Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

फटाका मार्केटने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Share

लोकवस्तीत आणि पेट्रोल पंपाशेजारील फटाका मार्केटचा परवाना रद्द करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकवस्तीत आणि पेट्रोल पंपाशेजारी नगर-कल्याण रोडवर शिवाजीनगर येथे फटाका मार्केटला कोणतीही चौकशी न करता चुकीच्या पध्दतीने परवानगी दिल्याचा आरोप करीत, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने सदर मार्केटचा परवाना रद्द करण्याची मागणी रंजना पोटे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून, याप्रकरणी कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नगर-कल्याण रोडवर शिवाजीनगर परिसरात नगर फटाका असोसिएशनतर्फे फटाका मार्केट उभारण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने परवानगी देण्यात आली असून, नगर-कल्याण मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गालगत फटाक्याच्या मार्केटसाठी परवानगी देता येत नाही. त्याचबरोबर या मार्केटला एका बाजूस पेट्रोल पंप तर मागील बाजूस लहान मुलांची शाळा तसेच शेजारील परिसरात मोठी लोकवस्ती आहे. असे असताना देखील नगर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष पाहणी न करता कनिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या खोट्या अहवालानुसार या मार्केटला परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप रंजना पोटे यांनी केला आहे.

दीपावलीच्या सणासाठी फटाके खरेदी करण्याकरिता नागरिकांची येथे वर्दळ असणार आहे. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे फटाका मार्केटला आग लागली होती. सुदैवाने फटाका मार्केट शहराच्या लांब असल्याने मोठा अनर्थ टळला होता. मात्र नगरमधील फटाका मार्केट शहरातच असून, शेजारी पेट्रोल पंप देखील असल्याने अनुचित प्रकार घडल्यास याचे गंभीर परिणाम नगरकरांना भोगावे लागणार आहेत. फटाका मार्केटसाठी चुकीच्या पध्दतीने देण्यात आलेल्या परवानगीची चौकशी करून या मार्केटचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. फटाका मार्केटमध्ये काही दुर्घटना घडल्यास या मार्केटला परवानगी देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याचे निवेदनात म्हटले आहे. या मार्केटचा परवाना रद्द न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे पोटे यांनी सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!