शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; नाशिक जिल्ह्यातील ‘ही’ दोन गावे ठरणार पहिले लाभार्थी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यात सोनांबे आणि चांदोरी येथील शेतकऱ्यांना पहिला कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात घोषणा केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.  त्यानुसार आज शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील तीन महिन्यांत या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले आहे. कर्जमाफीतील शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर केल्या जातील.

सरकारने केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला लाभ मिळणार आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचे काम सुरू झाले असून सरकारने कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चादेखील पार पडणार असल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *