रहिवासी क्षेत्रात फटाके विक्रीस जिल्ह्यात बंदी; प्रांत, तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश

0
नाशिक । सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. नाशिक जिल्ह्यातही हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात रहिवासी भागात अशाप्रकारे फटाके विक्रीस परवानगी देऊ नये अन्यथा कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित तालुक्याचे प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता विक्रेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.

फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार रहिवासी क्षेत्रात फटाके विक्रीला पूर्णपणे बंदी घालावी आणि ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत त्यांचे परवाने तातडीने रद्द करावे, असे कोर्टाचे आदेश आहेत.

कायमस्वरुपीच्या परवान्यांना निवासी उपजिल्हाधिकारी तर तात्पुरत्या स्वरुपातील परवाने तहसीलदारांकडून दिले जातात. शहरात मनपा, पोलीस आयुक्तांचीही परवानगी आवश्यक आहे. त्यांच्या संमतीनंतरच दुकाने सुरू करता येतात. पण रहिवासी परिसरात फटाके विक्री धोकेदायक आहे. त्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने रहिवासी परिसरातील फटाके विक्रीवर बंदी आणली आहे.

त्याची अंमलबजावणीही तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनीही लागलीच प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनाही रहिवासी परिसरातील दुकाने बंदीचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे दिवाळीपूर्वीच रहिवासी परिसरातील दुकानांना स्थलांतरीत करण्याची किंवा बंद करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर आता नव्याने परवाने देतानाही या नियमांची योग्य तपासणी करावी. कुठल्याही कायमस्वरुपी किंवा तात्पुरत्या परवानाधारकास रहिवासी परिसरात परवाना दिला जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दुसरीकडे परवाना दिल्या जाणार्‍या परिसरातही आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्वच बाबींची योग्यपणे पूर्तता आणि सुविधा आहे किंवा नाही याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे यंदा रहिवासी परिसरात दुकाने सुरू करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याने सर्वच विक्रेत्यांनी नियमांचे योग्यपणे पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाच्य वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*