मानवाला मृत्यूवर विजय मिळेल ?
फिचर्स

मानवाला मृत्यूवर विजय मिळेल ?

Balvant Gaikwad

पुराणकथांमध्ये वाचलेल्या आणि आजही आवडीने सांगितल्या-ऐकल्या जाणार्‍या अमरत्वाच्या म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवण्याच्या कथांना वैज्ञानिक आधार नसल्याचे किंवा त्या भाकडकथा असल्याचे
नेहमीच बोलले जाते. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि अफाट प्रमाणात जमवण्यात येणारा विदा (डेटा) यांच्या सहाय्याने मानव आज असे काही प्रयत्न करत आहे ज्यामुळे हळूहळू सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरक कमी होत चालला आहे.

महेश कोळी

नादी काळापासून अमरत्व म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवण्याची मानवाची इच्छा राहिली आहे. नव्या दशकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि अफाट प्रमाणात जमवण्यात येणारा विदा (डेटा) यांच्या सहाय्याने मानव असे काही प्रयत्न करत आहे ज्यामुळे हळूहळू सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरक कमी होत चालला आहे. या प्रयत्नांचा आणि त्यांना मिळणार्‍या यशाचा घेतलेला हा वेध.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग आणि विदा संग्रहण तंत्रज्ञान हे तिन्ही एकमेकांशी संलग्न आहे. आर्टिफिशिल इंटेलिजन्स ही संगणक विज्ञानाची एक शाखा असून यामध्ये संगणकांना बुद्धिमत्तेच्या सहाय्याने होणार्‍या व्यवहारांसाठी तयार केले जाते. एआयच्या आधारानेच आज यंत्रे अनेक गोष्टी शिकत आहेत. यालाच मशीन लर्निंग म्हटले जाते. यंत्रांना ‘शिक्षित’ करण्यासाठी अफाट प्रमाणात जमवल्या गेलेल्या डेटाचा उपयोग होत आहे. त्या डेटा विश्लेषणातून एआयच्या सहाय्याने चालणारी यंत्रे दिवसेंदिवस अधिकाधिक उपकारक होत चालली आहेत. आजवर बुद्धिमत्तेवर मनुष्यप्राण्याची मालकी होती, पण आजच्या काळात यंत्रांकडून बुद्धिमत्ता आत्मसात केली जात आहे.

आज दिवसागणिक, आठवड्यागणिक एक असे नवे तंत्रज्ञान समोर येते ज्यामध्ये जग बदलून टाकण्याची क्षमता असते. एका अत्यंत उत्कंठापूर्ण जगात आपण जगत आहोत. आज दिसून येणारे बदल आणि शक्यता अभिनव आणि अद्भूत आहेत. या बदलांचा परिणाम मनुष्यप्राण्यावर कसा, किती आणि कधी होणार हे येणारा काळच सांगेल. पण तूर्तास तरी आपण यासंदर्भातील प्रयोगांचा वेध घेणे
औचित्याचे ठरेल.

अमेरिकेतील राष्ट्रीय फुटबॉल लीगचा खेळाडू टीम शॉ हा मैदानावर जेव्हा लोकांना ढकलत ढकलत गोलच्या दिशेने पुढे जायचा तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नव्हते. 2010 पर्यंत तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळत राहिला. पण 2014 मध्ये त्याला एमियोट्रॅफिक लॅटरल स्क्लेरोसिस या आजाराने ग्रासले. या आजारात शरीरातील स्नायू कमजोर होऊ लागतात. या व्याधीमुळे टीम शॉचे खेळणे आणि चालणे-फिरणे पूर्ण बंद झाले. इतकेच नव्हे तर त्याला अन्न गिळण्याचीही शक्ती राहिली नाही. नळीद्वारे अन्न दिले जाऊ लागले. त्याची वाणी हळूहळू बंद होत गेली.

अशा अवस्थेत त्याच्यासाठी गुगलच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रोग्रामच्या माध्यमातून एक प्रोग्राम तयार करण्यात आला. याच्या सहाय्याने त्याच्या जुन्या मुलाखती व घरातील व्हिडिओ एकत्रित करण्यात आले. त्यातून आवाजाचे नमुने जमा केले गेले. त्या स्वरांमधून प्रत्येक अक्षर घेऊन त्या प्रोग्राममध्ये फिड करण्यात आले. जोडीला टीमच्या ताज्या-कमी झालेल्या आवाजातून त्याची बोलण्याची शैलीही फिड करण्यात आली. या संपूर्ण डेटाच्या सहाय्याने तयार झालेल्या प्रोग्रामच्या माध्यमातून टीम आपल्या स्मार्टफोनद्वारे बोलण्याची क्षमता परत मिळवू शकला आहे.

तो जे आणि जेवढे बोलतो ते शब्दोच्चार या प्रोग्रामच्या माध्यमातून त्याच्या तरुणपणातील आवाजात प्रकट होतात. जगप्रसिद्ध रॅप संगीतकार विल्यम अ‍ॅडम्स अर्थात विल आय एम हा न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे आपल्या स्वतःचे व्हर्च्युअल स्वरूप तयार करत आहे. अर्थातच हे काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने केले जात आहे. व्हर्च्युअल अ‍ॅडम हा त्याचा क्लोन नसून संगणकावर तयार केलेली त्याची डिजिटल प्रतिमा असेल.

पण ही प्रतिमा निर्जीव छायाचित्रासारखी नसून ती अ‍ॅडम्सप्रमाणेच बोलणारी, विचार करणारी आणि संगीत रचनाही करणारी असेल. यासाठी त्याने स्वतःची इत्यंभूत माहिती या डिजिटल प्रतिमेला देऊ केली आहे. अ‍ॅडम्स सांगतो, भविष्यात हा त्याचा अवतार माझ्याप्रमाणेच सर्व कामे करेल. यासाठी त्याला आवाज आणि चेहराही देण्यात आला आहे. अ‍ॅडम्सच्या आवाजाचे रेकॉर्डिंग आणि संग्रहण करून त्यातील शब्द-स्वर हे सुट्या स्वरुपात या प्रतिमेमध्ये फिड करण्यात आले आहेत.

त्यामुळे हा अवतार अ‍ॅडम्सप्रमाणेच बोलू शकेल आणि त्याच्याच आवाजाप्रमाणे गाणेही गाऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅडम्सचा हा अवतार कधीही नष्ट होणार नाही. त्यामुळे हे एक प्रकारचे अमरत्वच आहे. अर्थात, अ‍ॅडम्सला एक चिंताही वाटते. हा अवतार योग्य आणि अचूकपणाने बनेल की नाही याबाबत तो साशंक आहे. त्याचबरोबर भविष्यात मानवाकडून किंवा समूहाकडून याची ओळख चोरली जाणार नाही ना याचाही विचार केला जात आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे जगभरात मानवजातीच्या एकंदर भविष्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच एआय तंत्रज्ञान मानवाच्या क्षमतांमध्ये वृद्धी करण्यासही सहाय्यभूत ठरत आहे. याचे उदाहरण म्हणजे जेसन बर्नेस. बर्नेस हा एक उत्कृष्ट ड्रमवादक आहे. पण वयाच्या 22 व्या वर्षीच त्याला आपला डावा हात गमवावा लागला. त्यामुळे तो खूप चिंताक्रांत झाला होता.

तो जॉर्जियातील तंत्रज्ञान शिक्षण संस्थेत कार्यरत असणार्‍या प्रा. गिल वाईनबर्ग या संगीत तंत्रज्ञानाच्या प्राध्यापकांना भेटला. तेथे रोबोटिक संगीतकार तयार करण्यावर चर्चा झाली. त्यातून एक प्रोस्टेथिक हात विकसित करण्यात आला. त्या हातामध्ये दोन स्टीक देण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील एक स्टीक जेसनच्या इच्छेनुसार चालते तर दुसरी स्टीक त्याने वाजवलेल्या संगीतानुसार एआयवर आधारित रोबोटिक तंत्रानुसार ड्रम वाजवते.

आज बायोन्सिच्या माध्यमातून शारीरिक अपंगत्वावर मात करण्यात मानवाला यश आले आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्याने दिव्यांग लोकांच्या केवळ अक्षमतेवरच मात केलेली नसून त्यांच्या अंगभूत क्षमता वाढवण्यासही मदत केली आहे. बायोनिक्सद्वारे बनलेले हे आधुनिक अवयव मानवाच्या सामान्य अवयवांप्रमाणेच कार्य करतात. ही क्रांती पाहता येणार्‍या काळात अपूर्णपणा नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही. अवतार आणि किंगकाँग यांसारख्या चित्रपटांसाठी तंत्रज्ञानतज्ज्ञ म्हणून काम करून ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या मार्क सेगर या बायो इंजिनिअरने आपल्या सोल मशिन्स या कंपनीद्वारे बेबी एक्सची रचना केली आहे. ही दोन वर्षांची मुलगी आहे.

2014 पासून तिच्यावर ते काम करत आहेत. ही मुलगी त्यांच्याशी लहान मुलांप्रमाणे संवाद साधण्याचा प्रयत्न करते. गुडघ्यावर भार देऊन रांगणार्‍या मुलीची ही जिवंत नक्कल आहे. ही बेबी एक्स कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असते आणि कॅमेर्‍याच्या सहाय्याने मार्क यांच्याकडे पाहते. मायक्रोफोनद्वारे त्यांचा आवाज ऐकते. मार्क यांच्या हावभावांनुसार तीही आपल्या चेहर्‍यावर भाव आणते. हसणे, रडणे, घाबरणे यांसारख्या प्रतिक्रिया देते. ती आता बोलायलाही शिकत आहे. विशेष म्हणजे हे सर्व ती स्वतःचे स्वतः करत आहे.

असे म्हणतात की, मानवाचा मेंदू हा 8500 कोटी न्यूरॉनच्या नेटवर्कमुळे चालत असतो. त्याच धर्तीवर या बेबी एक्ससाठी हजारो नोडस्चे व्हर्च्युअल नेटवर्क बनवण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. त्या नोडस्समोर ज्या गोष्टी केल्या जातात त्या सर्व ती मुलगी आत्मसात करते, शिकते. हा एक डिजिटल ब्रेन आहे, पण मार्कला आता मानवाच्या मेंदूसारखा मेंदू विकसित करायचा आहे. बघू या काय
होते ते?

Deshdoot
www.deshdoot.com