फिरोदिया फाऊंडेशन गुणवंत खेळाडूंच्या पाठिशी

0
नरेंद्र फिरोदिया यांचे आश्वासन
कुस्तीपटू गिरी व सोनाली मंडलिकला घेतले दत्तक

अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून, अनेक महिला कुस्तीपटू पुढे येताना दिसत आहे. दंगल सिनेमा आल्यापासून मुलीसुध्दा कुस्ती खेळ खेळू शकतात ही मानसिकता तयार झाली आहे. शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन नेहमीच गुणवंत नवोदीत गरजू खेळाडूंच्या मदतीला पाठिशी उभे असल्याची भावना उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली.
शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने नवोदित कुस्तीपटू प्रविण गिरी व सोनाली मंडलिक यांना दत्तक घेण्यात आले. मंगळवारी दोन्ही मल्लांसाठी लागणार्‍या वार्षिक खर्चाच्या रकमेचा धनादेश उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, पै.रामभाऊ लोंढे, कुस्ती प्रशिक्षक राहुल शिंदे, भरत गिरी, कोंडीबा मंडलिक आदि उपस्थित होते.
पुढे फिरोदिया म्हणाले की, नुकतेच शहरात झालेल्या कुस्ती स्पर्धेत 12 वर्षाचा प्रविण गिरी व 14 वर्षाची सोनाली मंडलिक यांनी चांगली कामगिरी केल्याने फाऊंडेशनने त्यांना सर्वपरीने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंवर लक्ष ठेवून, त्यांना सहकार्य केले जाते. दोन्ही उत्कृष्ट कुस्तीपटू असल्याने आत्तापासून ते सरावाला लागल्यास सन 2024 मध्ये होणार्‍या ऑलंम्पिक स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
या गुणवंत खेळाडूंना मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा तालिम संघाच्या वतीने पै.वैभव लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज दोन्ही खेळाडूंना आर्थिक मदत देण्यात आली. प्रविण गिरी 12 वर्षाचा असून, त्याने अहमदनगर जिल्हा कुस्ती चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. सध्या कोल्हापुर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्याने बहारदार खेळाचे प्रदर्शन करत आखाडा गाजवला. तर सोनाली मंडलिक ही 14 वर्षाची महिला कुस्तीपटू असून, तीने अहमदनगर जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले होते. तसेच तीने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य व कास्य पदक पटकाविले आहे. या मिळालेल्या मदतीबद्दल नवोदित खेळाडूंचे पालक भरत गिरी व कोंडिबा मंडलिक यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*