फुटबॉल विश्वचषक २०१८ : ३२ देश एक मिशन, आजपासून प्रारंभ

0

जगभरामध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाच्या 21 व्या विश्वकप स्पर्धेच्या भव्यदिव्य सोहळ्याची मॉस्कोच्या लुझणीकी स्टेडियममध्ये आज किक मारली जाणार आहे.

ऑलिम्पिकनंतर सर्वात लोकप्रिय आणि वलयांकित स्पर्धा म्हणून फिफाच्या (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन) या विश्वचषकाकडे बघितले जाते. दर चार वर्षांनी या विश्वचषकाचे आयोजन कारण्यात येते. सन 1930 पासून या विश्वचषकाला सुरुवात झाली.

फिफाला जगभरातील 209 देश संलग्न आहेत. यामधून केवळ 32 देशांनाच विश्वचषकाच्या या अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. जगातील पाच वेगवेगळ्या खंडांतून या 32 संघांची निवड केली जाते.

यात सहभागी होणार्‍या संघात आशिया ओशियना गटातून ऑस्ट्रेलिया, इराण, जपान, साऊथ कोरिया आणि सौदी अरब हे पाच संघ, उत्तर अमेरिका खंडातून कोस्टारिका मॅक्सिको आणि पनामा हे तीन संघ, युरोप खंडातून बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन, स्वीझर्लंड, आईसलँड, पोलंड, सर्बिया, स्वीडन आणि यजमान रशिया हे चौदा संघ, आफ्रिका खंडातून नायजेरिया, इजिप्त, मोरक्को, सेनेगेल, ट्युनेशिया हे पाच संघ तर दक्षिण अमेरिका खंडातून अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, उरुग्वे आणि पेरू हे पाच संघ अशा 32 संघांचा समावेश आहे.

या अंतिम 32 संघांत आपल्या देशाच्या संघाला स्थान मिळाले नाही म्हणून त्या देशाचे क्रीडाप्रेमी हा सोहळा बघत नाहीत असे कदापिही होत नाही. हेच तर या खेळाचे मोठे यश आहे. कारण आपल्या गळ्यातील ताईत असलेले पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो, ब्राझीलचा नेयमार, अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी, कोलंबियाचा रॉड्रिक्स, जर्मनीचा टोनी क्रूझ अशा दिग्गजांची नजाकत बघायला त्यांचे जगभरातील चाहते आसूसलेले आहेत.

आपल्या भारताचा संघही या विश्वचषक स्पर्धेच्या सहभागापासून फारच दूर आहे. असे असले तरीही भारतात हा सोहळा बघणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या स्पर्धेत सहभाग मिळवलेल्या संघात गत 2014 चा विजेता जर्मनी, पाचवेळा विजेता ब्राझील, दोनवेळचे विजेते अर्जेंटिना, उरुग्वे, एकवेळा विजेते स्पेन, फ्रान्स, इंग्लंड अश्या दिग्गज संघांचा समावेश आहे.

असे असले तरीही माजी विजेता इटली, उपविजेता नेदरलँड यांना या विश्वचषकात स्थान मिळवता आलेले नाही. तसेच बहुतेक वेळा सहभाग असलेले अमेरिका, ग्रीस, घाना या संघांनाही यामध्ये संधी मिळालेली नाही. इजिप्तने 28 वर्षांनंतर आणि पेरूने तब्बल 36 वर्षांनी या स्पर्धेत स्थान मिळवले आहे. तर पनामा आणि आईसलँड या दोन संघांनी प्रथम या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता मिळवली आहे.

या स्पर्धेत पहिल्या 32 संघांत स्थान मिळवणे हेदेखील प्रत्येक संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी फारच महत्त्वाचे असेच आहे. उद्या गुरुवारी यजमान रशिया आणि सौदी अरब यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार्‍या या स्पर्धेचा ज्वर फारच तापला असून या विश्वचषकात कोण बाजी मारेल, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आनंद खरे, क्रीडा समीक्षक
7083053221, Email ID : khare.nashik@gmail.com

LEAVE A REPLY

*