बहनजी कमबॅक करणार काय?

बहनजी कमबॅक करणार काय?
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) सपाटून मार खाणार्‍या बसपने ( BSP) आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाला (Brahmin society) पुन्हा जवळ घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे पक्षातील मातब्बर नेते पक्षाला रामराम ठोकत असताना पुढील वर्षी बहनजी मायावतींचे (Mayawati) कमबॅक होणार काय? याची सर्वांना उत्सुकता आहे.

23 जुलै रोजी बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्र यांचे अयोध्येतून प्रबोधन विचार परिषदेला सुरवात करणे हा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदलेल्या रणनितीचा भाग होता. तत्पूर्वी मिश्र यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर प्रामुख्याने ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रबोधन विचार परिषदेचे पोस्टरही रिलिज केले.

या पोस्टरमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या मॉडेलबरोबरच भगवान राम आणि परशुराम यांचेही चित्र होते. यातील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंतच्या पोस्टरमध्ये दिसणारा निळा रंग हा नव्या पोस्टरमध्ये मात्र केवळ चिन्हाच्या स्वरुपातच वापरला. उर्वरित पोस्टर हे भगव्या रंगाने भरलेले होेते.

अयोध्येत परिषदेला जाण्यापूर्वी मिश्रा यांनी रामलल्ला आणि हनुमानगढी येथे दर्शन घेेतले तसेच शरयू नदीची आरती देखील केली. एखादी परिषद किंवा सभा आयोजित करण्यापूर्वी मंदिरात दर्शनासाठी बसपचे नेते प्रथमच गेले. प्रबोधन विचार परिषदेची सुरवात 21 पंडितांंच्या उपस्थितीत आणि शंखनादाने करण्यात आली.

मिश्र यांनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात श्रीराम आणि परशुराम यांचा अनेकदा उल्लेख केला. सत्तारूढ भाजपकडून श्रीरामाच्या नावावर फसवणूक केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या 60 पेक्षा अधिक जिल्ह्यात आयोजित प्रबोधन विचार परिषदेच्या माध्यमातून मिश्रा यांच्याकडून ब्राह्मण वर्गाला आकर्षित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत.

अर्थात या बदलाचे कारण आपल्याला मिश्रा यांच्या 23 जुलैच्या ट्विटमधून मिळेल. यात त्यांनी म्हटले की, सत्तेची किल्ली ब्राह्मण (13 टक्के) आणि दलित (23 टक्के) यांच्या हातात आहे.

मिश्रा हे प्रत्येक ब्राह्मण संमेलनात एकच गोष्ट सांगत आले, ते म्हणजे 13 टक्के ब्राह्मण सोबत असतील तर 23 टक्के दलित समाजाला सोबत घेऊन पक्षाचा विजय निश्चित आहे. 2022 च्या विधानसभेपूर्वी बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मयावती यांनी पुन्हा एकदा दलित आणि ब्राह्मण यांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सोशल इंजिनिअरिंगच्या बळावरच 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्या.

बसपचा ब्राह्मण चेहरा सतीशचंद्र मिश्रा म्हणतात की, बसपच्या सरकारच्या काळात ब्राह्मणाचा जेवढा सन्मान झाला, तेवढा अन्य कोणत्याही पक्षाच्या राजवटीत झाला नाही. यूपीतील योगी सरकारमध्ये कधी नव्हे एवढे ब्राह्मणांचे खच्चीकरण झाले आहे. ब्राह्मणांवर खोटेनाटे खटले दाखल केेले जात आहे. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी मिश्र यांनी त्या सर्व ब्राह्मणांची कायदेशीर मदत करण्याची घोषणा केली आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत तळागळाच्या पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रबोधन विचार परिषदेनंतर प्रबोधन समाज मंडळ संयोजन समितीची नियुक्ती केली जात आहे. यात ब्राह्मण, ठाकूर यांच्यासमेत अन्य जातींचे प्रतिनिधित्व देखील असणार आहे. परंतु या समितीची कमान ब्राह्मण समाजाच्या नेत्याकडे असेल.

बूथ पातळीवर उच्चवर्णीयांना बसपला जोडण्यासाठी ही समिती बूथ संमेलनाचे आयोजन करेल. त्याचबरोबर ही समिती बसपच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देखील घरोघरी पोचवणार आहे. लखनौतील राजकीय विश्लेषक, प्रोफेसर मनीष हिंदवी म्हणतात की, 2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसप सरकारमध्ये योगदान देणारे बहुतांश नेता आज मायावती यांच्यासमवेत नाहीत.

यात स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी, लालजी वर्मा, राम अचल राजभर, ब्रजेश पाठक आदींचा उल्लेख करावा लागेल. अशावेळी दलित आणि ब्राह्मण सोशल इंजिनिअरिंगला यश मिळवून देण्यासाठी बसपला खूपच मेहनत करावी लागेल.

2007 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 403 पैकी 206 जागा जिंकून सरकार स्थापन करणारी बसप 2017 च्या विधानसभेला 17 जागांवरच थांबली. गेल्या चार वर्षाच्या काळात शिस्तभंगाच्या कारणावरून बसपतून 9 आमदार निलंबित झाले आहेत. 2019 च्या पोटनिवडणुकीत आंबेडकरनगरच्या जलालपूर विधानसभा निवडणुकीत बसपचा पराभव झाला. यावर्षी पंचायात निवडणुकीनंतर मायावती यांनी आंबेडकरनगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते आणि आमदार लालजी वर्मा आणि राम अचल राजभर यांना पक्षातून काढून टाकले.

2007 च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला जोरात चालला आणि 41 ब्राह्मण आमदार बसपाच्या तिकीटावर निवडून आले होते. आता त्याची संख्या चारवर आली आहे.

सध्याच्या काळात बसपाकडे ब्राह्मण चेहरा म्हणून सतीशचंद्र मिश्रा, गोरखपूरच्या चिल्लूपारचे आमदार विनय तिवारी, माजी कॅबिनेट मंत्री अनंत मिश्र, नकुल दुबे, रत्नेश पांडेय आणि अलीकडेच घरवापसी करणारे पवन पांडेय यांचा समावेश आहे. मनीष हिंदवी म्हणतात की, मायावती यांच्यासमवेत ताळमेळ न बसल्याने अनेक नेत्यांनी बसपची साथ सोडली किंवा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.

अशा मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी बसपची स्थिती शोचनिय झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बसपतील 100 पेक्षा अधिक समन्वयकांनी पक्ष सोडला आहे. यादरम्यान, बसपतील नाराज नेत्यांनी समाजवादी पक्षाकडे जाण्यास पसंती दिली आहे. 2019 ची लोकसभा बसपने समाजवादी पक्षाला सोबत घेऊन लढली होती. या निवडणुकीत बसपच्या खासदारांची संख्या शून्यावरून दहावर पोचली. परंतु समाजवादी पक्षाचे पाचच खासदार राहिले.

लोकसभा निवडणुकीनंतर तात्काळ दोघेही वेगळे झाले. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यात राजकीय ताणाताणी वाढली होती. त्यावेळी मायावतींकडून भाजपप्रती नरमाईचे धोरण असल्याने बसपच्या सात आमदारांनी बंड पुकारले. समाजवादी पक्षाला शह दिल्याने या नेत्यांनी बंड पुकारले होते, असे पक्षातील नेते सांगतात. नाराज मायावतींनी आमदार चौधरी अस्लम अली, अस्लम राईनी, मुज्तबा, सिद्दिकी, सुषमा पटेल, वंदना सिंह, हरगोविंद भार्गव आणि हकिमलाल बिंद यांना निलंबित केले.

यापैकी अनेक आमदार 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढू शकतील, असा तर्क बांधला जात आहे. अलीगडच्या कोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जमीरउल्लाह यांनी हत्तीची साथ सोडून सायकलस्वारी सुरू केली आहे. ते म्हणतात, की उत्तर प्रदेशात केवळ समाजवादी पक्षच भाजपला टक्कर देऊ शकतो. दुसरीडे बसपने भाजपशी मिलीभगत केल्याने जनतेशी विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. बसप नेत्यांनी मात्र पक्षातून स्वार्थी नेत्यांना काढून टाकल्याने पक्षाला आणखी मजबूती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बसपमध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आलेल्या तीन प्रवक्त्यांपैकी एक धर्मवीर चौधरी म्हणतात, की बसपची विचारसरणी न मानणारे नेते जर पक्ष सोडून जात असतील तर अखिलेश यादव सरकारच्या काळात मंत्री राहिलेले किशोर सिंह यासारखे ज्येष्ठ नेते देखील बसपमध्ये दाखल होत आहेत.

पुढील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात दुसर्‍या पक्षाचे नेते बसपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. सध्या बसपमध्ये आयारामांची संख्या वाढत असली तर 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील यश बसप किती प्रमाणात गड शाबूत ठेवू शकतील, यावर अवलंबून असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com