Friday, April 26, 2024
HomeUncategorizedतुमचं आमचं जमलंय, राजकारणात काही पण...

तुमचं आमचं जमलंय, राजकारणात काही पण…

‘कोरोना’… ‘कोरोना’ म्हणत सात-आठ महिने उलटून गेलीत. विकास कामांना खीळ तर बसलीच; पण व्यापार, उद्योग धंदे थांबल्याने सर्वत्र आर्थिक अडचणींना सामोरे जात गोर-गरीब जनतेला एकवेळ उपासमारी देखील सहन करावी लागली. गत काळात काही दानशूर व्यक्तींनी समाज मनाला मदतीचा हात देखील दिला.

याचवेळी कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मतदार संघाला आ.चिमणराव पाटलांनी निधी देखील दिला. याच काळात ‘पावसाळा जोरात अन् शेतकरी कोमात’ अशा परिस्थितीशी मुकाबला करीत शेतकरी हैराण झाला. नद्या, नाले, धरणे, बंधारे फुल्ल झालीत पण परतीच्या पावसानं परत-परत येऊन शेतातील पिकात गुडघाभर पाणी साचल्याने कपाशी व नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे होतील का? शासनाकडून मदत मिळेल का?

- Advertisement -

या विवंचनेत शेतकरी असतांना ‘तुमचं-आमचं जमलय’च्या वल्गना सुरू झाल्यात, ‘राजकारणात कांही पण…’ हे तर चालायचेच.

राजकारणातील समान-गावांचे समांतर गाव रस्ते असल्याने गाव जोडता-जोडता मनं देखील जुळली तर नवल कसलं. तालुक्याच्या राजकारणात ‘सचिव’ काय-काय करतील त्यात ‘के.बी.’च्या कॅबीनमध्ये काय-काय शिजतंय हे देखील गोपनीयच म्हणावं लागेल ना?

‘नवा भिडू-नवा डाव’

तालुक्याच्या पंचायत समितीला प्रभारी राजवर सतत ‘उसना’ गटविकासाधिकारी असायचा पण आता याच तालुक्यात अनेक वर्ष ग्रामसेवक असलेले एन.आर.पाटील ज्यांना या तालुक्यातील बहुतेक गावांच्या कारभाराची बारीक-सारिक माहिती असलेले गटविकासाधिकारी म्हणून या तालुक्याचे कायमस्वरूपी खुर्चीत विराजमान झालेत, आतां खुर्चीच्या किमया जाणून भ्रष्टाचारमुक्त तालुका होईल अशा अपेक्षेने ग्रामस्थांच्या नजरा पंचायत समितीकडे लागल्या असून शिस्त प्रिय अधिकारी गोंधळलेल्या कार्यालयात शिस्त कशी लावतात हे देखील जाणून घेत पाहू या!

‘हागणदारी मुक्त’चे भयावह वास्तव

तालुक्यातील गाववेशीवर शंभर टक्के हागणदारी मुक्तीचे फलक झळकतात, कागदोपत्री अन् प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहतां सकाळचे सकाळीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगाच रांगा अन् घाणच-घाण असून देखील शंभर टक्के हागणदारी मुक्तीचा नारा लावला जातो. जिल्हा हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाला आहे, मात्र आजही ग्रामीण भागात प्रवेश केल्यावर तोंडाजवळ रूमाल गेल्या वाचून राहत नसल्याची सत्यता कुणीच नाकारू शकत नाही.

2012 च्या बेसलाईन सर्वेनुसार ज्यांच्याकडे स्वच्छतागृह नाही, अशा कुटूंबांकडे स्वच्छतागृह बांधण्यात आलीत, ते बांधण्यात आल्याने शासनाने हागणदारी मुक्त गावे घोषीत करून टाकलीत, जिल्ह्यात 2012 च्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात तब्बल चार लाख 72 हजार 507 वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. शासनाने त्यासाठी प्रत्येक कुटूंबाला 12 हजार रूपयाचे अनुदान दिले. यात मात्र अनेकांनी फोटो काढण्यापुरते शौचालय बांधकाम केले.

प्रत्यक्षात त्या शौचालयाचा वापर शौचालय म्हणून दिसतच नाही. कांही ठिकाणी मोडतोड तर कांही ठिकाणी सरपण किंवा अडगळीचा सामान ठेवण्यासाठी वापर होत आहे. हे सारे चित्र ग्रामपंचायतला दिसत असून चुप्पी धरून ठेवणेच पसंतीला दिसून येते. मुक्त-मुक्तचा नारा सर्वत्र लावला जातो पण कोणतीच मुक्त न होता तंबाखू-गुटखामुळे अनेक कर्करोगींनाच ‘मुक्ती’ मिळाल्याने ते मुक्त झालेत. गावा-गावात तंबाखु-गुटखा सर्रास राजरोसपणे विकला जातो. शाळेजवळ तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करू नये हा नुसता फतवाच निघाला पण यावर कुणाचे नियंत्रण असावे हेच कुणाला कळले नाही. शासन प्रशासन आदेश काढते पण त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने सारं मुक्तच्या नावाने चढ्या भावाने विकले जाते हे कुणामुळे?

‘पाणीच-पाणी चहूकडे’

पावसाने यंदा चहूकडे पाणीच-पाणी केले असल तरी अति पावसासह परतीच्या पावसाने कडधान्य तर आलेच नाही पण ज्वारी-बाजरीला डिस्को तर कांही ठिकाणी कोंब फुटलीत; नगदी पिक म्हणून कपाशीचा पेरा जास्तच असतो, सुरूवातीला हंगाम चांगला येईल, अशी आशा अन् अनेक्षा असतांना परतीच्या पावसाने शेतात पाणी की पाण्यात शेत अशी अवस्था झाल्याने कपाशीच्या झाडावरच कैर्‍या काळ्या पडल्या त्या कैर्‍या तोडून आणत घरीच त्यातून कापूस ओरबडून काढून तो सुकवून मातीमोल भावात विकावाच लागला, आता तर कपशीची झाडावर पान पिवळी पडू लागलीत. 1 किंवा 2 वेच्यात कपाशी उपटून फेकावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आशा-अपेक्षा फोल ठरतील व पुन्हा तेच-तेच या तालुक्याच्या शेतकर्‍यांच्या नशिबी येणार काय? ही चिंता सर्वत्र सतावत आहे.

कोरोना जातोय की येतोयं

‘कोरोना’चे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिसत असले तरी कुठे-कुठे-कधी-कधी ही वाढ-घट सुरूच असल्याने भिती दूर झालेली नसली तरी कोरोना जातोय की पुन्हा येतोयं अशा द्विधा मन:स्थितीमुळे सरकार देखील अजून ठामपणे निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे शाळा, मंदिरे, लग्नकार्य गदी नको म्हणून थांबवलीच आहे. पण शासनाने शेतकरी-कष्टकरी गोर-गरीबांचे शेती नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीचा हात पुढे करून तालुक्याला तारणहार व्हावे ‘तुमचं-आमचं जमतंय’ यात तालुक्याला आनंदच, पण जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, जमल्यातून जमवून तालुक्याचा विकास व्हावा, अंधारातून प्रकाशाकडे हा तालुका न्यावा, हीच अपेक्षा अन् जमलंय म्हणून शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या