Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedयोग्य उपायांनी कर्करोगावर नियंत्रण शक्य

योग्य उपायांनी कर्करोगावर नियंत्रण शक्य

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

पॅरिस येथे सन 2000 मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा (वर्ल्ड समिट अगेंस्ट कॅन्सर) मांडण्यात आला.सनदेच्या दहाव्या कलमात अधिकृतरीत्या 4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून जाहीर केला गेला.

- Advertisement -

कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, कर्करोगग्रस्त रूग्णांचे जीवनमूल्य उंचावणे हे उद्दिष्टे समोर ठेवून त्याविषयी जनजागृती करण्याकरिता हा दिवस साजरा करण्यात येतो. भारत कर्करोगाच्या रूग्णांची राजधानी झाल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. देशात कर्करोगाचे 22 लाख 80 हजार रूग्ण असून कर्करोगाने दरवर्षी 8 लाख जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये आपल्या देशात कर्करोगाचे 11 लाख 60 हजार नवे रुग्ण आढळले असून भविष्यात 10 पैकी एका भारतीयाला कर्करोग होऊन 15 पैकी एकाचा मृत्यू होईल,अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात. तसेच खेकडयाला सर्व दिशांनी अवयव असतात त्याप्रमाणे कर्करोग आजूबाजूला अनेक दिशांनी पसरतो.

मूलतः कर्करोग म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत आपल्याला मिळालेल्या गुणसूत्रांची जीवनशैलीमुळे होणारी हानी. आपल्या शरीरातील अवयवांमधील पेशींची झीज होत राहते, त्यांची जागा सतत नव्याने तयार होत असलेल्या पेशीं घेत रहातात. त्यासाठी पेशींचे विभाजन होताना डीऑक्सिरायबोन्यूक्लिक एसिड (डीएनए)पासून बनलेल्या गुणसूत्रांचेही विभाजन होते. असे होत असताना एका कुठल्यातरी टप्प्यावर त्यामध्ये चुकीची गुणसूत्रे घुसतात व त्यामुळे कायमस्वरुपी झालेल्या या बदलाला उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हटले जाते.

बर्‍याच वेळा हे उत्परिवर्तन हानीकारक नसते आणि त्यावर शरीरातील अनेक जैविक यंत्रणांद्वारे नियंत्रण ठेवले जाते. परंतु काही वेळा उत्परिवर्तनामुळे पेशींच्या विभाजनावर नियंत्रण रहात नाही व पेशींच्या बेलगाम वाढीमुळे मॅलिग्नंट ट्युमर्स (कर्करोगाची गाठी) तयार होऊन अवयवांच्या सुरळीत चालणार्‍या कामात व्यत्यय येऊ लागतो व त्याचे शरीरसंस्था व प्रक्रियांवर गंभीर परिणाम होतात. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कर्करोग शरीरातील जवळजवळ कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, स्वरयंत्र, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. कर्कपेशी लगतच्या भागांत रक्त वा रसावाटे पसरू शकतात यास मेटास्टेसिया (कर्कप्रक्षेप) म्हणतात.

या मार्गाने पसरणा-या कर्करोगांमध्ये मुख्यतः प्रॉस्टेट, थॉयराईड (गलग्रंथी), स्त्री-पुरुष बीजांडे, यकृत, रक्तपेशी यांचे कर्करोग प्रमुख आहेत. माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काही कारणे. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी कॅन्सर होऊ नये यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, मद्यपान, चुकीचा आहार, किरणोत्सर्ग, प्रदूषण, संप्रेरक उपचार पद्धती म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी यापासून स्वतःला दूर ठेवले तर कर्करोगाचं प्रमाण कमी होते. सोनोग्राफी व रक्त चाचण्याद्वारे कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते.

रसायनोपचार,किरणोपचार व शल्य चिकित्सा या पद्धतीने कर्करोग बरा होऊ शकतो. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. कर्करोगाच्या उपचार पध्द्ती दिवसेंदिवस महागडया असल्याने सामान्यांना ते परवडत नाहीत. सिनेसृष्टीतील लोकांना त्यांच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असते, ते उपचारासाठी परदेशात जातात त्यातील काही बरे होऊन परतही येतात. काही रुग्णांचे तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतच्या अवयवांमधील कर्करोगामुळे अन्नाचे सेवन, पचन व शरीराचे पोषण होत नाही म्हणून बर्‍याच वेळा या उपचरादरम्यान रुग्णाचे वजन व रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी होते, केस गळतात, बहुतांश रूग्ण खचून जातात, निराशेच्या गर्तेत जातात व शेवटी मृत्यू पावतात. येणार्‍या काळातील कर्करुग्ण संख्येत होणारी वाढ व त्यामुळे होणारी जीवितहानी थांबविण्यासाठी कर्करोगाच्या स्टेजेस शोधणारे बायोमार्कर्सचे संशोधन, निदान आणि उपचारासाठी आयुर्वेद, अल्योप्याथीसह औषधनिर्मितीत गुंतवणुक वाढवली पाहिजे. भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं.

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (ऊआयसीसी), केंद्रिय आरोग्य आणि कल्याण मंत्रालय, कर्करोग संशोधन संस्था व आपले शास्त्रज्ञ पुढच्या काही वर्षातील कर्करोगाशी वाढत्या घटनांशी लढा देण्यास सज्ज असतील. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेने स्थानिक आरोग्य संस्थेच्या साहाय्याने संमेलने, व्याख्याने, प्रदर्शने तसेच कर्करोग लढा निधी उभारणीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. आकाशवाणी, दूरदर्शन व वृत्तपत्रांतून 4 फेब्रुवारी किंवा त्या आठवड्यात कर्करोगविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित करणेसाठी सकारात्मक कृतीसह वैयक्तिक व सामाजिक बांधीलकी जोपासली जावी ही अपेक्षा असते.

( लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या