राहुरीत दोन गटांत तुफान हाणामारी

0

दोन तरूणांना अटक; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाची दगडफेक

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – शहरातील राजवाडा आणि खाटीक गल्ली परिसरात दोन तरुणांच्या वैयक्तिक वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान दोन गटांच्या तुफान हाणामारीत झाले. यामध्ये हत्यारांचाही सर्रास वापर करण्यात आला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर तसेच पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी त्वरित आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने तणाव निवळला.

दोन गटांत हाणामारीची घटना 11 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी विशाल उर्फ बाफना बाळासाहेब जाधव व वसीम उर्फ गंज्या रहीमखान पठाण या दोन तरुणांना अटक केली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार 11 जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विशाल ऊर्फ बाफना बाळासाहेब जाधव व वसीम उर्फ गंज्या रहीमखान पठाण या दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सरुवात केली.

जमावाकडून परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक सागर पाटील व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी फौजफाटा घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र, यावेळी जमावाने दगडफेक करून पोलीस वाहनांचेही नुकसान केले.

यावेळी नगर येथील दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. काल12 जुलै रोजी दिवसभर खाटीक गल्ली व राजवाडा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार दिलीप गायकवाड हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*