संगमनेरात दोन समाजात वाद : पैशाच्या कारणावरुन एकावर वार

0

संगमनेर (प्रतिनिधी) – पैशाच्या कारणावरुन एका समाजातील व्यक्तीने दुसर्‍या समाजातील व्यक्तीच्या पोटावर वार केल्याची खळबळजनक घटना संगमनेरपासून जवळच असलेल्या घुलेवाडी येथील कामगार वसाहतीत काल गुरुवारी घडली.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सुलताना जमिल शेख (रा. कामगार वसाहत, घुलेवाडी) हिने शामा अशोक जेधे (रा. जेधे कॉलनी, संगमनेर) हिच्याकडून पाच वर्षापूर्वी हात उसणे पैसे घेतले होते.

हे पैसे देते म्हणून सुलताना हिने शामाला हिला घरी बोलविले. मात्र घरी गेल्यावर सुलताना हिने शामा हिला पैसे देत नाही तुला काय करायचे, ते कर असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी शामा हिच्याबरोबर मुलगा राजेश ऊर्फ खन्ना हा होता. त्यावेळी सुलताना हिच्यासोबत असलेले जमिल रज्जाक शेख, मेहबुब जमिल शेख, शाहरुक जमिल शेख हे होते.

त्यांनी राजेश यास पकडले. तर मेहबूब शेख याने राजेश याच्या पोटावर चाकूचा वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी राजेश यास संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, साहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत शामा अशोक जेधे हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुलताना जमिल शेख, जमिल रज्जाक शेख, मेहबूब जमिल शेख, शाहरुक जमिल शेख (सर्व रा. कामगार वसाहत, घुलेवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 326, 323, 504, 34 प्रमाणे मुंबई प्रोव्हीजन कायदा 37 (1) (3) 135 प्रमाणे दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यात जमिल शेख, मेहबूब शेख, शाहरुक शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहे.

तर परस्पर विरुद्ध फिर्यादीमध्ये शाहरुक शेख याने म्हटले आहे की, राजेश खन्ना जेधे, शाम जेधे, संतोष जेधे (सर्व रा. जेधे कॉलनी, संगमनेर) यांनी घरी येऊन उसणे पैशाचे व्याजासह झालेले पैसे लगेच द्या, असे म्हणून शिवीगाळ केली व राजेश जेधे याने त्याच्या हातातील हत्याराने शाहरुक याच्या डाव्या छातीवर व दोन्ही दंडावर वार केले.

त्याच्या पत्नीस वाईट शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी राजेश जेधे, शाम जेधे, संतोष जेधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लांडे करत आहे.

LEAVE A REPLY

*