Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निलंबित पंधरा ग्रामसेवकांना पुन्हा सेवेत घेणार; रिक्तपदांवरील ग्रामसेवकांचा भार होणार कमी

Share

नाशिक । प्रतिनिधी

ग्रामपंचायत कारभारात अनियमितता व गैरव्यवहार केल्याप्रकरणी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित केलेल्या पंधरा ग्रामसेवकांवरील चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच तसे आदेश निघणार असल्याचे सूत्रांंनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामसेवकांचे 103 पदे रिक्त असून यातील काही पदे भरण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या 1382 असून, यातील काही ग्रामपंचायत या गु्रप असल्यामुळे एका ग्रामपंचायतीला एकापेक्षा अधिक गावे, वाडे जोडलेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी एक ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, वर्षानुवर्षे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या पाहता, ग्रामसेवकांची 1019 पदे मंजूर असून, त्यापैकी 916 ग्रामसेवक सध्या कार्यरत आहेत तर 103 पदे रिक्त आहेत.

चार वर्षांपासून शासनाकडून ग्रामसेवकांची भरती झालेली नाही. परिणामी दरवर्षी निवृत्त होणारे ग्रामसेवक व दुसरीकडे कामकाजातील अनियमितता, तक्रारींच्या कारणास्तव ग्रामसेवकांवर कारवाई करून होणार्‍या निलंबितांची संख्या पाहता ग्रामपंचायतींना पूर्णवेळ ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यासाठी एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार सोपवावा लागत असल्यामुळे परिणामी ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होऊन विकासकामांची गती मंदावली आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता व गैरकारभाराच्या तक्रारीवरून सेवेतून निलंबित केलेल्या पंधरा ग्रामसेवकांची विभागीय चौकशी पूर्ण होऊन त्यातील दोषी ग्रामसेवकांचा निलंबन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापना करून घेण्याची प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या पंधरा ग्रामसेवकांच्या संख्येने रिक्तपदांवरील ग्रामसेवकांचा भार कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!