Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedरजनींची जादू चालेल?

रजनींची जादू चालेल?

– के. श्रीनिवासन

तमिळनाडूचा राजकीय इतिहास पाहिल्यास आपल्याला असे दिसून येईल की, तेथील राजकारणावर चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांची नेहमीच पकड राहिली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही आता राजकारणात उतरण्याची घोषणा केली असून, जानेवारी 2021 मध्ये ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत आणि तमिळनाडू विधानसभेची निवडणूकही लढविणार आहेत.

- Advertisement -

रजनीकांत यांचे चाहते तर नव्वदीच्या दशकापासूनच त्यांच्या राजकारणप्रवेशाच्या घोषणेची प्रतीक्षा करीत होते. एकंदरीत रजनीकांत यांना राजकारणात यायला 25 वर्षे उशीर झाला आहे. 1996 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचे दत्तक पुत्र व्ही. एन. सुधाकरन यांच्या लग्न समारंभात मोठा खर्च करण्यात आला होता आणि त्यावेळी रजनीकांत खुलेपणाने असे म्हणाले होते की, सरकारमध्ये बराच भ्रष्टाचार असून, अशा प्रकारचे सरकार सत्तेवर असता कामा नये. त्यावेळीच त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वप्रथम लक्षात आली होती. परंतु ते राजकारणात येईपर्यंत 2020 साल उजाडावे लागले.

द्रवीड आंदोलनाचे मुख्य आधारस्तंभ, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख करुणानिधी तसेच अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आणि एक पोकळी तेथे दिसू लागली. राज्यात वेगळ्या प्रकारची विचारधारा आणि वेगळ्या प्रकारचे संघर्षही जन्म घेत आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये झालेल्या फाटा फुटीनंतर मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम जरी सरकार चालवत असले तरी पक्षात वर्चस्वासाठी संघर्ष असल्याने आणि टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अण्णा द्रमुकमधील शक्तिसंतुलन कधीही डळमळीत होऊ शकते.

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची क्षमता आणि ताकदीचा विचार करता 2016 ची विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती आणि त्यांना दुसर्‍यांदा पराभव पत्करावा लागला होता. 2017 मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर आर. के. नगर येथील पोटनिवडणुकीत द्रमुक उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली होती. आता भारतीय जनता पक्षाने ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत 48 जागा जिंकून दक्षिण भारतात प्रवेश केला असून, दक्षिणेकडील राज्यात कोणत्याही अन्य पक्षासाठी जागाच ठेवायची नाही, असे भाजपच्या मनात आहे. दक्षिण भारतातही भाजपला पक्षविस्तार करायचा आहे. कर्नाटकमध्ये तर भाजपचेच सरकार आहे. तमिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. या पक्षांचे नेते पूर्वी संस्थापक सी. एन. अण्णादुरई यांच्या विचारधारेनुसार जनतेसाठी संघर्ष करीत असत. परंतु आज या पक्षांचा संघर्ष कौटुंबिक बनला आहे.

आता रजनीकांत यांच्या राजकारणप्रवेशाच्या घोषणेने द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यासमोर नवे आव्हान उभे केले आहे. तमिळ चित्रपटातील आणखी एक लोकप्रिय चेहरा म्हणजे कमल हासन यांनीही यापूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या राजकीय ताकदीची परीक्षा अद्याप व्हायची असली तरी तमिळनाडूचा राजकीय इतिहास पाहता चित्रपटांमधून आलेल्या नेत्यांचाच दबदबा तेथील राजकारणावर दिसून येतो. काँग्रेसचा विचार करायचा झाल्यास द्रमुकची सत्ता जेव्हा राज्यात सर्वप्रथम आली, तेव्हापासून काँग्रेसची सत्ता पुन्हा कधीच आली नाही आणि कालांतराने काँग्रेसची भूमिका राज्यात दुय्यम पक्षाची बनली.

रजनीकांत यांचा राजकारणप्रवेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा असून, तो यशस्वी झाल्यास त्याचा दूरगामी प्रभाव पाहायला मिळेल. पहिला मुद्दा असा की, तमिळ अस्मितेच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणार्‍या या राज्यात एका बिगरतमिळ कलावंताचा स्वीकार केला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. करुणानिधी आणि जयललिता यांच्यासारख्या दिग्गजांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात आलेली पोकळी रजनीकांत यांच्या आगमनाने किती भरली जाणार, हाही प्रश्न आहेच. रजनीकांत यांच्या आध्यात्मिक राजकारणाचे भविष्य अजूनही बंद मुठीतच आहे.

रजनीकांत यांचे मूळ नाव रजनीकांत गायकवाड आहे. त्यांची मातृभाषा मराठी आहे; परंतु त्यांचे पिता पूर्वीच्या मैसूर राज्यात पोलिस कॉन्स्टेबल होते. त्यामुळे त्यांना कन्नडही चांगली येते. शिक्षण घेतल्यानंतर रजनीकांत यांनी अनेक छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. बंगळुरू शहरात बस कंडक्टर म्हणूनही काम केले. 1975 मध्ये त्यांना ङ्गअपूर्वा रागगंगलफ या तमिळ चित्रपटात आपली प्रतिभा दाखविण्याची संधी सर्वप्रथम मिळाली. त्यांची खास संवादफेक, हटके स्टाइल आणि प्रभावी अभिनयाने त्यांना तमिळ चित्रपटात प्रचंड उंचीवर नेऊन ठेवले. तमिळ लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. रजनीकांत यांनी तमिळ मुलीशीच विवाह केला आणि तमिळींच्या मुद्द्यांना वेळोवेळी समर्थन देऊन आपण पूर्णपणे तमिळ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या 69 वर्षीय रजनीकांत यांच्यासाठी ही कसोटीची वेळ आहे. रजनीकांत यांची तब्येतही फारशी चांगली नाही आणि वानप्रस्थाश्रमात जाण्याच्या वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. द्रवीड राजकारणात स्थान निर्माण करणे त्यांच्यासाठी सोपे असणार नाही. पारंपरिक द्रवीड राजकारणापेक्षा स्वतःचे वेगळेपण सिद्ध करू शकतील, किंवा तेच राजकारण वेगळ्या ढंगाने करू शकतील, असे रजनीकांत यांच्याजवळ काय आहे, याचाही विचार करायला पाहिजे. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष असेल आणि विचारधारा आध्यात्मिक असेल, असे संकेत रजनीकांत यांनी दिले आहेत. त्यांचे आध्यात्मिक राजकारण नेमके काय आहे आणि धर्मनिरपेक्षतेशी संबंध जोडणारी ही आध्यात्मिकता वास्तवात कशी आहे, हे जाणून घेणे अत्यंत उद्बोधक असणार आहे. देशाने धर्मनिरपेक्षतेचे अनेक पैलू पाहिले आहेत आणि सोयीनुसार धर्मनिरपेक्षता सांगणारे, सोडणारेही अनेकजण देशाने पाहिले आहेत. परंतु ‘आध्यात्मिक राजकारण’ ही संकल्पना पूर्णपणे नवीन वाटते. रजनीकांत यांचे आध्यात्मिक राजकारण हे एक वेगळेच पाऊल आहे गांधीवादी विचारधाराही आध्यात्मिकतेशी जोडलेलीच मानली जाते. परंतु वास्तवात राजकारण हा शंभर टक्के प्रापंचिक विषय आहे.

मुळात राजकारण असतेच राज्य करण्यासाठी. राजकीय सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळे मार्ग अवलंबितात. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांची ‘आध्यात्मिक राजकारण’ ही संकल्पना तमिळ आणि भारतीय राजकारणाला वळण देणारी ठरते का, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या