Type to search

Featured सार्वमत

फायर ऑडिट गेलं चुलीत !

Share

क्लासेसवाल्यांचं केवळ ‘कमाई’कडे लक्ष । सुरक्षा वार्‍यावर

अहमदनगर (प्रतिनिधी)-  गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक बिल्डींगचे (खासगी, शासकीय, निमशासकीय) फायर ऑडिट करणे कायद्याने बंधनकारक असले तरी नगरमधील खासगी क्लास चालकांना मात्र फायर ऑडिटचे वावडे असल्याची माहिती हाती आली आहे. नगरमध्ये डझनभर खासगी क्लासेस असले तरी त्यातील एकानेही फायर ऑडिट केले नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली. फक्त कमाई’ उद्देश डोळ्यासमोर ठेवणार्‍या क्लासवाल्यांना विद्यार्थी सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान गुजरातच्या सुरतमधील क्लास बिल्डींगला लागलेल्या आगीत विद्यार्थी मृत झाल्याची घटना घडून महिना उलटल्यानंतर नगरच्या महापालिकेला फायर ऑडिटची जाग आली आहे. नगरमधील खासगी क्लास चालकांनी बिल्डींगचे तसेच हॉटेल्स, मॉल्स आणि शासकीय, निमशासकीय बिल्डींगचे फायर ऑडिट तीन महिन्यात करण्याची ताकीद महापालिकेने दिली आहे.

महाराष्ट्र आगप्रतिबंधक जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम 2006 चे कलम 3(1) नुसार सार्वजनिक वापराच्या आणि लोकांची वर्दळ असणार्‍या खासगी बिल्डींगचे फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. ऑडिटचा अहवाल वर्षातून दोनदा महापालिकेच्या फायर विभागातील मुख्य अग्निशामक अधिकार्‍याकडे सादर करावयाचा आहे. नगरमधील हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल, व्यापारी संकुल तसेच खासगी क्लासच्या बिल्डींगसोबतच शासकीय आणि निमशासकीय बिल्डींगचे फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. खासगी बिल्डींगचे ऑडिट करण्याची जबाबदारी मुळ मालकाची असल्याचे सांगण्यात आले. नगरमधील हॉटेल्स, मॉल्स आणि व्यापारी संकुलात तसंच खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. तेथे विपरीत काही घडल्यास उपाययोजना असणे गरजेचे आहे. मात्र त्याची दक्षता कोणीच घेतलेली नाही.

नगरमध्ये अनेक ठिकाणी खासगी क्लास असले तरी एकानेही फायर ऑडिट केलेले नाही. महापालिकेने परिपत्रक काढले आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल.
– शंकर मिसाळ, मुख्य अग्निशामक अधिकारी, महापालिका

लाखोंच्या जाहिराती, सुरक्षेचा विसर…
दहावी, बारावीचे विद्यार्थी शिकवणीसाठी यावेत यासाठी पेपरात लाखो रुपयांच्या जाहिराती देणारे क्लासचालक फक्त ‘कमाईच्या’ मागे लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी त्यांना काहीच घेणे-देणे नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असले तर त्याकडे दुर्लक्ष करत फक्त ‘कमाई’ सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!