुग्ण शहरातील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरातील असल्याचे समजते. या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोण आले असावे याबाबतची माहिती घेण्यास गती दिली जाणार आहे. यामुळे जिल्हयात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा १४९ वर पोहचला अाहे.

करोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या मालेगावमध्ये सोमवारी एकही नवा करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. या ठिकाणी तीन रुग्ण करोनामुक्त झाले.

एकीकडे हा दिलासा मिळाला असताना सहा नवे करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात पाच रुग्ण हे येवल्यातील असून एक सुरगाण्यातील आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात करोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

येवल्यातील करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तर मालेगावमध्ये १२७, सुरगाणा एक अशी करोना बाधित रुग्णांची संख्या आहे. नाशिक शहरासह मालेगाव वगळून इतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.

दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील रुग्ण नाशिकमध्ये वास्तव्यास असून सुरगाणावासियांनी चिंता करण्याची गरज नाही. तसेच आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचारास सुरुवात करणार असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com