युवकांनो उठा, जागे व्हा अन् ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका!

 युवकांनो उठा, जागे व्हा अन् ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका!

भारत हा सर्वात मोठा युवकांचा देश म्हणून जगात ओळखला जातो.या पार्श्वभूमीवर विवेकानंद स्वामी युवकांना उद्देशून म्हणतात,भूतकाळाच्या पायावरच भविष्याची उभारणी होत असते,त्यासाठी गतकाळाचा मागोवा घेऊनच युवकांनी आपल्या भवितव्याची जडणघडण करावी.आपले पूर्वज महान होते,यास्तव त्यांना आपल्या जीवनाचा आधारभूत घटक मानावा. आपल्या शिरांमध्ये कोणाचे रक्त संचार करत आहे,याचे प्रत्येकाने भान ठेवावे.आपल्या पूर्वजांनी स्वबळावर जे वैभव उभं केलं,त्याची जपवणूक करून त्याला अधिक समृद्ध करण्यासाठी युवकांनी निरंतर कार्यरत रहावे.असे करूनच भक्कम व स्वयंपूर्ण अशा हिंदुस्थानची उभारणी होईल,असा मोलाचा उपदेश त्यांनी युवकांना दिला.म्हणून युवकांनो उठा, जागे व्हा अन् ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका!

विवेकानंद यांचे विचार जरी धर्माधिष्ठित होते,तरीही त्यांचा दृष्टिकोन पुरोगामी व विज्ञानपुरक होता.त्यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

युगपुरूष स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे दत्त घराण्यात झाला.अन् जणू भारतीय युवकांना उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखविणारा तेजस्वी तारा उदयास आला.त्यांचं जन्म नाव *नरेंद्र*.त्यांचे पिताश्री विश्वनाथबाबू हे पेशेने वकील होते.आई भुवनेश्वरी ह्या नरेंद्रला बालपणी महाभारत,रामायणामधील वीरपुरूषांच्या गोष्टी सांगायच्या.इतकेच नव्हे तर,या मातेने त्यांना बंगाली व इंग्रजी भाषेतही पारंगत केलं.नरेंद्र हा लहान पणापासून तेजस्वी व बुद्धिमान होता.त्याला वाचनाचा मोठा छंद होता.नरेंद्रने आपल्या शैक्षणिक जीवनातच भारताचा संपूर्ण इतिहास अभ्यासला.

हिंदुस्थानच्या नव निर्मितीसाठी धार्मिक ऐक्य घडवून आणण्यात प्रत्येकाने योगदान द्यावे,असा संदेश त्यांनी तत्कालीन भारतीय जनतेला दिला. ईश्वराचे पृथ्वीवर अस्तित्व आहे का? या प्रश्नाची उकल होण्यासाठी त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेऊन त्यांना प्रश्न केला की,आपण ईश्वर बघितला आहे का ? परमहंस यांनी हसून उत्तर दिलं. अरे तूच तर परमेश्वर आहे ना. यासाठी माणसाला बघण्याची आंतरिक दृष्टी असावी लागते. परमहंस यांचे हे उत्तर ऐकून विवेकानंद खूपच भारावून गेले .ते प्रभावित झाले.त् यांना खर्‍या अर्थाने साक्षात्कार झाला अन् त्यांचा नास्तिक दृष्टिकोन जाऊन पुढे तो आस्तिक झाला. त्यांनी परमहंस यांना आपले गुरू मानले. रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यावर त्यांनी कोलकाता येथे रामकृष्ण मिशन ची स्थापना करून त्याच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक ऐक्य निर्माण करत हिंदुस्थानला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा विडा उचलला. विवेकानंद हे जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक मूर्तिमंत प्रतिक होते, हे दृष्टोत्पत्तीस येते.

गुलामगिरीचा शेवट व्हावा अन् हिंदुस्थान हे महान आध्यात्मिक राष्ट्र म्हणून जगात अजरामर व्हावं, हेच ध्येय त्यांनी बाळगले.अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेत हिंदुस्थानची आध्यात्मिक भूमिकेची ओळख व्हावी,या उद्देशाने विवेकानंद यांनी साध्यासुध्या संन्याशाच्या वेशात श्रोत्यांना संबोधून म्हटलं की,माझ्या प्रिय अमेरिकन बंधू भगिनींनो!हे भावपूर्ण उदगार ऐकून परदेशी नागरिक मंत्रमुग्ध झाले.पुढे त्यांच्या मनात भारतीयांविषयी आत्मियता निर्माण झाली.हिंदुस्थान हे एक आध्यात्मिक राष्ट्र आहे,याचा त्यांनी अखिल मानवजातीला परिचय करून दिला.यामुळेच विवेकानंद स्वामी यांना आध्यात्मिक गुरू म्हटले जाते.

विवेकानंद म्हणतात,ज्ञान संपदेच्या बळावर युवकांनी हिंदुस्थानचे नाव सातासमुद्रापलीकडे अजरामर करावे.विवेकानंद स्वामी यांची भारतीय युवकांकडून खूप अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 12 जानेवारी हा त्यांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. विवेकानंद स्वामी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचा कौशल्य विकास कार्यक्रम फलद्रूप करण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून प्रत्येक पक्षाने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.जेणेकरून भारतीय युवाशक्तीची किमया जगाला कळून येईल.महत्वाचे म्हणजे भारत हा पुढील काळामध्ये जगात कौशल्य केंद्र म्हणून नावरूपाला येईल,हे निश्चित.

केंद्राच्या पावलावर पाऊल टाकून,राज्यातील युवक-युवतींना आधुनिक युगातल्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या धर्तीवर सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात आला.या अभियानाच्या माध्यमातून विविध उद्योगांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ निर्माण केलं जात आहे.

रणवीर राजपूत

गवर्नमेंट मीडिया, म.शा.मंत्रालय.

(मो.न.9920674219)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com