Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनिष्ठावान घराण्याचे वारसदार युवा नेते

निष्ठावान घराण्याचे वारसदार युवा नेते

अनिल चव्हाण, धुळे

विशाल खान्देशचे नेतृत्व करणारे माजीमंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र आ. कुणाल पाटील यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली. खान्देशच्या कक्षा छेदून महसुली दृष्ट्या पाच जिल्ह्यांच्या उत्तर महाराष्ट्रातून झालेली ही निवड भविष्यात उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची नांदी समजली जाते आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात राजकारणा सोयीने पक्ष बदविणार्‍या अनेक नेत्यांपैकी काँग्रेस पक्ष व गांधी घराण्यावर निष्ठा ठेवणार्‍या रोहिदास पाटील यांच्या घराण्याचे हे दमदार वारसदार तेवढ्याच दमदारपणे पाऊले पुढे टाकतील, याबाबत कुणाचे दुमत नसावे.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये मोठे फेरबदल झालेत. प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली. या सोबतच महाराष्ट्राच्या विभागवार काही नियुक्त्या करुन त्या त्या भागातील नेत्यांना प्रदेशावर काम करण्याची संधीही दिली. याच नवनियुक्तीच्या साखळीत उत्तर महाराष्ट्रातून धुळे ग्रामीण मतदार संघाचे आमदार कुणाल पाटील यांचाही समावेश झाला.

प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून आ. कुणाल पाटील यांची झालेली नियुक्ती ही त्यांच्या कामाची पावतीच म्हटली पाहिजे. काँग्रेस पक्षात राहून त्यांनी केलेले काम, पक्षाच्या सर्वच उपक्रमांमध्ये घेतलेला सहभाग, संघर्ष रॅलीसह उन्हातान्हात फिरुन दाखविलेला पुढाकार आणि ग्रामीण भागातून प्रतिनिधीत्व करतांनाही प्रदेशाचे प्रसंगी दिल्लीचे लक्ष वेधून घेण्याचे कसब, या सार्‍यांचा हा परिपाक म्हणावा लागेल. दीर्घ काळानंतर पक्षाने या भागातील या युवा नेत्याला प्रदेशावर काम करण्याची संधी देवून एकार्थाने उत्तर महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्षोनवर्ष राज्याच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाले. निधी वाटपात अन्याय झाला. सत्तेतील पदे देण्यातही अनेकदा डावलले गेले. यामुळेच की काय? उत्तर महाराष्ट्राने कायमच पश्चिम महाराष्ट्राचा हेवा केला. अर्थात याची कारणे त्यात्या परिस्थितीनुरुप निराळी आहेत. आज आपला विषय उत्तर महाराष्ट्रातून आ. कुणाल पाटील यांना मिळालेली संधी आणि या संधीचे सोने करण्याची त्यांच्यात असलेली धमक या विषयाशी निगडीत आहे. आ. पाटील यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवून जणू उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्वच करण्याची भविष्यातील ही नांदी म्हटली पाहिजे.

खंबीर वसा, दमदार वारसदार

आ. कुणाल पाटील यांना घरातूनच मोठा राजकीय वसा लाभला आहे. त्यांचे आजोबा स्व. खा. चुडामण आनंदा पाटील यांनी त्या काळी पंडीत जवाहरलाल नेहरुंपेक्षा जास्त मते मिळवून देशाचे लक्ष वेधून घेतले ही बाब राजकीय इतिहासात नोंद आहे. कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांनी तब्बल 40 वर्ष धुळे तालुका मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले असून 25 वर्ष ते राज्याच्या सत्तेत कॅबीनेट मंत्री म्हणून सक्रीय होते. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी समर्थपणे समर्थपणे पेलली.

विशाल खान्देशचे नेते म्हणून त्यांनी राज्यात प्रतिनिधीत्व केले. साडे तीन जिल्ह्यांच्या खान्देशचा आणखी विस्तारी महसूली विभाग असलेल्या पाच जिल्ह्यांच्या उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी या निमित्ताने आ. कुणाल पाटील यांना मिळाली आहे. आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, हीच प्रत्येक बापाची इच्छा असते. आ. कुणाल पाटील यांच्यावर सोपविलेली जबाबदारी आणि त्यांचे राजकारणातील एकेक करीत पडणारे दमदार पाऊल पाहून माजी मंत्री रोहिदास पाटील यांना निश्चितच आनंद होत असावा.

गतवेळी आमदार म्हणून पहिल्यांच निवडून आल्यानंतरही कुणाल पाटील यांनी विधान सभेच्या सभागृहात केलेली अभ्यासपुर्ण भाषणे, दुष्काळाच्या मुद्यावर पोटतिडकीने मांडलेले शेतकर्‍यांचे प्रश्न आणि मतदार संघातील प्रश्नांसाठी या युवा नेत्याची धडपड पाहून केवळ काँग्रेसमधीलच नव्हेतर इतर पक्षांच्या नेत्यांचेही त्यांनी वेळोवेळी लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आ. कुणाल पाटील यांचा राज्यात व्यापक संपर्क वाढला.

शेतकर्‍यांच्या मुद्यावर तर सभागृहातील निलंबन पत्करणार्‍या आमदारांमध्ये ते आग्रणी होते. ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी एकदा नव्हेतर शंभरदा आमदारकी सोडण्याची आपली तयारी आहे.’ अशी ललकारी त्याच वेळेस त्यांनी सोडली होती. केव्हढा हा आत्मविश्वास. मुद्या शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा, त्याग आमदार पद सोडण्याचा पण आत्मविश्वास शंभरदा निवडून येण्याचा.. याला म्हणातात दूरदुष्टी! यामुळे राजकारणाचा मिळालेला खंबरी वसा पुढे नेतांना दमदार वारसदार होण्याची चिन्हे कधीच त्यांच्यात दिसली होती. आता पक्ष नेतृत्वानेही त्यांच्यातील ही चुणूक ओळखली आहे.

अन्यायाची भावना पुसलीच पाहिजे

महसुली दृष्ट्या उत्तर महाराष्ट्राचा पाच जिल्ह्यात समावेश होत असला तरी नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांनी आपल्याला हवे ते त्यांच्याकडे ओढून नेले. खान्देशातील तीन जिल्ह्यांपैकी जळगावही विकासात पुढे गेले. पुर्वाश्रमिचा एक संघ आदिवासी जिल्हा म्हणून धुळे जिल्हा तुलनेने मागे राहिला. अर्थात विकासाचा अनुशेष वाढतच गेल्याने हा खड्डा भरणे अशक्य ठरले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विषय पुढे आला तेव्हा जळगावकरांनी बाजी मारली. मात्र खान्देशी नसणार्‍या नाशिक आणि नगरने यातून सोयीने काढता पाय घेवून शैक्षणिक दृष्ट्या स्वत:ला पुण्याशी जोडून घेतले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने स्वत:कडे खेचून घेतले. सहकारी शैक्षणिक दृष्टी आधीपासून प्रगत असलेल्या नगर जिल्ह्यावर याचा फारसा परिणाम झाला नाही. पाठोपाठ सन 1998 मध्ये धुळ्याचे विभाजन होवून नंदुरबार स्वतंत्र जिल्हा झाला. शंभर टक्के आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याला उदार हस्ते निधी मिळाला. धुळ्याच्या तुलनेत नंदुरबार प्रगतीत पुढे सरकले. यामुळे धुळे जिल्हा तसा चहुबाजूच्या विकासात अविकसीत जिल्हा राहिला. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर नंदुरबारातील कुपोषण कमी झाले पण धुळे जिल्ह्यात विकासाची कुपोषण मात्र वाढतांना दिसू लागले.

आता या जिल्ह्यातून आ. कुणाल पाटील यांना राज्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवून उत्तर महाराष्ट्रावर लक्ष देण्याचे निर्देश म्हणजेच जणू भविष्यात उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची ही नांदी म्हटले पाहिजे. तसे झाल्यास धमक असणार्‍या या नेत्याला आपली चमक दाखविण्याची व्यापक अर्थाने मिळालेली ही संधी म्हणूनच त्यांनी याकडे बघितली पाहिजे.

तुम्ही ठाम रहा, जनताही साथ देईल

सन 2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशभरात मोदी लाट आली. या लाटेला छेदून धुळे ग्रामीण मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर आ. कुणाल पाटील निवडून आले. पाच वर्षात त्यांनी दाखविलेली चुणूक, केलेली कामे, युवकांचे संघटन आणि जोडलेली माणसे पाहता त्यांनाही पक्ष बदलाच्या अनेक ऑफर्स आल्या असाव्यात. सत्ता येताच मंत्री पदाचे गाजरही मिळाले असावे. आता काँग्रेसमध्ये राहिले काय? असे हिनवले गेले असावे. परंतू कोणत्याही आमिषाला बळी न पडता, मानसिकता ढळू न देता माजीमंत्री रोहिदास पाटील व आ. कुणाल पाटील हे ठाम राहिलेत. काँग्रेस आणि गांधी घराण्यावर त्यांची पुर्वापार असलेली निष्ठा तसूभर ढळली नाही. उलट तत्कालीन केंद्रीय राज्य मंत्र्यांवर ‘टक्केवारी घेणारा खासदार’ म्हणून तोफ डागत खा. राहूल गांधी यांच्या समोर त्यांनी केलेले तडाखेबंद भाषण त्यांना लोकसभेचे तिकिट देवून गेलेत. राजकारणात जय-पराजय असतो. परंतू कोणत्याही पराभवाने खचून न जाता जमिनीवर पाय रोवून पुढे वेगाने झेपावणारा हा नेता निश्चितच नजिकच्या भविष्यात राज्याचे नेतृत्व करेल. धुळे जिल्ह्याला लाल दिव्याचा मिळालेला वनवास नक्कीच दूर करेल. मात्र त्यासाठी आ. कुणाल पाटील तुम्ही ठाम रहा, जनताही नेहमीप्रमाणे तुम्हाला भक्कम साथ देई, याबाबत दुमत नाही. आपल्या या दमदार वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.

यांच्या ढळल्यात निष्ठा

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांचा विचार केेला तर असे लक्षात येईल की, अलिकडच्या 10 ते 15 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकारणाच्या बदलच्या समिकरणात अनेकांनी आपापल्या सोयीने निर्णय घेतलेत. तर काहींनी आपल्या पुढच्या पिढीची व्यवस्था करण्यासाठी पक्ष बदललेत त्यामुळे आता कोण कोणत्या पक्षात आहे, किती वर्ष राहिल याचा अंदाज बांधणे कोणत्याच भविष्यकाराला शक्य होणारे नाही. एक संघ धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांची पुढची पिढी आता राजकारणात सक्रीय आहे. यापैकी माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांच्या मुलाने मोदी लाटेत भाजपाशी सख्य केले.

माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी स्वत:च काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून दोन वेळा पक्ष बदलविला. माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल हे तर ‘मरते दम तक काँग्रेसमें रहुंगा’ अशी भाषणे ठोकत. आता ते आपल्या सर्व समर्थकांसह भाजपात डेरेदाखल आहेत. नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावीत यांनी वेळोवेळी पक्ष बदललेत. काँग्रेसचे निष्ठावान आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी हाती शिवधनुष्य घेतले. दोेंडाईचातील रावल पुर्वाश्रमीचे काँग्रेसशी आता भाजपाई आहेत. धुळ्यात अनिल गोटेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीला जवळ केले तर राष्ट्रवादी सोडून राजवर्धन कदमबांडे भाजपात जावून बसलेत. काँग्रेसमधून खा. सुभाष भामरे यांनीही दुसर्‍यांदा पक्ष बदविला. साक्रीतील आ. मंजुळा गावीत भाजपातून सेनेत तर ज्ञानेश्वर नागरे काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेत. माजी आ. द.वा.पाटील यांचे वारसदार आता भाजपात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या