Type to search

Breaking News Featured धुळे मुख्य बातम्या

धुळे : नववीच्या विद्यार्थिनीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; सिंचनभवनासमोर अपघात

Share

धुळे | प्रतिनिधी

सकाळी स्कॉलरशिपच्या क्लासला निघालेल्या कमलाबाई कन्या शाळेच्या नववीत शिकणाऱ्या गुंजन पाटील या विद्यार्थिनीचा ट्रकच्या मागच्या चाकात येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास साक्री रोडवर असलेल्या सिंचन भवन समोर हा अपघात घडला. यामुळे परिसरात सकाळच्या सुमारास प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

अधिक माहिती अशी की, साक्री रोडवर सेंट्रल बँकेच्या पाठीमागे राहणारी गुंजन पाटील ही विद्यर्थिनी आपल्या मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी रस्ता ओलांडत होती. याचवेळी साक्रीकडून-धुळेकडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक जीजे ०१ सीवाय ०२६७ ने तिला वाचवायचा प्रयत्न केला. परंतु वेग जास्त असल्याने तसेच गोंधळाची स्थिती झाल्याने गुंजन ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

गुंजनच्या शरीरावरून ट्रकचे मागचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील व्यावसायिक, रहिवासी नागरिक यांनी तातडीने धावाधाव केली. तिचा मृतदेह उचलून तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. ट्रककचालकास तातडीने अटक करण्यात आली. दरम्यान गुंजनचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच तिचे आई, वडील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कोवळ्या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

काही काळातच या भागात मोठ्ठी गर्दी जमा झाली. दरम्यान साडेसातच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. गुंजनचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दुपारी गुंजनवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये होती गुंजन पहिली

14 वर्षीय गुंजन पाटील ही शाळेतली हुशार आणि गुणी मुलगी होती. आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत ती शाळेतून पहिली आली होती. त्यामुळे नाववीतही ती या परीक्षेला बसली होती. त्याचाच क्लास साठी ती सकाळी निघाली होती आणि त्याचवेळी काळाने तिच्यावर घाला घातला. अपघातात ती गेली.

गतिरोधक असते तर वाचली असती गुंजन

काही महिन्यांपूर्वी सक्रीरोड गुळगुळीत करण्यात आला आहे. परंतु विशेष बाब म्हणजे संतोषी माता चौक ते महिंदळे शिवरपावेतो या रस्त्यावर एकही गतीरोधक नाही. त्यामुळे सारेच मस्तीत गाडी चालवतात. काही दिवसांपूर्वी शाम सोनवणे या सुमारे 40 वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. वारंवार छोटे मोठे अपघात होतच असतात.

सिंचन भवन पॉईंट मृत्यूचा सापळा

सिंचन भवन पॉईंट हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या चौकात बँका, पान टपऱ्या, सट्टा बाजार वाढल्याने कायम गर्दी असते. त्यामुळे अनेक गैरप्रकार या भागात होतात. कायमच वाद, भांडण या चौकात होते. त्यामुळे येथे पोलीस चौकीची गरज निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!