प्रधानाच्या परीक्षेचा उपयोग होणार का?

प्रधानाच्या परीक्षेचा उपयोग होणार का?
बिरबल/birbal

नाशिक । बिरबल | वैभव कातकाडे | Nashik

आटपाट नगरात असलेल्या प्रधानाचा नागरिक हा जिव्हाळ्याचा आणि प्राधान्याचा विषय होता. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय करू अन काय नको असे या प्रधानाला वाटत असे. नागरिकांनी देखील काही काळ प्रधानाला साथ दिली होती. मात्र प्रधानाचा नवनवीन प्रयोग बघता ते नागरिकांसाठी कंटाळवाणे होत असायचे.

प्रधानाने नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी वाहतूक नियमात (Traffic rules) शिरस्त्राण (Helmet) वापराबद्दल मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. शिरस्त्राण वापरा अन्यथा इंधन (Fuel) मिळणार नाही; असे देखील बजावले होते. एवढ्यावरच न थांबता शिरस्त्राण नसेल तर कोणीही सहकार्य करू नये असे फर्मान काढले. नागरिकांना या सगळ्याचा वीट तर येऊ लागलाच पण आपल्याच फायद्यासाठी प्रधान हा सारा खटाटोप करत आहे म्हटल्यावर सर्वांनी तोंडावर बोट ठेवत सकारात्मक प्रतिसाद (Positive response) दिला होता.

नागरिकांना काहीही वाटो; प्रधान मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. प्रधानाने यापुढे जाऊन समुपदेशन नावाचा नवीन उपक्रम सुरू केला होता. नगरात फिरत असताना जर शिरस्त्राण नसेल तर प्रधानाचे सेवक नागरिकांना तात्पुरते जेरबंद करायचे आणि त्यांचा मोठ्या पडद्यावर उपदेश देऊन आम्ही हे शिकलो आहोत, आता आम्ही नियमित शिरस्त्राण वापरू या आशयाचे प्रमाणपत्र द्यायचा.

या शिरस्त्राणसाठी करत असलेला खटाटोप बघता एक दिवस प्रधानाच्या मनात वेगळीच युक्ती आली. त्याने त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी फर्मान काढले. शिरस्त्राण नसल्यास तात्पुरते जरेबंद केले जाईल; समुपदेशन केले जाईल आणि त्यानंतर परीक्षा घेऊन ती पास झाल्यासच सोडले जाईल. अन्यथा शिरस्त्राण न वापरण्याबाबत असलेला गुन्हा नोंदविण्यात येईल. या फर्मनाने सगळ्या नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती. आता हे काय नवीन असे म्हणत नागरिक दुषणे देखील द्यायला लागली होती.

या नव्या आदेशात दिल्याप्रमाणे नागरिकांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे; परीक्षा केंद्रे (Examination Centers) उभारणे आदी बाबींची तपासणी सध्या आटपाट नगरात सुरू आहे. या मोहिमेने आटपाट नगर आता शिरस्त्राणयुक्त होणार आहे. मात्र, त्याच वेळी गुन्हेगारी (Crime), घरफोडी यांचे काय असा देखील प्रश्न नागरिक विचारू लागले होते.

Related Stories

No stories found.