Friday, April 26, 2024
HomeUncategorized'योगसाधना' आज आणि उद्याही उपयुक्त

‘योगसाधना’ आज आणि उद्याही उपयुक्त

डॉ. नीलेश वाघ

मन जेवढे सामर्थ्यवान असेल तेवढी प्रतिकार शक्ती अधिक असते. मनाचे सामर्थ्य योगाभ्यासानेच वाढते. कारण योगशास्त्र मनाचे शास्त्र आहे.

- Advertisement -

सर्व प्राचीन ग्रंथांत केलेल्या योगाच्या व्याख्या या मनाशी निगडीत आहेत. योग हे भारतीय मानसशास्त्र आहे. योगाभ्यासाने मनोबल वाढते हा अनेकांचा अनुभव आहे. योगसाधना ही वर्तमान आणि भविष्य या दोन्हीही काळात उपयुक्त आहे.

शहरातील अनेक जुन्या शैक्षणिक संस्थांनी आपला शैक्षणिक दर्जा आजही बर्‍यापैकी टिकवून ठेवला आहे. आरोग्य हा महत्त्वाचा दागिना आहे. तो जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य 1978 साली स्थापन झालेल्या योगविद्या धाम संस्थेने केले आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली ही नगरी आहे. दर 12 वर्षांनी भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरातील साधू-संत येथे हजेरी लावतात. नाशिक शहरातील अनेक जुन्या रुढी-परंपरा, चालीरिती आजतागायत जतन केल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात नाशिकला एक वेगळे स्थान आहे. कारण नाशकात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ ही दोन महत्त्वाची विद्यापीठे आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयेदेखील येथे आहेत.

योग शिक्षण देणार्‍या अनेक संस्था, संप्रदाय आणि व्यक्ती शहरात आहेत. विविध पद्धतीने समाजासमोर योग मांडला जात आहे. काही जण खरोखरच शास्त्रोक्त पद्धतीने योगा शिकवत आहेत. एकंदरीत सर्वांचेच सध्यातरी व्यवस्थित चालले आहे. कारण सध्या योगाचे वादळ आहे. योगाचे महत्त्वदेखील लोकांना पटले आहे. योगा ही काळाची गरज आहे. शासकीय पातळीवरूनसुद्धा याचे महत्त्व सांगितले जात आहे. आजघडीला ‘करोना’चा दुष्प्रभाव अवघे विश्व भोगत आहे. या वातावरणात योगाला खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘करोना’शी सर्व जग सर्व उपचार पद्धतींनी लढत आहेत.

अनेक संशोधने सुरू आहेत, पण या सर्व गदारोळात योग साधनेचा मात्र लोकांना फायदा होत आहे. ‘करोना’शी लढायचे म्हणजे स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे याबाबत सर्वांचेच एकमत आहे. सध्या तरी प्रतिकार शक्ती वाढवणे हाच त्यावरचा उपाय आहे. ही प्रतिकार शक्ती कशी वाढणार? यावर उत्तर आहे ते योगासने, प्राणायाम, ध्यानादी योगाभ्यास! प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेत मनाचादेखील महत्त्वाचा सहभाग असतो. मन जेवढे सामर्थ्यवान असेल तेवढी प्रतिकार शक्ती अधिक असते. मनाचे सामर्थ्य योगाभ्यासानेच वाढते.

कारण योगशास्त्र मनाचे शास्त्र आहे. सर्व प्राचीन ग्रंथांत केलेल्या योगाच्या व्याख्या या मनाशी निगडीत आहेत. योग हे भारतीय मानसशास्त्र आहे. योगाभ्यासाने मनोबल वाढते हा अनेकांचा अनुभव आहे. योग साधना ही वर्तमान आणि भविष्य या दोन्हीही काळात उपयुक्त आहे. वर्तमानात याचा अनुभव आपण घेत आहोतच. भविष्यात योग साधनेशिवाय पर्यायच राहणार नाही, असे निश्चित वाटते. कारण योग ही उपचारपद्धती नसून एक आदर्श जीवनपद्धती आहे.

योगशास्त्राचे महत्त्व आणि परिणाम थोड्याफार फरकाने जवळपास सर्वांनाच ज्ञात आहेत. हे लक्षात घेता आता भारतातील अनेक विद्यापीठांत योगाचे अभ्यासक्रम (पदविका, पदवी, पदव्युत्तर) सुरू केले आहेत. ही काळाची गरजसुद्धा आहे. कारण फक्त हातपाय हलवणे म्हणजे योगा नाही. व्यायाम म्हणजे योगा नाही. योग हे निराळे शास्त्र आहे. विद्यापीठाच्या स्तरावरून शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते तेव्हा तसे शिक्षण घेणारी पिढी तयार होते. शास्त्रोक्त शिक्षण घेतलेली मंडळी समाजात योग शिक्षण योग्य पद्धतीने देतील तेव्हाच समाजाला योगाचा यथार्थ परिणाम अनुभवायला मिळेल. कारण आजकाल चार आसने आणि चार प्राणायाम शिकलेल्या व्यक्तीही योगा शिकवायला सुरुवात करतात.

आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार? योगाचे साधक बनण्यापेक्षा ‘योगगुरू’ बनण्यात आज लोकांना जास्त रस आहे, पण गुरू बनण्यासाठी जी तपस्या अभ्यासावी लागते ती करण्याची तयारी मात्र नसते. सध्या प्रसिद्धीचे युग असले तरी जितक्या लवकर प्रसिद्धी मिळते तितक्याच लवकर ती ढासळतेसुद्धा! कारण अनुभवच नाही. जीवनात योगाचरणच नाही, पण याउलट ज्यांनी आपले आयुष्य योगास समर्पण केले आहे अशी अनेक मंडळी नाशिक शहरात आहेत. त्यात विशेषत्वाने योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, कुमार औरंगाबादकर, स्व. मणिभाई देसाई आदींनी आपले जीवन योग प्रचारासाठी खर्च केले आहे.

भविष्यातही अशा प्रकारचे योग प्रचारक तयार होतील. फक्त प्रचाराचे स्वरूप बदलेल. एकसूत्री अभ्यासक्रम सर्वत्र राबवला तर ते अतिउत्तम होईल, पण प्रत्यक्षात असे होणे थोडे अवघड आहे. नाशिकमध्ये 2013 सालापासून योग विद्याधामकडून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न योग महाविद्यालय चालवले जात आहे. त्यात योगात पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. ते आज समाजात योगाचा योग्य प्रचार-प्रसार करत आहेत. अशा महाविद्यालयांची संख्यासुद्धा शहरात निश्चितपणे वाढली पाहिजे. म्हणजे अधिकृत पदवीधारक तयार होतील.

समाजातील प्रत्येक घटकासाठी भविष्यात योग वर्ग सुरू होतील. अर्थात, गर्भसंस्कार योगाद्वारे होईल. बालकांसाठी योग, किशोरांसाठी योग, विद्यार्थ्यांसाठी योग, महिलांसाठी योग आदी. अर्थात, योगधर्माची स्थापनाच भविष्यात होईल आणि खर्‍या अर्थाने ही पुण्यभूमी अर्थात नाशिकनगरी योगभूमी होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या