Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

लॉकडाऊन – तबलिगी जमातीशी संबधित आठ विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल

Share

पुणे (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात क्वारंटाईनचे आदेश असतानाही पुण्यातील वेगवेगळ्या मस्जिदमध्ये फिरणार्‍या आठ विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व टांझानिया देशातील नागरिक असून टुरिस्ट व्हिसावर 11 मार्च रोजी भारतात आले होते. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील घटनेनंतर पोलिसांनी या सर्वांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतरही हे सर्व 24 ते 29 मार्च दरम्यान पुण्यातील वेगवेगळ्या मस्जिदमध्ये फिरत राहिले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर आठही जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या मरकझ येथील कार्यक्रमाचा आणि या आठ लोकांचा काही संबंध नाही. परंतु, हे सर्व तबलिगी जमातीशी संबधित आहेत. पोलिसांनी 24 मार्च रोजी या सर्वांची तपासणी केली असून यातील कोरोनाबाधित कोणीही नाही. परंतु, त्यानंतरही त्यांनी वेगवेगळ्या मस्जिदमध्ये हजेरी लावल्याने पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, दिल्ली मरकजवरुन परत आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सध्या एकूण 661 व्यक्ती असून त्यापैकी 299 व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 49 व्यक्ती या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असून 205 व्यक्ती महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये आहेत. अजून 107 व्यक्तींचा शोध सुरु आहे.
तबलिग जमातने माफीनामा जाहीर करावा- मुस्लीम सत्यशोधक मंडळ
सर्वसामान्य मुस्लीमांची असुरक्षितता वाढत असतानाच, कोरोना ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणार्‍या तबलिग जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा ) करुन संपूर्ण भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे मागणी केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिग जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातुनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे तबलिग जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी तबलिगला कसली ट्रिटमेंट देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे. असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लीमांची असुरक्षितता वाढत असतानाच, कोरोना ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणार्‍या तबलिग जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा ) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी. अशी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने मागणी केली आहे. येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिद मध्ये नमाज आदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लीम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज अदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवांना गळाभेट – अलिंगन दिले जाते. हे सर्व कोरोना विषाणु पसरवण्यात आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवावे. शासन, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ सर्वांना करीत आहे. असे या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!