World Environment Day : शहरीकरण आणि वृक्षसंवर्धन

World Environment Day : शहरीकरण आणि वृक्षसंवर्धन

दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागानेही वृक्षसंवर्धनात मोलाची भूमिका बजावून पर्यावरणरक्षणाला हातभार लावावा.

वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरीकरण होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणासह अनेक नानाविध समस्या उत्पन्न होत आहेत. वाढत्या प्रदूषणाला आला घालण्यासाठी शहरी भागात वृक्षारोपण करून ते वृक्ष झपाट्याने मोठे कसे होतील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, तसेच जल आणि वायूप्रदूषण थांबावे या उद्देशाने 5 जून, 1972 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत 130 देशांनी हजेरी लावली होती. त्यातून ‘पर्यावरण’ हा विषय सर्वदूर शालेय जीवनापासून अभ्यासक्रमात सामील करण्यात आला. हे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 जून हा दिवस 1974 सालापासून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे.“Only One Earth’ या घोषवाक्याने पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. पहिल्यांदाच 2011 मध्ये भारत देश ‘जागतिक पर्यावरण दिन’ आयोजक बनला आणि “Forest- Nature at Your Service’ हे घोषवाक्य होते. आणि आज 2022 ला देखील 50 वर्षानंतर स्वीडन हाच देश आयोजक आहे आणि “Only One Earth’ हेच घोषवाक्य आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... हा संदेश संतांनी रयतेला दिला. ‘वृक्ष’ ही वसुंधरेची हिरवी फुप्फुसे असून याच फुप्फुसांच्या माध्यमातून तुम्हा-आम्हास जगण्यासाठी आजीवन ऑक्सिजन मिळत असतो. यास्तव वसुंधरेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्तव्यबुद्धीतून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम तन-मन-धनाने राबविली जाणे काळाची गरज आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी वड, पिंपळ, आंबा, शिसम, चिंच, फणस, सप्तपर्णी, सोनचाफा, मोहर इत्यादी तर शहर सौंदर्यासाठी शिरीष, पळस, आकाशनिम, पारिजातक, अशोक बकुळ, अनंत, बहावा इत्यादी वृक्ष लावावेत.

शहरी भागामध्ये आहेत ते वृक्ष न तोडता शहरीकरणाचा विस्तार करावा आणि नव्याने विकसित होणार्‍या शहरी भागात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे. केवळ वृक्षारोपण फक्त फोटोसाठी न होता, सर्वांनी लावलेले वृक्ष जगवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भेट म्हणून बुकेऐवजी जर रोप दिले तर खूप मोठी वृक्ष लागवडीची चळवळ उभी राहू शकते. आणि यातून शहरीभागाचे पर्यावरण सुधारण्यास फायदा होईल यात तीळमात्र शंका नाही.

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे. हे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे आणि आपण सर्वांनी उद्या 5 जून 2022 रोजी असणार्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने किमान 5 झाडे लावावीत आणि त्याचे संगोपन करावे हीच पर्यावरण दिनानिमित्त माफक अपेक्षा...

- प्रा. दादासाहेब जवरे (9561677930), पर्यावरणशास्त्र अभ्यासक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com