अखेर एसटी परीक्षेची केंद्रे बदलली; राज्यभरातील परीक्षार्थींना दिलासा

0
नाशिक । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मेगा भरती प्रक्रियेच्या परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या असताना परीक्षा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.

नाशिकच्या विद्यार्थ्यांना नागपूर, पुण्याचे औरंगाबाद, नागपूरच्या मुलांना नाशिक अशी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. याबाबत ‘देशदूत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. परिणामी आज अखेर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे राज्यभरातील परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) व कनिष्ठ सहायक पदाच्या 23 हजार 250 जागांची भरती सरळ सेवा भरती प्रक्रियेने केली जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून 5 सप्टेंबपर्यंत ‘ऑनलाईन’ अर्ज मागवण्यात आले होते.

या परीक्षा पारदर्शक करण्याच्या हेतून परीक्षा घेण्याचा ठेका पुणेस्थित एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून उमेदवार परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. विविध पदनिहाय 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी परीक्षा होत आहेत.

परंतु पाच दिवसांपूर्वी ऑनलाईन देण्यात आलेल्या परीक्षा प्रवेश पत्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. राज्यातील अनेक परीक्षार्थींना त्यांचा जिल्हा सोडून इतर दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे देण्यात आली होती.

नाशिकच्या परीक्षार्थींना नाशिकऐवजी नागपूर तसेच इतर बाहेरच्या जिल्ह्यात केंद्र मिळाले आहे. तर काही विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले होते. पुण्याच्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद व इतर जिल्हे, नागपूर, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना नाशिक अशी इतर जिल्ह्यातील तसेच शेकडो किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. वास्तविक त्या जिल्ह्यात प्रत्येक पदाच्या 80 ते 200 अशा प्रमाणात जागा आहेत.

यासाठी त्या-त्या जिल्ह्यातून प्रत्येक पदासाठी 20 ते 30 हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे त्या-त्या जिल्ह्यातच मोठी स्पर्धा असताना या परीक्षांची केंद्रे इतर जिल्ह्यांमध्ये का देण्यात आली, असा प्रश्न परीक्षार्थींनी उपस्थित केला होता. इतक्या दूर परीक्षेसाठी जाण्याचा तसेच राहण्याचा खर्च तसेच परवड परीक्षार्थींना सहन करावी लागणार होती. तसेच यामध्ये महिलावर्गाचा प्रश्न गंभीर होता.

याबाबतचे सविस्तर वृत्त ‘देशदूत’ने 4 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते तसेच याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला होता. अधिकार्‍यांनी संबंधित कंपनीच्या पदाधिकार्‍यांशी बोलून शक्य असेल तर परीक्षा केंद्र बदलण्याबाबत आश्वासन दिले होते.

अखेर आज सर्व परीक्षार्थींची परीक्षा प्रवेशपत्रे पुन्हा ऑनलाईन पाठवण्यात आली असून त्यामध्ये सर्वांना स्थानिक जिल्ह्यातील त्यांनी प्राधान्यक्रम दिलेली परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. ‘देशदूत’च्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*