उज्ज्वला योजनेची ज्योत विझणार?

उज्ज्वला योजनेची ज्योत विझणार?

- अपर्णा देवकर

2016 मध्ये जेव्हा उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात आली होती, तेव्हा घरगुती गॅस सिलिंडरचा दर होता 550 रुपयांपेक्षाही कमी! त्याच काळात असे काही ग्राहक दिसून आले होते, ज्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घरात आणला; परंतु एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर त्यांना 550 रुपयांतही परवडत नव्हता. आता तर सिलिंडरचे दर लवकरच चारआकडी होतील, असे दिसते. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेचे भवितव्य अंधारले आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे सातत्याने वाढत असलेले दर पाहून गॅस ग्राहकांना घाम फुटला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच हजारो कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करीत होती. उरलीसुरली कसर गॅस सिलिंडरच्या दरांनी भरून काढली. यावर्षी एक जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजेच मागील दहा महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारीला दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, ती आता 899.50 रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 8 वेळा वाढ झाली आहे तर गेल्या सात वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत (14.2 किलो) दुप्पट होऊन 899.50 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजे 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 410.50 रुपये होती, ती आता दुप्पट झाली आहे.

अशा प्रकारे गेल्या सात वर्षांत सातत्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत राहिली आहे. अर्थात, या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही वेगाने वाढले आहेत. दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1736.50 रुपये झाली आहे. ज्या गतीने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत, ते पाहता लवकरच गॅससाठी चारआकडी रक्कम मोजावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. वास्तविक, स्वयंपाकाचा गॅस ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज आहे. स्वयंपाकाचे हे सर्वांत सुलभ साधन आहे. परंतु गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज बहुतांश लोकसंख्या निराश आणि हताश झाली आहे. तरीही सरकार मात्र शांतच आहे.

वास्तविक, ही चिंता केवळ सर्वसामान्य गॅस ग्राहकांचीच आहे असे नाही. सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेच्या मार्गातही मोठी समस्या या दरवाढीमुळे उभी राहिली आहे. वास्तव असे की, गॅसच्या सातत्याने वाढणार्‍या दरांमुळे सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर नकारात्मक परिणाम होत आहे. प्रत्येक स्वयंपाकघरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे अस्तित्वच दरवाढीमुळे धोक्यात आले आहे. लाभार्थ्यांना मिळालेले गॅस आता घरात ‘शोपीस’ म्हणून पडून राहू लागले आहेत.

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे पुन्हा एकदा गोवर्‍या आणि लाकडाच्या चुलींवरच स्वयंपाक करताना दिसू लागली आहेत. ‘तुम्हारी फाइलों में गाँव का मौसम गुलाबी है मगर ये आँकडे झूठ है, ये दावा किताबी है,’ या अदम गोंडवी यांच्या ओळी उज्ज्वला योजनेला चपखल शोभून दिसतात. उज्ज्वला योजनेसंदर्भात आपण भूतकाळाची काही पाने उलटून पाहिल्यास असे दिसते की, पाच वर्षांपूर्वी महिलांना चांगले इंधन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी जोरदार प्रचार-प्रसार आणि गाजावाजा करून ही योजना सुरू केली.

उत्तर प्रदेशातील बलिया गावापासून या योजनेला प्रारंभ झाला होता. सरकारने या योजनेसाठी 8000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. अर्थात, भारताला धूरविरहित देश बनविणे हे या योजनेचे एक दीर्घकालीन उद्दिष्ट होतेच. परंतु गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत राहिल्याने या योजनेने मान टाकल्याचे दिसून येत आहे.

2016 मध्ये जेव्हा या योजनेची सुरुवात करण्यात आली होती, तेव्हा घरगुती गॅस सिलिंडरचा दर होता 550 रुपयांपेक्षाही कमी! त्याच काळात असे काही ग्राहक दिसून आले होते, ज्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घरात आणला; परंतु एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर त्यांना 550 रुपयांतही परवडत नव्हता. त्यामुळे दुसरा सिलिंडर त्यांनी आणलाच नाही आणि पुन्हा एकदा धूरयुक्त पारंपरिक चुलीकडे ही कुटुंबे वळली. यावरून आपण विचार करू शकतो की, आता गॅस सिलिंडरची किंमत नऊशे रुपयांच्या घरात असताना उज्ज्वला योजनेतील किती लाभार्थी कुटुंबे गॅस सिलिंडर खरेदी करत असतील? तेही कोरोनानंतरच्या भयानक आर्थिक परिस्थितीत आणि कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावलेल्या देशात! बेरोजगारीचा सर्वाधिक फटकाही याच गरीब वर्गाला बसला आहे.

पुढील आकडेवारी पाहिल्यावर आपण उज्ज्वला योजनेच्या यशापयशाचा लेखाजोखा निश्चितपणे करू शकतो. डिसेंबर 2019 रोजी सीएजीच्या (महालेखापाल) अहवालानुसार 35 टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने पुन्हा एकदा चुलीसाठी लाकडे गोळा करू लागले. याच अहवालात असे म्हटले आहे की, सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या तुलनेत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये गॅस सिलिंडर खरेदी करण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी आहे.

‘डाऊन टू अर्थ’ नियतकालिकाने जानेवारी 2019 मधील एका अहवालात लिहिले आहे, की उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी दुसरा सिलिंडर कधी आणलाच नाही. ही आकडेवारी पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की, भारताच्या बहुतांश जनतेकडे गॅस सिलिंडर खरेदी करण्याची ताकदच नाही. लोकांची आर्थिक ताकद कमकुवत होत चालली आहे. अशा स्थितीत या योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह लावले जाणे स्वाभाविकच आहे. तरीही सरकार उज्ज्वला योजनेविषयी लोकांना पडलेल्या प्रश्नाबाबत फारसे गंभीर दिसत नाही. योजनेचे श्रेय घेताना मात्र सरकार अत्यंत सक्रिय दिसले होते. या ‘यशा’ची प्रचंड जाहिरातबाजीही करण्यात आली होती.

याच कारणामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात उज्ज्वला योजनेअंतर्गत एक कोटी नवीन कनेक्शन देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे; परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद मात्र अजिबात केलेली नाही. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी दरमहा नवा सिलिंडर कसा घेऊ शकतील? कारण आता तर त्याचा दर त्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेला आहे. याच कारणामुळे गरीब कुटुंबांचे या योजनेशी नाते जुळताना नव्हे तर तुटताना दिसत आहे. गावागावांमध्ये पुन्हा एकदा परंपरागत चुली पेटू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर महिलांच्या आरोग्यासाठी त्यांना चांगले इंधन पुरविण्याचे सरकारचे स्वप्नही अधुरेच राहील असे दिसत आहे. आकडेवारीकडे लक्ष दिल्यास भारतात सुमारे 50 कोटी लोक आजही पारंपरिक चुलींचा वापर करतात. या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लाकडे, वाळकी पाने, शेणाच्या गोवर्‍या आदी सामग्रीचा ज्वलनासाठी वापर केला जातो. यामुळे घराघरांत होत असलेल्या वायू प्रदूषणाचा अंदाज लावणे अवघड नाही.

चुलीच्या सहाय्याने स्वयंपाक करणार्‍या महिलांना डोळ्यांची जळजळ, तसेच हृदय आणि फुफ्फुसांचे आजार जडतात, हे सर्वांना ठाऊक आहेच. आजाराचे स्वरूप गंभीर बनल्यास या महिलांना जिवालाही मुकावे लागते. केवळ सिलिंडरचे वाटप करून महिलांच्या स्वयंपाकघराचे चित्र बदलणार नाही. लोकांच्या आवाक्यात येणार नाहीत, इतके गॅस सिलिंडरचे दर वाढणार नाहीत, याचीही खबरदारी सरकारने सतत घेतली पाहिजे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com