भाडोत्री गुंडांकडून मारहाण; सात जखमी

0
मारहाणीमध्ये जखमी झालेले श्रीकृष्ण मखरे
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून शेजारी राहणार्‍या व्यक्तीने भाडोत्री गुंडांकडून तलवार, हॉकी स्टीक, लोखंडी गज, काठीने मारहाण केल्याने सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील काष्टी येथे 30 जून रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
या मारहाणीमध्ये श्रीकृष्ण काशिनाथ मखरे, अनिता श्रीकृष्ण मखरे, रुपाली मखरे, पुष्कर श्रीकृष्ण मखरे, आबासाहेब मखरे, काशिनाथ विनायक मखरे, मंगल संतोष गोरे, इंदुबाई गोरे हे सात जण जखमी झाले आहेत. यातील श्रीकृष्ण, इंदुबाई व मंगल या तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
आरोपी सुभाष कोंडिबा चौधरी आणि काशिनाथ मखरे यांचा गेली पाच वर्षांपासून जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. या वादातून अनेक वेळा दोन गटात भांडणे झाली आहेत. या भांडणामुळे सुभाष चौधरी यांना अनेक वेळा शिक्षाही झाली होती.
त्याचाच राग मनात ठेवून दि. 30 जून रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान श्रीकृष्ण काशिनाथ मखरे हे गावातील दुकान बंद करुन त्यांच्या एमएच 16, बीएच 3701 या वाहनाद्वारे घराजवळ आल्यानंतर आरोपी सुभाष कोंडीबा चौधरी व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून मखरे यांच्या वाहनावर लाकडी दांडके, गज, काठी मारुन काचा फोडल्या.
तसेच श्रीकृष्ण व त्यांचा मुलगा पुष्कर याला बाहेर ओढून तलवार व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये आलेले काशिनाथ मखरे, बायको अनिता, भावजय रुपाली यांनाही जबर मारहाण केली. तेव्हा या सर्वांना का मारता म्हणून विचारणा करणार्‍या मंगल गोरे, इंदुबाई बापुराव गोरे यांनाही मारहाण केली. इंदुबाई यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून त्यांनाही जखमी केले. त्या आरडाओरडा करीत असताना सर्व आरोपी अंधाराचा फायदा घेत वाहने जागेवर सोडून उसाच्या शेतातून पळून गेले.
या घटनेनंतर सर्व जखमीना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. इंदुबाई गोरे या गंभीर जखमी असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. मंगल गोरे दौंड येथे उपचार घेत असून श्रीकृष्ण मखरे हे नगर येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्यावर तलवारीचे वार असून ते गंभीर जखमी आहेत.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मध्यरात्री आबासाहेब काशिनाथ मखरे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या शेजारी राहणारे सुभाष कोंडीबा चौधरी, वैशाली सुभाष चौधरी, शुंभागी सुभाष चौधरी, वैभव सुभाष चौधरी (सर्व रा. काष्टी), गणेश समाधान दरेकर (रा. गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे), हृतिक लगड (रा. श्रीगोंदा), गणेश कचरे (रा. अजनूज) यांच्यासह इतर आरोपी विरोधात कलम 307, 341, 326, 143, 147, 148, 149, 506 आर्म अ‍ॅक्ट 4/25 असा गुन्हा दाखल केला आहे.

माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक नीलेश कांबळे हे पथकासह आल्यानंतर पाहणी करून आरोपीनी वापरलेली हत्यारे तसेच पाच वाहने त्यामध्ये चारचाकी वाहन (एमएच 15, सी. डी. 1522), मारुती 800 (जीए 01, एन 2393), बजाज मोटारसायकल (एमएच 16, बीजी 2715), तसेच बिगर नंबरचा ट्रॅक्टर व नवीन स्कुटी अशी वाहनेे ताब्यातून घेऊन जप्त केली.

LEAVE A REPLY

*