Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog : आगामी काळ ‘स्लोबलायझेशन’ चा !

Blog : आगामी काळ ‘स्लोबलायझेशन’ चा !

आजचे जग जागतिकीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाशी लढत आहे. गूगलवर ‘राष्ट्रवाद’ हा शब्द ‘जागतिकीकरण’ या शब्दापेक्षा अधिक सर्च केला जात आहे. 16 वर्षांची ग्रेटा थनबर्ग ही स्विडिश कार्यकर्ती जलवायू परिवर्तनाच्या समस्येविषयी चाललेल्या चळवळीची जागतिक ‘आयकॉन’ बनली आहे. सरकार आणि कंपन्यांना आपल्या प्राधान्यक्रमांविषयी विचार करण्यास तिने भाग पाडले आहे. शाश्वत विकासासाठी केवळ चांगले नागरिक घडणे पुरेसे नसून, पोषक व्यावसायिक वातावरणही आवश्यक आहे.

नवे सहस्रक सुरू होत असताना ते एक निर्णयक वळण वाटत होते आणि त्या क्षणापासून आता आपण वीस वर्षे पुढे आलो आहोत. झपाट्याने बदलणारे जग आणि बरीच उलथापालथ या वीस वर्षांच्या काळात आपण पाहिली. या वीस वर्षांत इतके गतिमान बदल झाले आहेत, जे घडून येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते.

- Advertisement -

नव्या शक्तिशाली कंपन्या कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा भाग बनून गेल्या. परंतु त्यांचे पतनही अत्यंत नाट्यमय रीतीने सुरू झाले. तेलाचा जुना खेळ सुरू राहिलाच; परंतु त्याच्याही पुढे जाऊन जग काही नव्या दुष्टचक्रांमध्ये अडकले. सहस्रकाची सुरुवात डॉटकॉम कंपन्यांचा व्यवसाय बुडण्याने झाली; मात्र अलीकडील काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सर्वांत अधिक यशस्वी झाल्याचे दिसते. नंतर आलेल्या मंदीने सर्वांचेच कंबरडे मोडले. परंतु काळाचा महिमा असा की, त्यावेळी मंदीची जी केंद्रे होती त्यांचेच रूपांतर आज जागतिक वृद्धीचे संचालन करणार्‍या सर्वांत चमकदार केंद्रांमध्ये झाले आहे. नाट्यमयरीत्या चीनचे जगावर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. चीनच्या आर्थिक प्रगतीतून आपल्याला एक धडा मिळतो तो असा की, अलीबाबा आजही खजिना प्राप्त करू शकतो. फक्त त्यासाठी त्याच्याकडे एक डिलिव्हरी बॉय असणे गरजेचे आहे.

कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी हे नवे जग नाही. प्रत्येक दशकात ‘फॉर्च्यून 500’ मधील एक तृतीयांश कंपन्या या यादीतून बाहेर फेकल्या जातात तर एस. अँड पी. च्या 500 कंपन्यांच्या यादीत एका कंपनीचे सरासरी आयुर्मान 1960 च्या दशकात 60 वर्षांचे होते, ते आता 20 वर्षांवर उतरले आहे. अत्यंत स्पर्धात्मक अशा या वातावरणात सर्वांना जोडून ठेवणारा एकच दुवा आहे. पृथ्वी आपल्या सर्वांची आहे आणि आपण सगळे मिळून एकतर तिला वाचवू शकू किंवा तिचा नायनाट करू शकू. पृथ्वीच्या अस्तित्वाचा आणि निरंतरत्वाचा अजेंडा 2019 मध्ये अभूतपूर्व स्वरूपात सर्वांसमोर आला आहे आणि त्याची सूत्रे नव्या पिढीने आपल्या हाती घेतली आहेत. ‘तुम्ही आमच्यासाठी कोणत्या प्रकारचे भवितव्य घेऊन आला आहात,’ असे ही पिढी मागील पिढीला विचारू लागली आहे. हा सवाल ऐकून सर्व नामवंत कंपन्यांवर योग्य उत्तर शोधून काढण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. जागतिक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या जगात कोणती ताकद व्यवसायाला यशस्वितेकडे घेऊन जाते, हे शिकण्याची संधी आपल्याकडे आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अनुभव आणि धडे या दृष्टीने प्रातिनिधिक आहेत. हे धडे जेवढे आदित्य बिर्ला समूहाचे (एबीजी) आहेत, तेवढेच माझे व्यक्तिगत आहेत.

पहिला धडा असा की, प्रमाणबद्धता सर्वांत महत्त्वाची – प्रमाण हे केवळ आकाराशी संबंधित नाही तर पाया व्यापक करण्याबरोबरच वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गुणवत्ता आणि सेवांचे निकष कायम रखण्याशीही प्रमाण या संज्ञेचा संबंध आहे. जेव्हा असे घडेल तेव्हाच तुम्ही ग्राहकाची पहिली पसंती बनाल. यासंदर्भात तीन महत्त्वाची तत्त्वे आहेत. 1) ब्रँडची ताकद, 2) ग्राहकांचा विचार आणि 3) प्रतिभा. प्रमाणाच्या (स्केल) माध्यमातून प्रतिभांना आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे सुलभ झाले आहे, असे मी मानतो.

दुसरा धडा आहे एकसूत्री वातावरण म्हणजेच कनेक्टेड इकोसिस्टिम, अपरिचितांशी संबंध प्रस्थापित करणे. नव्या जमान्यात मूल्यवर्धनाच्या दृष्टीने व्यावसायिकांना वेगवेगळ्या उद्योगांमधून आणि कंपन्यांमधून येणार्‍या अपरिचित वृद्धिदूतांशी एकवाक्यता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भविष्यातील व्यावसायिकांनी वेगवेगळ्या उद्योजकांमधील सकारात्मक आंतरिक अवलंबित्वाच्या आधारावर वाटचाल करायला हवी. तिसरा धडा म्हणजे डिजिटल, क्वान्टम भरारी – जेफ इल्मेट यांनी एकदा म्हटले होते, “अपूर्ण, अर्धवट उपाययोजना मोठ्या कंपन्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. कारण लोकांना त्यातून वचनबद्धतेचा अभाव जाणवतो. जेव्हा तुम्ही परिवर्तनाचा निर्णय घेता, तेव्हा तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी तयार राहिले पाहिजे. उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत निधी आणि मनुष्यबळ कमी पडू देता कामा नये. तुम्हाला तुमचे सर्वस्व पणाला लावावे लागते.” थोडक्यात, कोणत्याही व्यवसायात परिवर्तन आणायचे असेल, तर ताकद पणाला लावावी लागते.

चौथा धडा आहे शाश्वतीचा – आता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. इतिहासकार जेव्हा 2019 या वर्षाबद्दल लिहितील तेव्हा जलवायू परिवर्तनावरील विचारमंथनात मोठी प्रगती साधण्याचे वर्ष, असाच उल्लेख केला जाईल. ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनमधील 16 वर्षांची कार्यकर्ती आज जलवायू परिवर्तनाच्या चळवळीचा जागतिक चेहरा बनली आहे. सरकारे आणि कंपन्यांना आपल्या प्राधान्यक्रमांवर विचार करायला तिने भाग पाडले आहे. नव्या वातावरणात आपल्याला धोरणात्मकदृष्ट्या असा विचार करावा लागेल, की व्यावसायिक मूल्य या बाबतीत कसे निर्माण करता येईल? शाश्वत विकासात केवळ लोकांच्या जागृतीलाच नव्हे तर व्यवसायातील सकारात्मक बदलांनाही अनन्यसाधारण स्थान आहे.

जग चौरसाकृती नाही, हा पाचवा धडा – राष्ट्रवाद आणि जागतिकीकरण यांच्या संघर्षातून निर्माण होत असलेला तणाव हाच आपला वर्तमान आहे. हा संघर्ष पुढील दहा वर्षांच्या काळात या बाबतीत अधिक स्पष्टता आणेल. फ्रिडमॅन यांनी 2005 मध्ये जेव्हा ‘वर्ल्ड इज फ्लॅट’ असे म्हटले होते, त्यावेळी जगाचे स्वरूपच वेगळे होते. त्यांचे म्हणणे असे होते की, तंत्रज्ञान आणि भूराजकीय परिस्थिती आपल्या जीवनाला आकार देत असून, आपण मात्र या प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहोत. आता आपण सावध झालो आहोत. त्यामुळे आपण जागतिकीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाशी लढा देत आहोत. आज आपण एका अशा जगात वावरतो आहोत, जिथे गूगलवर ‘राष्ट्रवाद’ हा शब्द ‘जागतिकीकरण’ या शब्दापेक्षा अधिक वेळा सर्च केला जातो. जागतिकीकरणाची प्रक्रिया अशीच पुढे चालू राहणे अपरिहार्य असेल; परंतु जग चौरसाकृती राहिलेली नाही, हे मात्र निश्चित झाले आहे. ग्लोबलायझेशन जसजसे ‘स्लोबलायझेशन’साठी पार्श्वभूमी तयार करीत आहे, तसतसे व्यवसायांसंबंधीचे अंदाज अधिकाधिक क्षेत्रीय बनत चालले आहेत. आपली माणसे हीच आपली ताकद आहे, हा सहावा धडा. – व्यवसायाचा पाया माणसांनी निर्माण झालेला आहे. दीर्घकालीन विचार केल्यास आपल्या सांस्कृतिक विकासक्रमात मला एक महत्त्वाचे धडे सापडतात. क) उद्दिष्टांमुळे जादूची निर्मिती होते. ख) प्रामाणिक राहावे लागेल; कारण अप्रामाणिकपणा लोकांना आता ओळखू येत आहे. ग) संघटनात्मक संस्कृती ही अशी वस्तू आहे, जी एकसारखे दिसणार्‍या किंवा एकसारखा व्यवहार करणार्‍यांमधील मीलनरेषा बनते. हा साचा तोडणे आवश्यक आहे. नेतृत्वातील साधर्म्य उत्पादकतेला हानिकारक आहे. कार्यशक्ती सक्रिय ठेवली पाहिजे. नवतेला पर्याय नाही, हा मला मिळालेला सातवा धडा – नवतेच्या मार्गावर सृजनात्मकतेला वाव देणे हा संघभावना कायम राखण्यासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. लोकांची तार्किक बाजू भावनात्मक बाजूला जोडली जाणे, असा याचा अर्थ आहे. सातत्याने शिकत राहणे आणि बदलांनुसार स्वतःला तयार करण्याचे सामर्थ्यच एकमेव शाश्वत मार्ग असून, त्यायोगेच आपण जटिल वातावरणात यशस्वी होऊ शकतो, असे मला वाटते.

कुमारमंगलम बिर्ला (चेअरमन, आदित्य बिर्ला समूह)

- Advertisment -

ताज्या बातम्या