रागावले म्हणून ५ अल्पवयीन मुले आली पळून; रेल्वे पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

0
मनमाड (प्रतिनिधी) | सध्याची मुले अत्यंत रागट स्वभावाची झाली आहेत. त्यांच्यावर कोणी थोडसं जरी रागावलं तर त्यांना ते सहन होत नाही. रागाच्या भरात कोणी टोकाचे पाऊल उचलून थेट आत्महत्या करतात. तर कोणी घर सोडून पळून जातं. अशाच वेगवेगळ्या तीन घटना मध्ये ३ मुली आणि २ मुले अभ्यास करत नाहीत म्हणून पालकांनी सर्वासमोर कानउघडणी केल्याचा राग मनात धरून घरातून पळून आले होते.

मनमाड रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत बेवारस पणे फिरत असलेली ही पांचही बालके रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यानी दाखविलेल्या समय सुचाकातेमुळे सुखरूपपणे त्यांच्या पालकांना मिळाली आहेत.

मनमाड रेल्वे स्थानक महत्वाचे जंक्शन मानले जाते येथून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तसेच पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश यासह इतर राज्यातील रोज शंभरपेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होते.

त्यामुळे रागाच्या भरात घरातून पळून आलेले अनेक लहान-मुले, मुली नेहमीच येथे आढळून येतात. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संशयित रित्या फिरणाऱ्या अशा लहानग्यांची विचारपूस करीत असतात. आरपीएफ अधिकारी राकेश कुमार व एस.ए.वाणी सह इतर आरपीएफ हे ५-६ या प्लॉट फॉर्मवर गस्त घालत असताना त्यांना भेदरलेल्या अवस्थेत तीन मुली आढळून आल्या.

राकेश कुमार यांनी त्यांच्याजवळ जावून त्यांची विचारपूस केली असता या मुलीनी आशु आनंद (वय १० वर्षे), ख़ुशी आनंद (वय ८ वर्षे) आणि पूजा ठाकूर (१४ वर्षे ) असे नाव सांगून मध्य प्रदेशातील खांडवा येथील असल्याचे सांगितले.

पालक रागावले म्हणून दोन दिवसापूर्वी आम्ही रागाच्या भरात घरातून पळून आल्याचे या मुलीनी सांगितले. कुमार हे या मुलीना घेऊन आरपीएफ इन्स्पेक्टर के.डी.मोरे यांच्याकडे घेऊन आल्यानंतर मोरे यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली.

मुली उपाशी  असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना अगोदर जेवण देण्यात आले. त्यानंतर मोरे यांनी खांडवा आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता या मुली मिसिंग असल्याची तक्रार दाखल असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगून त्यांनी तातडीने या मुलींच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला.

त्यांच्या मुली मनमाडच्या आरपीएफकडे सुखरूप असल्याचे त्यांना सांगितले. आपल्या मुली सापडल्या आणि त्या सुखरूप असल्याचे कळताच दोन दिवसापासून मुलींचा सर्वत्र शोध घेत असलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आणि ते मनमाडला आले.

आरपीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत आपल्या मुलीना घेऊन घराकडे रवाना झाले. या मुलीना त्यांच्या पालकांच्या हवाली केल्यानंतर राकेश कुमार यांना प्लॉट फॉर्म क्र. १ व ५ वर  शालेय गणवेशात असलेली दोन मुले फिरत असल्याचे आढळून आली. त्यांची विचार पूस केल्यानंतर ती देखील घरातून पळून आल्याचे आल्याचे समोर आले.

एकाचे नाव शिव नागाशेट्टी (वय-१२ वर्षे, रा.कर्नाटक) तर दुसऱ्याचे नाव सत्यम सरोज लालजी (वय-१२ वर्ष, मानखुर्द मुंबई) असे होते या दोघांच्या पालकांशी संपर्क  साधल्यानंतर दोघांचे पालक आले व त्यांनी आपल्या मुलांना घेवून गेले.

कधी गर्दीत चुकल्याने, कधी पालकांनी रागावल्यामुळे रागाच्या भरात घर सोडल्यामुळे तर कधी कुणाचे अपहरण झाल्यामुळे अनेक लहान मुले-मुली आपल्या घराला मुकतात. आई-वडीलापासून दुरावलेल्या अशा लहानग्यांच्या घर वापसी साठी केंद्र शासनाने ऑपरेशन मुस्कान सुरु केले आहे.

या मोहिमे अंतर्गत मनमाड रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) आत पर्यंत तब्बल शंभर मुलांची घरवापसी केली आहे. आरपीएफची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे म्हटल्याचे ते वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

*