अतिरेक्यांकडून धोका असतानाही भंडारदरा येथे चित्रपटाचे चित्रीकरण

0

भंडारदरा (वार्ताहर) – भंडारदरा धरण सुरक्षेला अतिरेक्यांकडून धोका असल्याचा घातपात विरोधी पथकाचा अहवाल असताना देखील 25 नोव्हेंबर रोजी एका हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या बगीच्यामध्ये अगदी धरणाच्या भिंतीजवळ करण्यात आले. चित्रिकरणाला कार्यकारी अभियंता, अहमदनगर यांनी परवानगीचे पत्र दिल्याचे समजते.

भंडारदरा धरणावरुन रतनवाडी, भंडारदरा, गुहीरे, मुतखेल, कोलटेंभे या गावांना जाण्यासाठी कमी वेळ लागतो, परंतु धरणावरुन सुरक्षेच्या कारणास्तव रहदारी बंद केल्याने तीन ते चार किलोमीटर दूरच्या अंतरावरुन या खेड्यातील लोकांना प्रवास करावा लागत आहे. तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेज भंडारदरा वसाहतीत असल्याने विद्यार्थ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या बगीच्यामध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणाची परवानगी देण्यात आल्याने जलसंपदा विभागाला धरण सुरक्षिततेचे किती गांभीर्य आहे? याबाबत शंका निर्माण झाली आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

बॉम्ब शोधक व नाशक पथक, घातपात विरोधी पथक 14 नोव्हेंबर रोजी धरण परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले असता भंडारदरा जलसंपदा विभागाच्या अनेक त्रूटी त्यांच्या दृष्टीक्षेपात आल्याने त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत ताशेरे ओढले. याबाबत जलसंपदा विभागाला विकास घनवट (सहायक पोलीस निरीक्षक बी.डी.डी.एस. शिर्डी) यांनी अहवाल सादर केला.

त्यामध्ये भंडारदरा धरणावर शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात, चौकीदारांना गणवेश व ओळखपत्र नाही, विद्युत पुरवठ्याअभावी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बंद आहेत, जागोजागी सूचना फलक लावणे गरजेचे आहे, सतर्कतेच्या दृष्टीने रस्त्यावर चेकपोस्ट असणे आवश्यक आहे, अशा अनेक सूचना पथकाने केल्या व सुरक्षा व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

यानंतर गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांना धरणावरून ये-जा करण्यास तातडीने मज्जाव करण्यात आला. मग धरण सुरक्षेला धोका असल्याचा घातपात विरोधी पथकाचा अहवाल असताना देखील धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या बगीच्यामध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणाची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जलसंपदा विभागाकडून मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 7000 रुपये तर हिंदी चित्रपटासाठी 15000 रुपये प्रतिदिन आकारणी करून काही नियम व अटींसह करार करून परवानगी दिली जाते. चित्रिकरणासाठी त्यांच्या युनिट मध्ये वेगवेगळ्या प्रांतातील शेकडो कर्मचारी असतात. मग त्यांच्यापासून काही घातपात होण्याची शक्यता नाही का? केवळ काही हजार रुपयांसाठी धरण सुरक्षेकडे कानाडोळा करायचा का? असे प्रश्न उपस्थित होत असून चित्रिकरण सुरू असताना त्यांच्यावर देखरेखीसाठी केवळ एक मुकादम व चार कर्मचारी नेमलेले आहेत.

एकीकडे कमीत कमी स्थानिक नागरिकांना व महाविद्यालयीन तरुणींना तरी धरणावरुन ये-जा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली असतानाही सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगी दिली जात नाही. तर दुसरीकडे सहजासहजी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येते. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*