वाळूवरून मांजरी-पानेगावात राडा

0
तीन जखमी
मांजरी (वार्ताहर)- मुळा नदीपात्रालगतच्या मांजरी व पानेगाव या दोन गावांमध्ये वाळूच्या मुद्द्यावर राडा झाला आहे. दोन्ही गावातील गट एकमेकांना भिडल्यामुळे झालेल्या हाणामारीत एकूण तीनजण जखमी झाले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ही घटना शनिवारी सकाळी घडली.
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील श्री चंद्रगिरी महाराज यांच्या मंदिराच्या नुतनीकरणाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामासाठी मांजरी गावालगतच्या मुळा नदीपात्रातून वाळू आणली जात आहे. शनिवारी सकाळी नदीपात्रातून वाळू आणण्यासाठी मांजरी येथील ट्रॅक्टर गेला होता. नदीच्या तिरावर पारनेगावातील तरुण होते.
नदी पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती पानेगावातील तरुणांना समजताच त्यांनी नदीपात्रात धाव घेऊन कुठलीही चौकशी न करता ट्रॅक्टरचा चालक व त्यावरील मजुरांना मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती समजताच मांजरीतील तरुणांनी नदीपात्रात धाव घेऊन पानेेेगावातील तरुणांची धुलाई केली. या हाणामारीत पानेगाव येथील किशोर जंगले व मांजरीचे आबा विटनोर व राहुल जांभुळकर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे दोन्ही गावांमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

मांजरी येथील आबासाहेब अण्णासाहेब विटनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, ग्रामदेवतेच्या मंदिरासाठी वाळू नेत असताना किशोर लक्ष्मण जंगले, अशोक उत्तम जंगले, प्रदीप जालिंदर जंगले यांच्यासह वीस ते चाळीस जणांनी बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे.

दुसरी फिर्याद पानेगावचे किशोर लक्ष्मण जंगले यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, वाळू उचलण्याचा जाब विचारण्यास गेलो असता मंदिराच्या जवळच्या काटवनात नेऊन सुभाष राधाकिसन विटनोर, आबासाहेब विटनोर व इतर दहा ते बाराजणांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार दोन्ही बाजूकडील आरोपींविरूद्ध भादंवि कलम 323, 504, 506 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट हवालदार मोरे व पवार हे करीत आहेत.

वाद चिघळला
मांजरी व पानेगाव येथील तरुणांमध्ये वाळूच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावादीच्या पोस्ट सोशल मीडियावर पडल्या. त्यामुळे हा वाद भडकला. या वादाविषयी शनिवारी दिवसभर पोस्ट दोन्ही गटाकडून सुरु होत्या.

LEAVE A REPLY

*