Friday, April 26, 2024
HomeUncategorizedWorld Environment Day : वाचवू या आपली माता !

World Environment Day : वाचवू या आपली माता !

जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. पर्यावरण हे सर्व सजीव सृष्टीचे घर म्हणून ओळखले जाते. यात निर्जिव घटकांचा देखील समावेश होतो. सर्व सजीव ज्यामधे प्राणी, पक्षी आणि इतर घटक यांना स्वतःची मूलभूत गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहवे लागते. त्यामुळे आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरली पाहिजे.

- Advertisement -

नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्या कारणाने, पर्यावरणचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. सजीव सृष्टीवर घातक परिणाम होत आहे. मागील काही शतकापासून मानव आपले जीवन आनंदमय करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करत आहे. त्यातील काही प्रयोगांमुळे पर्यावरणातील घटकात बदल होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे. हे संसाधन दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण सतत वाढत चाललेली लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि त्यात मानवी जीवन सुखमय व्हावे यासाठीचे प्रयोग दिवसेंदिवस वाढेत चाललेले आहे. या सर्व कारणांनी नैसर्गिक साधनांचा मर्यादेबाहेर वापर होत आहे त्यामुळे जल, वायू, ध्वनी, अंतराळ आणि माती यांचे इत्यादींचे प्रदूषण होत आहे. विविध पर्यावरणीय समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे सजीवांचे अस्तित्वाबरोबर मानवी प्रजातीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. यासाठेी आपण पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांची माहिती घेणे आणि एक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनणे गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यातून आणि वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करु या. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करु या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवू या. पाण्याचा गैरवापर थांबवू या. अतिरीक्त इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर बंद करू. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवू या आणि या माध्यमातूनच जनजागृती करु या.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सीागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.

- Advertisment -

ताज्या बातम्या