Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

व्हॉट्सअ‍ॅप गृपच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी 51 हजार मदत

Share

नाशिक | अजित देसाई

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातुन सामाजिक अधःपतन होत असल्याची टीका आज सर्वत्र केली जात असली तरी याला छेद देणार्‍या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. थ्री जी , फोर जी क्रांतीमुळे अवघे जग खर्‍या अर्थाने हाताच्या मुठीत सामावले असून सामाजिक सुख दुःखांच्या प्रसंगात सोशल मीडियाचा किती प्रभावी वापर करता येतो हे सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील दिग्विजय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून दिले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला होता. हृदय पिळवटून टाकणार्‍या प्रसंगात दिग्विजय ग्रुपच्या सदस्यांनी आपसात सुमारे 58 हजार रुपये निधी संकलित केला असून स्थानिक स्तरावर मदतकार्य करणार्‍या सेवाभावी संस्थामार्फत विविध ठिकाणच्या पूरग्रस्तांना या निधीतून 51 हजारांची मदत देखील पोहोचती झाली आहे.

पश्चिम महाराष्र्टातील पूरग्रस्तांसाठी वॉट्सअप ग्रुपच्या वतीने मदत करावी अशी सूचना सर्वप्रथम दिनेश खुळे यांनी मांडली. खत विक्रीचा व्यवसाय असणार्‍या अनिल शेळके यांनी या सूचनेला अनुमोदन देत स्वतःची मदत पहिल्यांदा जाहीर केली. या मदतीसाठी ग्रुपमधील कोणत्याही सदस्यावर जबरदस्ती करायची नाही असे सांगत प्रत्येकानेच आपले यथाशक्ती योगदान द्यायला सुरुवात केली.

मदत जाहीर करणार्‍या ग्रुप संचालक असणार्‍या निलेश मालाणी यांच्याकडे रक्कम जमा जाणार्‍या सदस्यांची यादी दररोज प्रसिद्ध करण्यात येत होती. या निधीसंकलनात शंभर रुपयांपासून योगदान देण्यात आले. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका सदस्यांकडून तब्बल पंधरा हजार रुपयांचे योगदान देण्यात आल्याने हा निधी 58हजारांवर जाऊन पोहोचला.

ग्रुप सदस्यांच्या योगदानातून पूरग्रस्तांसाठी मोठी रक्कम उभी राहिली. मात्र तिचा विनियोग नेमका कुठे आणि कसा करायचा ठरले नव्हते. मदत गरजूंपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी बीएसएनएलमध्ये अधिकारी असणार्‍या प्रकाश खुळे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. खुळे यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती जमवायला सुरुवात केली.

चिखल तुडवत आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवणार्‍या संस्था, स्थानिक तरूणांच्या पथकांना दिग्विजय कडुन आर्थिक सहाय्य देण्याचे निश्चित करण्यात आले. विदयार्थ्यांना साहित्य, गरजुंना अन्नधान्य, पाणी पुरवठा करणार्‍या संस्थांसह स्वच्छता, मृत जनावरांची विल्हेवाट लावून दुर्गन्धी व रोगराई हटवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या संस्थांची यासाठी निवड करण्यात आली होती.

या संस्थांच्या पदाधिकार्‍यांना त्यांच्या बँक खात्यावर मदत पाठवून ते विवरण देखील ग्रुपवर प्रत्येकवेळी टाकण्यात आले. याशिवाय आपल्या आर्थिक सहाय्यातून करण्यात येणार्‍या मदतीचे फोटो देखिल ग्रुप सदस्यांच्या माहितीसाठी आवर्जून शेअर करण्यात आले.

या संस्थांना पाठवली मदत…..

नाम फाउंडेशनसह सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन, आभाळमाया फाउंडेशन (सांगली), यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, कृष्णाकाठ सोशल फाउंडेशन (भिलवडी), प्रसाद जोशी विचारमंच यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये तर वनमित्र संस्था (कागल), सांगली जिल्हा सुधार समिती यांना प्रत्येकी सात हजार रुपये अशी 51 हजार रुपयांची मदत आतापर्यंत पाठवण्यात आली आहे. तर ग्रुपच्या खात्यात अजून जवळपास सात हजार रुपये शिल्लक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!