रांजणगाव मशीदच्या तेशवाणी वेताळची चित्रपट क्षेत्रात भरारी

0
सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील बालकलाकार तेशवाणी वेताळ हिने चित्रपट क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. तिचे ‘घुमा’, ‘पतंग’, ‘व्वा पहिलवान’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत.
तेशवाणी हिचा शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील कलागुण ओळखून शिक्षकांनी कुटबाला माहिती दिली. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. वडील वाहनचालक व आई गृहिणी; परंतु मुलीच्या भवितव्यासाठी आईने सर्व दागिने विकून एका दिग्दर्शकाकडे पैसे भरले. मात्र त्यात त्यांची फसवणूक होऊन त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र त्यानंतर दिगदर्शक सुनील अग्रेसर भेटले.
तेशवाणीला एका चित्रपटात दिलेली छोटीशी भूमिका यशस्वी पार पाडली. नंतर माउली पुराणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिगदर्शक विश्वास रांजणे यांनी ‘झेंडा स्वाभिमानाचा’ हा पहिला चित्रपट दिला. नंतर दुसरा कुंडलिक केदारे यांचा ‘पैलवान’ चित्रपटात यशस्वी काम केल्यानंतर दहावी, बाजार, पतंग, घुमा, पॉकेटमनी, आयटमगिरी यासह अनेक चित्रपटांत तिने प्रमुख भूमिका साकारल्या.
यासह ‘तू माझा सांगाती’, ‘बे दुणे चार’, ‘बोधी वृक्ष’ आदी मालिकांत काम केले. ‘आई मला जगायचंय’, ‘भ्रमणध्वनी’ आदी शॉर्ट फिल्ममध्ये देखील यशस्वीरित्या काम केले. नाटकामध्ये देखील आपला ठसा उमटवत तिने ‘सळो की पळो’, ‘युग प्रवर्तक’ छत्रपती शिवरायमध्ये काम करत तेशवाणी हिने प्रेक्षकांची मने जिंकली. रांजणगाव येथील मूळची रहिवासी असलेल्या तेशवाणी वेताळ हिने चित्रपट क्षेत्रात अतुंग भरारी घेतली असून चित्रपट क्षेत्रात पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचे नाव तिने उज्ज्वल केले आहे.

 

LEAVE A REPLY

*